मुंबई, दि. २५ : पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यातील धानिवरी येथे १८ मे २०२६ रोजी झालेल्या भीषण अपघातात मृत्युमुखी पडलेल्या १४ नागरिकांच्या वारसांना मुख्यमंत्री सहायता निधीतून प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ७० लाख रुपयांची आर्थिक मदत वितरित करण्यात आली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलेल्या मदतीनुसार मुख्यमंत्री सहायता निधी कक्षामार्फत एकूण ७० लाख रुपयांचा निधी पालघर जिल्हाधिकाऱ्यांमार्फत संबंधित मृतांच्या वारसांना वितरित करण्यात आला.
या अपघातात मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये सुरेश रत्ना लाखात (वय ४७), पांडू गणपत लाखात (वय ४५), कलु गोविंद लाखात (४८), सुनील अर्जुन दांडेकर (वय ३५), चिमा गोविंद कुऱ्हाडा (वय ७५), नमिता विठठ्ल दांडेकर (वय १४), सारिका संतोष लाखात (वय ३८), आयुष्य सिताराम लाखात (वय १६), सागर नामदेव शेंडे (वय १५), वंदना शिवराम वळवी (वय ४०), सलोनी शिवराम वळवी (वय १२), अजय चंदर आहाडी (वय १९) आणि रियांशी संतोष लाखात (वय ४) आणि कुणाल रवींद्र रावते सर्व राहणार बापूगाव यांचा समावेश आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या घोषणेनुसार जिल्हाधिकारी कार्यालय, पालघर यांनी आर्थिक मदतीचा प्रस्ताव राज्य शासनाकडे सादर केला होता. प्रस्तावास मान्यता मिळाल्यानंतर मुख्यमंत्री सहायता निधीतून मृतांच्या वारसांना प्रत्येकी ५ लाख रुपये, अशी एकूण ७० लाख रुपयांची आर्थिक मदत पालघर जिल्हाधिकारी कार्यालयामार्फत वितरित करण्यात आली.
0000