विश्व मराठी संमेलनात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते ‘आपलं मंत्रालय’च्या विशेषांकाचे प्रकाशन

कविवर्य कुसुमाग्रजनगरी (नाशिक), दि. २७ : माहिती आणि जनसंपर्क महासंचालनालयातर्फे प्रकाशित केलेल्या जाणाऱ्या ‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाच्या मराठी भाषा विशेषांकाचे प्रकाशन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते चौथ्या विश्व मराठी संमेलनाच्या उदघाटनप्रसंगी करण्यात आले.

यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा अजित पवार, अन्न व नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत, खासदार डॉ. शोभा बच्छाव, खासदार राजाभाऊ वाजे, महापौर हिमगौरी आडके- आहेर, आमदार किशोर दराडे, आमदार माणिकराव कोकाटे, आमदार ॲड. राहुल ढिकले, आमदार देवयानी फरांदे, आमदार सीमा हिरे, उपमहापौर विलास शिंदे, ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त साहित्यिक डॉ. भालचंद्र नेमाडे, महाराष्ट्र राज्य साहित्य व संस्कृती महामंडळाचे अध्यक्ष डॉ. सदानंद मोरे, माजी अध्यक्ष मधु मंगेश कर्णिक, संमेलनाचे स्वागताध्यक्ष तथा मविप्र संस्थेचे सरचिटणीस नितीन ठाकरे आदी उपस्थित होते.

‘आपलं मंत्रालय’ या नियतकालिकाचा विशेषांक मराठी भाषा गौरव दिनानिमित्त प्रकाशित करण्यात आला आहे. मंत्री श्री. सामंत हे या अंकाचे अतिथी संपादक असून माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह हे मुख्य संपादक आहेत.

या विशेषांकात अभिजात मराठी भाषा : इतिहास, वर्तमान आणि भविष्य, जयपूर साहित्य उत्सवात मराठी भाषा विभागाची पताका, मराठी : राजभाषा, मराठी भाषा विभाग, मराठी भाषा संचालनालय, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, राज्य मराठी विकास संस्था, मराठी विज्ञान परिषद, महाराष्ट्र राज्य विश्व कोश निर्मिती मंडळ, मराठी विश्वकोशाचे अभिमान गीत, मराठी भाषा भवन, उत्सव अभिजात मराठीच आदी माहितीपर लेख आहेत.

मराठी साहित्य विश्वामधील कोल्हापूरचे योगदान, आजपर्यंत मराठी साहित्य संमेलने, शासकीय प्रयोजनात मराठी, स्त्री संतांचे अभंग, मराठीला आकार देणारे महानुभाव साहित्य, भाषेच्या इतिहासात अकोल्याचे स्थान अनन्यसाधारण आदी विषयांवरील लेखांमुळे हा अंक संग्राह्य असा आहे. प्रदर्शनस्थळी माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या दलानात हा अंक वितरणासाठी मोफत उपलब्ध करून देण्यात आला आहे.

आपलं मंत्रालय या नियतकालिकात प्रामुख्याने मंत्रालयातील अधिकारी व कर्मचारी लेखन करतात. संचालक (माहिती)(प्रशासन) किशोर गांगुर्डे हे व्यवस्थापकीय संपादक, तर संपादक म्हणून गोविंद अहंकारी असून सहसंपादक म्हणून अर्चना देशमुख, अश्विनी पुजारी आहेत.

‘आपलं मंत्रालय’ : जानेवारी-फेब्रुवारी २०२६ मराठी भाषा विशेषांक वाचा

०००००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *