अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी विविध योजनांची प्रभावी अंमलबजावणी – मंत्री नरहरी झिरवाळ
मुंबई, दि. १०: राज्यातील अल्पसंख्याक समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी राज्य शासनामार्फत विविध कल्याणकारी योजना प्रभावीपणे राबविण्यात येत आहेत. या योजनांच्या माध्यमातून अल्पसंख्याक घटकातील पात्र लाभार्थ्यांना आर्थिक सहाय्य, शैक्षणिक सुविधा आणि पायाभूत विकासाचा लाभ देऊन त्यांच्या जीवनमानात सुधारणा घडवून आणण्याचे काम केले जात असल्याची माहिती मंत्री नरहरी झिरवाळ यांनी विधानपरिषदेत दिली.
सदस्य इद्रिस नायकवडी यांनी याबाबत लक्षवेधी सूचना मांडली. त्यावेळी ते बोलत होते. चर्चेत सदस्य जगन्नाथ अभ्यंकर, सुधाकर अडबाले यांनी सहभाग घेतला. मंत्री झिरवाळ म्हणाले की, अल्पसंख्याक विभागामार्फत विविध योजनांवर सन २०२५-२६ या आर्थिक वर्षात ९४७.७४ कोटी रुपयांचा निधी खर्च करण्यात आला आहे. खर्चाचे प्रमाण ८४.८४ टक्के आहे. त्यामुळे निधीची कमतरता नसून उपलब्ध निधीचा खर्चही समाधानकारक झाला आहे. परंतु काही प्रकरणांमध्ये अनेक संस्थांकडून प्रस्ताव उशिरा प्राप्त होत असल्याने त्यांना वेळेत लाभ देता येत नाही. या प्रक्रियेत आवश्यक सुधारणा करण्यात येतील.
पात्र शाळांना आवश्यक मंजुरी देण्यात येईल, तसेच अनुदान न मिळण्यामागे प्रशासनाची किंवा संबंधित संस्थेची चूक असल्यास त्याची तपासणी करून जबाबदार असलेल्यांवर योग्य ती कारवाई केली जाईल, असे मंत्री झिरवाळ यांनी सांगितले.
००००
शैलजा पाटील/विसअ
शिरपूर येथील गौण खनिज चोरी प्रकरणाची चौकशी करणार – राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर
मुंबई, दि. १०: शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या हद्दीत गौण खनिज चोरीप्रकरणी दाखल गुन्ह्याची सखोल चौकशी वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या माध्यमातून करण्यात येणार असून, पोलीस महानिरीक्षक स्तरावरूनही आवश्यक ती कार्यवाही केली जाईल, असे राज्यमंत्री डॉ. पंकज भोयर यांनी सांगितले.
सदस्य चंद्रकांत रघुवंशी यांनी यासंदर्भात लक्षवेधी सूचना मांडली होती.
राज्यमंत्री डॉ. भोयर यांनी सांगितले की, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर सूडबुद्धीने गुन्हे दाखल करण्यात आल्याचा कोणताही प्रकार झालेला नाही. शिरपूर शहर पोलीस ठाण्याच्या अंतर्गत गौण खनिज चोरीसंदर्भात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. वाळू चोरी करणाऱ्या वाहनाचा पाठलाग करताना संबंधित मंडळ अधिकारी व इतर शासकीय कर्मचाऱ्यांना वाहनाने धडक देण्याचा प्रयत्न झाल्याचे पोलिसांच्या प्राथमिक माहितीत नमूद आहे. त्यानंतर वाहन थांबविल्यानंतर चालकाने काही व्यक्तींना बोलावून शासकीय कर्मचाऱ्यांशी मारहाण केल्याचा प्रकार घडल्याचे त्यांनी सांगितले.
००००
मोहिनी राणे /विसअ