शहीद बाळकृष्ण निकम यांच्या कुटुंबियांचे पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्याकडून सांत्वन

सातारा दि.१४: देशसेवा बजावताना वीरमरण आलेल्या पाटण तालुक्यातील पिंपळोशी येथील सुपुत्र शहीद जवान बाळकृष्ण विलास निकम यांच्या निवासस्थानी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सांत्वनपर भेट दिली. यावेळी त्यांनी निकम कुटुंबियांची आस्थेवाईकपणे चौकशी करून त्यांचे सांत्वन केले आणि शासन निकम कुटुंबीयांच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहे, असा विश्वासही दिला.

यावेळी प्रांताधिकारी सोपान टोणपे, तहसीलदार अनंत गुरव उपस्थित होते.

या भेटीदरम्यान पालकमंत्री देसाई यांनी शहीद निकम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. निकम यांनी देशाच्या रक्षणासाठी दिलेले बलिदान अमूल्य आहे.

निकम यांच्या बलिदानाची उणीव कधीही भरून काढता येणार नाही. मात्र, या कठीण प्रसंगात निकम कुटुंबियांना शासनामार्फत मिळणारी सर्व आर्थिक मदत आणि इतर लाभ तातडीने मिळवून देण्यासाठी प्रशासन युद्धपातळीवर काम करेल. शहीद जवानाच्या वारसांना सर्वतोपरी सहकार्य करणे हे आमचे कर्तव्य आहे, असेही पालकमंत्री देसाई यांनी भेटी प्रसंगी सांगितले.

पाटण तालुक्यातील पिंपळोशी गावचे सुपुत्र व भारतीय सैन्य दलातील १२० इंजिनिअरिंग रेजिमेंटचे जवान हवालदार बाळकृष्ण विलास निकम हे सिक्कीम मध्ये भारत- चीन सीमेवर ॲापरेशन स्नोलीओपर्ड अंतर्गत भारतमातेच्या रक्षणासाठी कर्तव्य बजावत असताना देशासाठी शहीद झाले.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *