विश्वविजेती सुवर्णकन्या तिरंदाज शर्वरीचे क्रीडामंत्र्यांकडून अभिनंदन

मुंबई, दि. 25 : कॅनडातील विनीपेग येथे पार पडलेल्या युवा जागतिक अजिंक्यपद तिरंदाजी स्पर्धेत महाराष्ट्राच्या 16 वर्षीय शर्वरी सोमनाथ शेंडे हिने सुवर्णपदक पटकावले आहे.

शर्वरीच्या या कामगिरीबद्दल क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी त्यांच्याशी संवाद साधत अभिनंदन केले आहे.

तसेच महाराष्ट्राच्या युवा तिरंदाज प्रितिका प्रदीप हिने दोन रौप्य पदके आणि शर्वरीसह गाथा आनंदराव खडके यांनी कांस्य पदक जिंकल्याबद्दल त्यांचेही अभिनंदन क्रीडा मंत्री कोकाटे यांनी केले.

महाराष्ट्राच्या विजयाचा झेंडा जागतिक पातळीवर फडकावल्याबदल सुवर्णकन्या शर्वरी, प्रतिका आणि गाथा यांना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावतीने क्रीडा मंत्री कोकाटे यांनी शुभेच्छा दिल्या आहेत.

सुवर्ण कामागिरीच्या यशाबद्दल समजताच क्रीडा मंत्री कोकाटे यांनी प्रशिक्षक कुणाल तावरे यांच्याशी संपर्क साधून कॅनडात असलेल्या शर्वरी यांना अभिनंदनाचा फोन करीत शुभेच्छांचा सुखद धक्का दिला.

त्यांच्या यशाचे कौतुक करताना हे यश अथक परिश्रम, कठोर मेहनत, संयम, जिद्द आणि कौशल्याची साक्ष असल्याच्या भावना व्यक्त केल्या तसेच खेळाडूंच्या उज्ज्वल भविष्यासाठी शासन कटिबद्ध असल्याचे क्रीडा मंत्री कोकाटे यांनी सांगितले.

**

श्रद्धा मेश्राम/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *