विधानसभा लक्षवेधी

पुण्यातील विनापरवाना फेरीवाल्यांबाबत तातडीने कारवाई करण्याचे आदेश देणार – मंत्री शंभूराज देसाई

मुंबई,दि. २८ : पुण्यातील रस्त्यावरील फेरीवाल्यांमुळे होणारी वाहतूक कोंडीची समस्या तातडीने निकाली काढण्यासाठी ज्या फेरीवाल्यांकडे परवाना नाही अशांबाबत कडक कारवाई करण्याचे आदेश पुणे महापालिका आयुक्तांना तातडीने देण्यात येणार असल्याचे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत सांगितले.

पुण्यातील वाढत्या फेरीवाल्यांमुळे होणारी वाहूतक कोंडी याबाबत सदस्य बापूसाहेब पठारे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना मंत्री देसाई बोलत होते. या लक्षवेधीत सदस्य राहूल कुल, प्रशांत बंब, भीमराव तपकीर यांनी सहभाग घेतला.

मंत्री देसाई यांनी सांगितले की, पुणे शहर व अंतर्गत रस्त्यांवर अधिकृत परवानाधारक फेरीवाल्यांना विक्रीसाठी स्टॉल लावण्याचे क्षेत्र निर्धारित करुन देण्यात आलेले आहे. त्याव्यतिरिक्त त्यांनी जर इतर ठिकाणी स्टॉल लावलेले असतील तर ते काढून टाकण्याची तसेच विनापरवानाधारक फेरीवाल्यांवर तातडीने कारवाई करण्यासंदर्भात पुणे महापालिका आयुक्तांना आदेशित करण्यात येईल.त्याचप्रमाणे या कारवाई कुचराई करणा-या वॉर्ड अधिकारी, संबंधित अधिकारी यांच्यावरही कारवाई करण्यात येईल. परवानाधारक फेरीवाल्यांना निर्धारित क्षेत्रात विक्री स्टॉल लावता येतील. तसेच विद्यापीठ परिसरातील अनधिकृत स्टॉलधारकांवर ही कारवाई करुन त्या परिसरातील अनधिकृत स्टॉल काढण्यात येतील. अधिकृत फेरीवाल्यांना निर्धारित करुन देण्यात आलेल्या क्षेत्राची तसेच पुण्यातील अधिकृत वाहनतळाची माहितीही सभागृहात देण्यात येईल, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

पुणे महानगरपालिकेमध्ये नगर पथ विक्रेता समितीची स्थापन करण्यात आली असून सदर समितीच्या दोन बैठका झाल्या आहेत. सदर बैठकीत ३२ मुख्य रस्त्यापैकी १४ रस्ते वाहतूक कोंडी होत असलेल्या ठिकाणाबाबत वाहतूक पोलीस विभाग व पुणे महानगरपालिका यांचेमार्फत फेरीवाला झोन स्थलांतरित करण्याबाबतची कार्यवाही सुरु करण्यात आलेली आहे.

अतिक्रमण/अनाधिकृत बांधकाम निर्मुलन विभाग परिमंडळ कार्यालय क. १ ते ५ यांचे नियंत्रणाखाली १५ क्षेत्रिय कार्यालये अंतर्गत १५ अतिक्रमण निर्मूलन पथक व मध्यवर्ती पथक (भरारी पथक यांच्यामार्फत अतिक्रमण निर्मूलनाची रस्ता, पदपथांवर कारवाई करण्यात येते. वडगावशेरी भागात मोठ्या प्रमाणात आयटी हब असल्यामुळे नागरिकांची वर्दळ, जादा प्रमाणात वाहने या कारणांमुळे वाहतूक कोंडी होत असते. वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता अतिक्रमण विभागाकडून वारंवार फेरीवाल्यांविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येते. रस्त्यावरील वाहतूक कोंडी कमी करण्याकरिता पोलीस प्रशासन विभागाशी समन्वय साधून ज्या ठिकाणी अतिक्रमणे झालेली आहेत, अशी सर्व अतिक्रमणे खात्याकडून निष्कासित करण्यात येतात, असे मंत्री देसाई यांनी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ

 

मुंबईतील उद्याने आणि मोकळ्या जागांवर अधिक सुरक्षा रक्षक नेमणार मंत्री शंभराज देसाई

मुंबई, दि. २८ : मुंबई महानगरपालिका क्षेत्रामध्ये एकूण ८९५ उद्याने आणि मनोरंजन उद्याने अस्तित्वात आहेत. या उद्यानांसह शहरातील मोकळ्या जागांवर पुरेशा प्रमाणात सुरक्षा रक्षक नेमण्यात येतील. याअनुषंगाने बृहन्मुंबई महानगरपालिका आणि पोलीस प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधान परिषदेत लक्षवेधी सूचनेच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य दिलीप लांडे यांनी या संदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सदस्य अबू आझमी, अमित साटम, मुरजी पटेल, अनंत नर, मनिषा चौधरी यांनी सहभाग घेतला.

यासंदर्भात अधिक माहिती देताना मंत्री शंभूराज देसाई म्हणाले, चांदिवली विधानसभा क्षेत्रामध्ये ३७ तर मुंबई उपनगरामध्ये ६०४ उद्याने व मनोरंजन उद्याने आहेत. या उद्यानांमध्ये स्वच्छता आणि परिरक्षण करण्यासाठी महानगरपालिकेमार्फत कंत्राटदारांची नियुक्ती करण्यात आली आहे. या कंत्राटामध्ये उद्यानाची दैनंदिन साफसफाई, कचरा उचलणे, तसेच सुरक्षेच्या दृष्टीने सुरक्षारक्षकाचे काम तथा जबाबदारी पार पाडण्यासाठी राखणदार नियुक्त करणे यांचा समावेश आहे. यामध्ये सुरक्षा रक्षकांची संख्या अपुरी असल्यास मेस्कोच्या माध्यमातून अधिक सुरक्षा रक्षक नेमण्यासंदर्भात महानगरपालिकेला सूचना देण्यात येतील.

या उद्यानांमध्ये गदुर्ल्यांचा वावर रोखण्यासाठी महानगरपालिका आणि पोलीस यांची संयुक्त मोहीम राबविली जाईल. त्यांच्यामार्फत उद्यानांमध्ये अचानक भेट आयोजित केली जाईल. चांदिवली, मानखुर्द या विभागांसह संपूर्ण मुंबई शहर आणि उपनगर क्षेत्रासाठी महापालिका आणि पोलीस प्रशासन यांच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांची अधिवेशनानंतर बैठक घेऊन यासंदर्भात ठोस कारवाई करण्यात येईल, असेही मंत्री शंभूराज देसाई यांनी यावेळी सांगितले.

०००००

बी.सी. झंवर/विसंअ

 

भारतनगर परिसराचा विकास करण्यासाठी लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करणारमंत्री शंभराज देसाई

मुंबई, दि. २८ : वांद्रे पूर्व येथील भारतनगर परिसराचा विकास करण्याबाबत शासनाची कार्यवाही सुरू आहे. या अनुषंगाने लवकरात लवकर सर्वेक्षण पूर्ण करण्याबाबत आदेश देण्यात येतील. तसेच सर्वेक्षणानंतर म्हाडा अथवा झोपटपट्टी पुनर्विकास प्राधिकरण यापैकी कोणत्या यंत्रणेमार्फत विकास करायचा याबाबत निर्णय घेण्यात येईल, असे मंत्री शंभूराज देसाई यांनी विधानसभेत लक्षवेधीच्या उत्तरात सांगितले.

विधानसभा सदस्य वरुण सरदेसाई यांनी यासंदर्भातील लक्षवेधी सूचना मांडली होती. सदस्य मुरजी पटेल यांनी या अनुषंगाने झालेल्या चर्चेत सहभाग घेतला.

याबाबत अधिक माहिती देताना मंत्री शंभुराज देसाई म्हणाले, भारतनगर येथील मूळ जागा म्हाडाच्या ताब्यात असून येथील क्षेत्र ४० एकर पेक्षा अधिक आहे. या ठिकाणी म्हाडामार्फत रहिवाशांना वितरीत केलेल्या जागेबरोबरच काही अतिक्रमणधारक तसेच काही झोपडीधारक आहेत. त्यांच्या कागदपत्रांची तपासणी करुन विगतवारी होणे गरजेचे आहे. या सर्वांचे सर्वेक्षण केल्यानंतर त्या परिसराच्या विकासाबाबत उपमुख्यमंत्री तथा गृहनिर्माण मंत्री यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन पुढील निर्णय घेण्यात येईल.

००००

बी.सी. झंवर/विसंअ

 

पिंपरी चिंचवडमधील वाढीव उद्योग, लोकसंख्येची वीजेची मागणी लक्षात घेऊन

आवश्यक वीज पुरवठा उपलब्ध करुन देणार

ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर

 

मुंबई, दि. २८ : पिंपरी चिंचवडमध्ये वाढत चालले उद्योग, लघुउद्योग त्याचप्रमाणे वाढते शहरीकरण,लोकसंख्या लक्षात घेऊन आवश्यक वीज पुरवठा सुरळीत प्रमाणात उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून अतिरिक्त उपकेंद्रे, रोहित्रे क्षमता वृद्धीची कामे प्रगतीपथावर असल्याचे ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी विधानसभेत सांगितले.

पिंपरी चिंचवड मधील औद्योगिक आणि निवासी पट्ट्यातील वीज सेवा संदर्भात सदस्य महेश लांडगे यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधीला उत्तर देताना राज्यमंत्री बोर्डीकर बोलत होत्या.

राज्यमंत्री बोर्डीकर म्हणाल्या की, आवश्यक वीज पुरवठा सुरळितपणे उपलब्ध करुन देण्यासाठीची कामे प्रगतीपथावर आहे. संबंधित भागात महापारेषण कंपनीकडून सक्षमीकरणाची विविध कामे प्रगतीपथावर असून, भविष्यातील महावितरणची वाढीव वीज मागणी लक्षात घेऊन प्रस्तावित उपकेंद्रे व क्षमतावाढीची कामे करण्यात येत आहेत. निधीअभावी महापारेषणचे कोणतेही काम प्रलंबित नाही.

महावितरण कंपनीच्या गणेशखिंड शहर मंडळअंतर्गत पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी गावठाण, चऱ्होली, मोशी, तळवडे, चिखली व अन्य भागात औद्योगिक, व्यावसायिक आणि निवासी वीज ग्राहकांना महापारेषणची अतिउच्चदाब भोसरी आर एस-१ (स्थापित क्षमता २७५ एम.व्ही.ए. मागणी १९९ एम.व्ही.ए.), भोसरी आर एस-२ (स्थापित क्षमता १५० एम.व्ही.ए. उच्चतम मागणी १०९ एम.व्ही.ए.), टेल्को (स्थापित क्षमता १५० एम.व्ही.ए. उच्चतम मागणी १२९ एम.व्ही.ए.) व चिंचवड आर एस (स्थापित क्षमता २३० एम.व्ही.ए. उच्चतम मागणी १९० एम.व्ही.ए.) अशा एकूण चार २२० के.व्ही. उपकेंद्राद्वारे वीज पुरवठा करण्यात येतो. तसेच भोसरी विभागात महावितरणची २२/२२ के.व्ही. ची १४ उपकेंद्र आणि २२/११ के.व्ही. ची दोन उपकेंद्र आहेत. या सर्व उपकेंद्रातून ११० उच्चदाब वीज वाहिन्यांद्वारे भोसरी विभागाला वीजपुरवठा करण्यात येतो. सदर विभागाअंतर्गत एकूण चार उपविभागीय कार्यालय आणि १७ शाखा कार्यालय आहेत. तसेच या विभागात एकूण ४५३८२० ग्राहक असून, त्यापैकी ५८० उच्चदाब ग्राहक आहेत. उपरोक्त चार अतिउच्चदाब उपकेंद्राची एकूण स्थापित क्षमता ८०५ एम.व्ही.ए. असून, मागणी ६२७ एम.व्ही.ए. आाहे. त्याद्वारे पिंपरी चिंचवड शहरातील भोसरी, गावठाण, चहोली, मोशी, तळवडे, चिखली या सर्व बागात अखंडीत वीजपुरवठा केला जातो.

भोसरी मतदारसंघांमध्ये वाढत्या वीज ग्राहकसंख्येचा तसेच भविष्यातील वीज मागणीचा विचार करता वीज वितरण यंत्रणा सक्षम व बळकट करण्यासाठी महापारेषण कंपनीतर्फे भोसरी येथील सेंचुरी एन्का अतिउच्चदाब केंद्रामध्ये ५० एम.व्ही.ए. ची दोन उच्चदाब रोहित्रे बसवण्याचे काम प्रगतीपथावर आहे. तसेच, २२० के. व्ही. टेल्को उपकेंद्राची क्षमता वाढवण्याचे नियोजन २०२७-२८ वर्षाच्या त्याचप्रमाणे, मोशी सफारी पार्क आणि प्राईड वर्ल्ड सिटी, चहोली येथे नवीन २२०/३३/२२ के.व्ही., २०० एम.व्ही.ए. क्षमतेचे अतिउच्चदाब उपकेंद्र उभारण्याचे नियोजन २०२९-३० वर्षाच्या (एसटीयू प्लॅन) आराखड्यात समाविष्ट करण्यात आले आहे.

२२० के. व्ही. चिंचवड उपकेंद्राला अधिक क्षमतेने वीज पुरवठा करण्यासाठी, २२० के.व्ही. उर्स-चिंचवड वाहिनीच्या तारा उच्च क्षमतेच्या तारांनी  बदलण्याचे काम ७.१२.२०२५ रोजी पूर्ण झाल्यामुळे वाहिनीची वीज वहन क्षमता दुप्पट झाली आहे. २२० के. व्ही. चाकण-भोसरी वाहिनीच्या तारा उच्च क्षमतेच्या तारांनी बदलण्याचे काम सुरु असून, सदर काम मार्च २०२६ मध्ये पूर्ण होणे अपेक्षित आहे. ४०० के. व्ही. लोणीकंद उपकेंद्र ते २२० के. व्ही. भोसरी उपकेंद्र व २२० के. व्ही. चिंचवड उपकेंद्र ते २२० के. व्ही. भोसरी उपकेंद्र दरम्यान असणा-या २२० के. व्ही. द्विदल वाहिन्यांच्या तारा उच्च क्षमतेच्या तारांनी बदलण्याच्या कामाची निविदा प्रसिध्द करण्यात आली आहे.

याव्यतिरिक्त, महावितरण कंपनीमार्फत भोसरी मतदारसंघ अंतर्गत तळवडे येथील २२/२२ के.व्ही. देवी इंद्रायणी उपकेंद्रावरील वाढता वीज भार कमी करण्याच्या उद्देशाने नवीन २२/२२ के.व्ही. कॅनबे उपकेंद्र उभारण्याच्या प्रस्तावास एनएससी योजनेअंतर्गत मंजूरी देण्यात आली आहे. तसेच भोसरी गावठाण भागातील उपरी वीज वाहिन्यांचे भूमिगत वीज वाहिन्यांमध्ये रुपांतर करण्याचे काम सुधारीत वितरण प्रणाली योजनेअंतर्गत (आरडीएसएस) प्रस्तावित आहे. तसेच, मोशी येथे २२/२२ के.व्ही. नक्षत्र आयलँड उपकेंद्र उभारणीसाठीचा प्रस्तावास एमएसकेव्हीवाय योजनेअंतर्गत मंजुरी प्राप्त झाली असून, सदर काम अंतिम टप्प्यात आहे. तसेच दिघी परिसरातील ग्राहकांना सुरळीत वीज पुरवठा करण्यासाठी अतिभारित २२/२२ के. व्ही. कळस उपकेंद्र येथे अतिरिक्त १० एम.व्ही.ए. क्षमतेचे नवीन रोहित्र उभारण्याच्या कामास एनएससी योजनेअंतर्गत मंजुरी मिळालेली असून सदर काम प्रगतीपथावर आहे. याव्यतिरिक्त भोसरी परिसरातील सुधारित वितरण क्षेत्र योजना अंतर्गत एरियल बंच केबल १७ किमी, भूमिगत वाहिनी ६ कि.मी. इत्यादी कामे सध्या सुरु आहेत. तसेच भोसरी मतदार संघातील एम.आय.डी.सी. मध्ये रु. ८.९१ कोटी इतक्या रकमेची विद्युत वाहिनी सक्षमीकरण व इतर कामे प्रगतीपथावर असल्याचे राज्यमंत्री बोर्डीकर यांनी सांगितले.

००००

वंदना थोरात/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *