शासकीय विद्यानिकेतनांतील शिक्षक भरती प्रक्रिया गतीमान करा – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर

मुंबई दि. ७ : शासकीय विद्यानिकेतनांतील सहाय्यक शिक्षकांची पदभरती ‘पवित्र’ प्रणालीमार्फत करण्यासाठी रोस्टर तपासणीची प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश शालेय शिक्षण राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी दिले.

शासकीय विद्यानिकेतनांच्या कामकाजाचा आढावा घेण्यासाठी मंत्रालयात बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी विविध महत्त्वपूर्ण सूचना दिल्या. बैठकीस शालेय शिक्षण विभागाचे प्रधान सचिव रणजितसिंह देओल उपस्थित होते. तसेच दूरदृश्यप्रणालीद्वारे आयुक्त, संचालक, उपसंचालक, संबंधित अधिकारी आणि विद्यानिकेतनचे माजी विद्यार्थी सहभागी झाले होते.

राज्यमंत्री डॉ. भोयर म्हणाले की, राज्यात विद्यानिकेतनांच्या केवळ पाच शाळा कार्यरत असून, शिक्षक पदभरतीसंदर्भातील सर्व कार्यवाही पुढील पाच दिवसांत पूर्ण करण्यात यावी. ‘पवित्र’ पोर्टल ३१ मेपर्यंत सुरू असल्याने रोस्टर तपासणीसह इतर आवश्यक प्रक्रिया कालमर्यादेत पूर्ण करण्याच्या सूचना त्यांनी दिल्या.

विद्यानिकेतनांच्या सर्वांगीण विकासासाठी अभ्यासगट स्थापन करून सविस्तर अहवाल सादर करण्याचे निर्देशही त्यांनी यावेळी दिले. सध्या सुरू असलेल्या इयत्ता ६ वी ते १० वीच्या वर्गांसाठी

आवश्यक सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्यानंतर इयत्ता ११ वी व १२ वीचे वर्ग सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी, असेही त्यांनी सांगितले.

इयत्ता ६ वी तसेच पुढील वर्षांमध्ये विद्यार्थ्यांच्या प्रवेशासंदर्भातील अधिकार प्राचार्यांना देण्याबाबतही सकारात्मक भूमिका घेण्यात आली. शाळांची इमारत आणि वसतिगृहांची तपासणी करून आवश्यक सुविधा उपलब्ध करून देणे अथवा नवीन इमारती उभारण्यासाठी सर्वसमावेशक प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या.

याशिवाय विद्यानिकेतनांतील विविध समस्या, पायाभूत सुविधा आणि आवश्यक साधनसामुग्री उपलब्ध करून देण्यासंदर्भात बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली.

००००

श्रद्धा मेश्राम/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *