मुंबई दि. ५ : प्रभावी नेतृत्वगुणासाठी बुदध्यांकाबरोबरच भावनांकही महत्वाचा आहे. नेतृत्व करताना संवेदनशीलपणा, सकारात्मक विचार आणि प्रोत्साहनात्मक वृत्ती महत्वाची आहे. असे मत यशदाचे प्रशिक्षक मिनोचर पटेल यांनी व्यक्त केले.
सामान्य प्रशासन विभागातर्फे मंत्रालयात ‘टेक वारी २.०‘ चे आयोजन करण्यात आले आहे. या अंतर्गत विविध विषयांवर प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले असून प्रभावी नेतृत्व या विषयावर यशवंतराव चव्हाण विकास प्रशासन प्रबोधिनीचे प्रशिक्षक मिनोचर पटेल यांनी उपस्थितांशी संवाद साधला.
मिनोचर पटेल म्हणाले की, आपल्या कामातून विश्वासार्हता निर्माण करणे आणि लोकांच्या आयुष्यात सकारात्मक बदल घडवणे, त्यांच्याशी संवेदनशीलपणे वागून, कामासाठी प्रोत्साहित करणे म्हणजेच प्रभावी नेतृत्व होय. तुमचा कामाचा अनुभव, सचोटी आणि तुमच्यातील संवेदनशीलता आणि लोकांबद्दलची काळजी या सर्व गुणांचा कामकाजाच्या ठिकाणी योग्य वापर करणे आवश्यक ठरते. जेंव्हा लोक तुमच्यावर विश्वास ठेवतात आणि त्यांना तुमच्या मार्गदर्शनाखाली काम करायला आवडते, तेव्हाच खऱ्या अर्थाने ते तुम्हाला प्रभावी नेतृत्व म्हणून स्वीकारतात.
मानसिक व शारीरिक आरोग्य संतुलित ठेवणे महत्वाचे आहे. आनंद हा नेतृत्वाचा मुख्य घटक असून, आध्यात्मिक स्तरावर जीवनातील मूल्ये, उद्दिष्टे व स्पष्टता यांचे भान असणे गरजेचे आहे. शिष्टाचार, व्यावसायिक कौशल्यासोबतच वैयक्तिक आचरणातून विश्वास निर्माण करणे गरजेचे आहे.
भावनिक संतुलन, सामाजिक बांधिलकी, व्यावसायिक शिष्टाचार, शारीरिक आणि मानसिक आरोग्य, कामातील आनंद आणि आध्यात्मिक स्पष्टता. आपल्या कामाचा इतरांवर होणारा परिणाम याची जाणीव ठेवणे हाच यशस्वी नेतृत्वाचा खरा मार्ग असल्याचे पटेल यांनी सांगितले.
‘टेक-वारी 2.0’ मध्ये व्हर्च्युअल सहभागी होण्यासाठी QR कोड स्कॅन करा.
०००