सिंधुदुर्गातील वीज-पाणीपुरवठा तातडीने सुरळीत करा – मंत्री नितेश राणे

 

सामान्य नागरिकांशी संवाद वाढवा,एल-निनोच्या पार्श्वभूमीवर सज्ज राहण्याचे आदेश

 मुंबई, दि.११ : सिंधुदुर्ग जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे झालेल्या मोठ्या नुकसानीच्या पार्श्वभूमीवर मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री तथा सिंधुदुर्गचे पालकमंत्री नितेश राणे यांनी सोमवारी मंत्रालयात तातडीची आढावा बैठक घेतली. जिल्ह्यातील वीज व पाणीपुरवठा तात्काळ सुरळीत करण्याबरोबरच नागरिकांशी सातत्याने संवाद ठेवण्याचे स्पष्ट निर्देश त्यांनी यावेळी प्रशासनाला दिले. एल-निनोमुळे भविष्यात हवामानातील बदलांची शक्यता लक्षात घेऊन प्रशासनाने युद्धपातळीवर तयारी ठेवावी, असेही त्यांनी स्पष्ट केले.

वादळामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यात अनेक ठिकाणी विजेचे खांब, ट्रान्सफॉर्मर आणि विद्युत यंत्रणेचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले असून अनेक भागांतील वीजपुरवठा खंडित झाला आहे. परिणामी पाणीपुरवठाही विस्कळीत झाला आहे. या पार्श्वभूमीवर मंत्री राणे यांनी जिल्ह्याचा विस्तृत आढावा प्रशासनाकडून घेतला. महावितरण अधिकाऱ्यांनी विजेचे लोखंडी आरसीसी खांब व इतर आवश्यक साहित्य आधीच विविध ठिकाणी उपलब्ध करून ठेवल्याची माहिती यावेळी दिली. कणकवली आणि कुडाळ विभागांसह संपूर्ण जिल्ह्यात ब्रेकडाऊन पथके चोवीस तास कार्यरत ठेवण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले. जिल्ह्यातील १० उपविभाग, दोन विभाग आणि ५३ शाखा कार्यालयांमार्फत मनुष्यबळ व यंत्रणा पूर्ण क्षमतेने कार्यरत ठेवून, शक्य तितक्या कमी वेळेत वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे आदेश त्यांनी यावेळी अधिकाऱ्यांनी दिले.

आपत्कालीन परिस्थितीत लोकांशी सतत संपर्कात रहा. लोकांचे फोन वेळेवर उचला आणि त्यांच्याशी व्यवस्थित संवाद साधा. नागरिकांचा एकही फोन ‘नॉट रीचेबल’ किंवा ‘नॉट रिस्पॉन्डिंग’ राहू नये, मिस्ड कॉललाही तात्काळ प्रतिसाद द्यावा आणि तक्रार निवारणात विलंब होऊ नये, असे स्पष्ट निर्देश मंत्री  राणे यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना दिले.

एल-निनोमुळे राज्यात पाणीटंचाई, अवकाळी पाऊस आणि हवामानातील टोकाचे बदल वाढण्याची शक्यता लक्षात घेऊन वादळ, वीजपुरवठा आणि पाणीपुरवठा याबाबत अधिक सुसंगत नियोजन करावे. भविष्यातील संभाव्य आपत्ती लक्षात घेऊन महावितरणसह सर्व विभागांनी मनुष्यबळ, यंत्रसामग्री, ब्रेकडाऊन पथके आणि संपर्कयंत्रणा अधिक सक्षम करण्याचे निर्देशही त्यांनी दिले. या बैठकीस दूरदृश्य प्रणालीने सिंधुदुर्गच्या जिल्हाधिकारी तसेच महावितरणचे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी आणि संबंधित उपस्थित होते.

०००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *