नवी मुंबई, दि. ०८ (विमाका): अन्य धर्माच्या अनुयायांच्या धार्मिक स्वातंत्र्याचे आणि मानवी प्रतिष्ठेचे रक्षण करण्यासाठी स्वतःच्या प्राणांचे बलिदान देणारे श्री गुरु तेग बहादुरजी यांचे जीवन आणि विचार हे केवळ ऐतिहासिक स्मरण नसून आधुनिक लोकशाही, सामाजिक सौहार्द आणि धार्मिक स्वातंत्र्याचा जिवंत दीपस्तंभ आहेत, असे प्रतिपादन राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी केले.
श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या ३५० व्या शहादत दिनाचे औचित्य साधून नवी मुंबईतील सीबीडी बेलापूर येथील पंजाब हेरिटेज भवन येथे आयोजित ‘श्री गुरु तेग बहादुरजी यांचा वारसा’ या विषयावरील एकदिवसीय राष्ट्रीय चर्चासत्राच्या उद्घाटनप्रसंगी ते बोलत होते. यावेळी केंद्रीय सांस्कृतिक मंत्रालय, साहित्य अकादमी नवी दिल्ली आणि पंजाबी कल्चरल अँड वेल्फेअर असोसिएशन, नवी मुंबई यांच्या संयुक्त विद्यमाने याचे आयोजन केले होते.
यावेळी वनमंत्री गणेश नाईक, आमदार मंदा म्हात्रे, नवी मुंबई महापालिकेच्या महापौर सुजाता पाटील, राज्यपालांचे सचिव डॉ. प्रशांत नरनावरे, नवी मुंबई महापालिकेचे आयुक्त डॉ. कैलास शिंदे, कोकण विभागीय महसूल आयुक्त रुबल अग्रवाल, ठाणे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ, साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक, उपाध्यक्षा कुमुद शर्मा, हरियाणा साहित्य आणि सांस्कृतिक अकादमीचे अध्यक्ष कुलदीप चंद्र अग्निहोत्री, साहित्य अकादमीचे सचिव वरुण गुलाटी, प्रशासक तख्तश्री अबचल नगर, हुजूर साहिब विजय सतबीर सिंह, राज्यपालांचे संयुक्त सचिव एस. राममूर्ती यांच्यासह साहित्यिक, विद्वान आणि सिख समाजातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
राज्यपाल वर्मा यांनी भाषणाच्या सुरुवातीस महाराष्ट्र आणि पंजाब या दोन्ही राज्यांमधील शतकानुशतकांच्या समृद्ध आध्यात्मिक व सांस्कृतिक नात्याचा गौरव केला. महाराष्ट्र ही संतांची पावन भूमी असून संत ज्ञानेश्वर, संत तुकाराम आणि संत एकनाथ यांच्या भूमीतून संत नामदेव महाराज भक्तीचा संदेश घेऊन पंजाबमध्ये गेले होते, ज्यांच्या पवित्र रचना आजही ‘श्री गुरु ग्रंथ साहिब’ मध्ये आदरपूर्वक विराजमान आहेत. तसेच कालंतराने श्री गुरु गोविंदसिंहजी महाराष्ट्रातील नांदेड येथे आले आणि तेथे स्थापित ‘तख्त श्री हजूर साहिब’ हे दोन्ही राज्यांमधील या अनोख्या सांस्कृतिक बंधाची साक्ष देत आहे, असे सांगताना राज्यपाल म्हणाले की, महाराष्ट्र आणि पंजाब ही समान मूल्ये, आदर्श आणि धैर्याची जपणूक करणारी ‘जुळी राज्ये’ आहेत.
श्री गुरु तेग बहादुरजी यांनी १६७५ मध्ये दिलेले सर्वोच्च बलिदान हे भारताच्या नागरी आणि सांस्कृतिक इतिहासातील अत्यंत अद्वितीय आणि प्रेरणादायी अध्याय असल्याचे सांगत राज्यपालांनी अधोरेखित केले की, गुरुंनी केवळ स्वतःच्या अनुयायांसाठीच नव्हे, तर प्रत्येक मानवाला भीतीशिवाय आपापल्या धर्माचे आचरण करण्याचा अधिकार आहे या सार्वभौम मूल्यासाठी ‘हिंद दी चादर’ बनून प्राणाहुती दिली. भारतीय संविधानातील न्याय, स्वातंत्र्य, समता आणि बंधुता ही मूल्ये शतकांआधीच गुरुजींनी आपल्या जीवनकार्यातून प्रत्यक्ष जगून दाखवली होती. आजच्या सामाजिक आणि मानसिक ताणतणावाच्या काळात गुरुजींची शिकवण आपल्याला आंतरिक शक्ती, नम्रता, करुणा आणि निष्काम सेवेची दिशा दाखवते.
गुरुजींचे विचार केवळ चर्चासत्रांपुरते मर्यादित न ठेवता ते पुढील पिढ्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी संस्थात्मक प्रयत्न होणे आवश्यक असल्याचे सांगत राज्यपालांनी एक महत्त्वाची शिफारस केली. महाराष्ट्रात असलेल्या ६५ सार्वजनिक व खाजगी विद्यापीठांपैकी एका विद्यापीठात ‘श्री गुरु तेग बहादूर अध्यासन’ (Chair) स्थापित करण्यात यावे, असे आवाहन त्यांनी केले. हे अध्यासन आंतरधर्मीय संवाद, संशोधन, अध्यापन आणि गुरुजींच्या विवेकबुद्धीच्या स्वातंत्र्याच्या संदेशाचा प्रचार-प्रसार करणारे कायमस्वरूपी केंद्र ठरेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. साहित्य अकादमी आणि पंजाबी कल्चरल ॲण्ड वेल्फेअर असोसिएशनने आयोजित केलेल्या या उपक्रमाचे राज्यपालांनी मनःपूर्वक कौतुक केले.
केंद्रीय सांस्कृतिक मंत्री गजेंद्र सिंह शेखावत यांनी या प्रसंगी दिलेल्या ध्वनी संदेशात म्हटले आहे की, श्री गुरु तेग बहादुरजी यांचे बलिदान हे कोणालाही भयभीत न करता कोणाच्याही भयापुढे न झुकणाऱ्या खऱ्या ज्ञानाचे आणि मानवी स्वातंत्र्याचे अमर प्रतीक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली केंद्र सरकार या ऐतिहासिक ३५० व्या शहादत दिनानिमित्त देशभरात विविध कार्यक्रमांचे आयोजन करत आहे, जेणेकरून येणाऱ्या पिढ्यांना गुरुजींच्या महान त्यागातून आणि अमूल्य संदेशातून निरंतर प्रेरणा मिळावी. गुरुजींचे विचार हे क्षेत्र, भाषा आणि समुदायाच्या सीमा ओलांडून एकता, साहस, करुणा आणि सेवेवर आधारित ‘विकसित भारत’ घडवण्याचा राष्ट्रीय संकल्प पुन्हा दृढ करणारे आहेत.
हरियाणा साहित्य आणि संस्कृती अकादमीचे अध्यक्ष डॉ. कुलदीप चंद अग्निहोत्री यांनी आपल्या भाषणात ‘धर्मो रक्षति रक्षितः’ या सनातनी मूल्याचा उल्लेख करत, जेव्हा जेव्हा धर्मावर संकट आले तेव्हा श्री गुरु तेग बहादुरजींसारख्या महापुरुषांनी दिलेल्या बलिदानामुळेच भारतीय संस्कृती हजारो वर्षांपासून अखंड टिकून असल्याचे सांगितले. गुरू नानक देवजींपासून सुरु झालेल्या ध्येयनिष्ठ परंपरेचा मागोवा घेतला.
साहित्य अकादमीचे अध्यक्ष माधव कौशिक यांनी आपल्या प्रास्ताविक भाषणात ‘हिंद दी चादर’ श्री गुरु तेग बहादुरजी यांच्या बलिदानाचे आणि संरक्षणाचे स्मरण करत, त्यांची परंपरा मानवाला समाधीकडून शहादतीकडे आणि शहादतीकडून समाधीकडे नेणारा मार्ग दाखवते असे सांगितले. गुरुजींच्या ३५० व्या शहादत दिनानिमित्त देशभरातील पाच प्रमुख केंद्रांमध्ये आयोजित राष्ट्रीय चर्चासत्रांच्या मालिकेतील हे तिसरे पुष्प महाराष्ट्राच्या पुण्यभूमीत गुंफण्यात आल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला. जगातील सर्व साहित्यिक आणि इतिहासकार गुरूजींच्या या अजोड बलिदानाचा आदर करतात असे सांगत, ज्या महान संस्कृतीची हस्ती जगात कधीही मिटली नाही, त्या समृद्ध वारशाचे आपण सर्व वाहक आहोत, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
साहित्य अकादमीच्या उपाध्यक्ष प्रा. कुमुद शर्मा यांनी आभार मानले.
०००