पालखी सोहळा अथ ते इथपर्यंतचा प्रवास

संत ज्ञानेश्वर महाराज आणि संत तुकाराम महाराज यांच्या पालखी सोहळ्याचा इतिहास हा केवळ धार्मिक परंपरेचा इतिहास नाही, तर तो महाराष्ट्राच्या सांस्कृतिक, सामाजिक आणि लोकजीवनाचा चालता-बोलता दस्तऐवज आहे. आज लाखो वारकरी, शेकडो दिंड्या, डिजिटल नियंत्रण व्यवस्था, ड्रोन निरीक्षण, प्रशस्त चौपदरी रस्ते आणि अत्याधुनिक सुविधा यांसह दिसणारा पालखी सोहळा एकेकाळी अत्यंत साध्या, कष्टमय आणि खडतर पायी यात्रेच्या स्वरूपात अस्तित्वात होता. चिखलातून, नदी-नाल्यांतून, डोंगर-दऱ्यांतून आणि काटेरी पायवाटांवरून विठ्ठलाच्या भेटीस निघालेल्या या यात्रेने काळानुसार आधुनिकतेचा स्वीकार केला; पण तिच्या भक्तीचा आत्मा मात्र आजही तितकाच जिवंत आहे.

संतकालीन वारी : भक्ती, साधेपणा आणि सामूहिकता

संतांच्या काळात आजच्या अर्थाने “पालखी सोहळा” अशी औपचारिक संकल्पना अस्तित्वात नव्हती. वारकरी टाळ-मृदंग, वीणा, भगवी पताका आणि संतांच्या पादुका किंवा स्मृतीचिन्हांसह पायी पंढरपूरकडे प्रस्थान करत असत. गावोगावी मुक्काम, रात्री भजन-कीर्तन, पहाटे हरिनामाचा गजर आणि पुन्हा प्रवास… एवढ्याच साधेपणात वारी वाहत होती. ना रथ, ना चोपदार, ना नियोजित मुक्काम, ना प्रशासकीय व्यवस्था. विठ्ठलनाम हाच आधार आणि सामूहिक भक्ती हीच ताकद होती.

संत तुकाराम महाराजांच्या वैकुंठगमनानंतर त्यांचे धाकटे चिरंजीव नारायण महाराज यांनी वारीची सूत्रे हाती घेतली. त्यांनी वारकऱ्यांचे संघटन करून वारीला अधिक नियमित आणि शिस्तबद्ध स्वरूप दिले. वारकरी परंपरेतील काही उल्लेखांनुसार, प्रारंभी काही काळ दोन्ही संतपरंपरांमध्ये एकात्म भावाने वारी केली जात असे. त्यामुळे “ज्ञानोबा-तुकोबा” हा संयुक्त गजर वारकरी संप्रदायाच्या आध्यात्मिक एकात्मतेचे प्रतीक बनला.

खडतर मार्ग, पावसाळी वाटा आणि जीवघेणा प्रवास

आज जसे चौपदरी महामार्ग आणि प्रशस्त रस्ते आहेत तसे त्या काळात नव्हते. पालखी मार्ग हा मुख्यतः मातीचे रस्ते, जंगलातील पायवाटा, नदीकाठचे मार्ग आणि व्यापारी घोडेमार्ग यांवर आधारित होता. पावसाळ्यात नद्या दुथडी भरून वाहत आणि अनेकदा वारकऱ्यांना पाण्यातूनच मार्ग काढावा लागत असे. काही ठिकाणी होड्यांचा आधार घ्यावा लागे. दिवे घाट, जेजुरी परिसर आणि माळशिरसकडील अनेक टप्पे अत्यंत खडतर मानले जात.

देहूहून निघणारी वारी साधारण देहू – पुणे – हडपसर – सासवड – जेजुरी – लोणंद – फलटण परिसर – माळशिरस – वाखरी – पंढरपूर या पट्ट्यातून जात असे आता ती

देहू, पिंपरी-चिंचवड, पुणे, हडपसर, लोणीकाळभोर, यवत, वरवंड, पाटस, उडंवडी गवळ्याची, बारामती, सणसर, निमगाव केतकी,  इंदापूर, सराटी, आकलुज, बोरगाव, पिराची कुरोली, वाखरी-पंढरपूर अशी जाते ; तर आळंदीहून निघणारी माऊलींची वारी आळंदी – पुणे – दिवे घाट – सासवड – जेजुरी – लोणंद – तरडगाव – नातेपुते – माळशिरस – वाखरी – पंढरपूर या मार्गाने पुढे सरकत असे. मात्र हे मार्ग आजसारखे निश्चित नव्हते. पावसाचा जोर, नदीची स्थिती आणि सुरक्षितता लक्षात घेऊन मार्गात बदल होत असत.

दोन परंपरा, एकच भक्तीभाव

सुरुवातीच्या काळात वारी ही एकत्रित भक्ती परंपरा होती. मात्र पुढे देहूची संत तुकाराम महाराज पालखी आणि आळंदीची संत ज्ञानेश्वर महाराज पालखी अशा दोन स्वतंत्र परंपरा विकसित झाल्या. दोन्ही संतांचे धार्मिक केंद्र, अनुयायी, दिंड्या आणि मानकरी वेगळे होत गेले. त्यामुळे स्वतंत्र पालख्या, स्वतंत्र मुक्काम आणि स्वतंत्र शिस्त निर्माण झाली. तरीही “ज्ञानोबा-तुकोबा”चा गजर दोन्ही परंपरांच्या आध्यात्मिक ऐक्याचे प्रतीक म्हणून कायम राहिला.

हैबतबाबा आरफाळकर आणि पालखी सोहळ्याचे संघटन

पालखी सोहळ्याला संघटित, शिस्तबद्ध आणि सार्वजनिक स्वरूप देण्याचे मोठे श्रेय हैबतबाबा आरफाळकर यांना जाते. ग्वाल्हेरकर शिंद्यांच्या सैन्यात सरदार म्हणून काम केल्याने लष्करी शिस्त त्यांच्या अंगी भिनली होती. त्यांनी तीच शिस्त वारीत उतरवली.

पालखी सोहळ्याची रथ, दिंडी, चोपदार आणि मानव्यवस्थेसह अधिक संघटित पुनर्रचना करण्यात आली. दिंड्यांना क्रमांक देण्यात आले, मुक्काम आणि प्रस्थानाच्या वेळा निश्चित करण्यात आल्या. चोपदार, नगारखाना, अश्व, ध्वज आणि शामियाने यांचा समावेश करण्यात आला. त्यामुळे वारी एका साध्या भक्ती यात्रेतून शिस्तबद्ध लोकसोहळ्यात रूपांतरित झाली.

विविध सरदार, संस्थानिक आणि जहागीरदारांनी धान्य, घोडे, तंबू आणि आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली. आजही पालखीतील अनेक मानपरंपरा त्या इतिहासाच्या जिवंत साक्षी मानल्या जातात.

महाराष्ट्र शासनाचा वाढता सहभाग

दीर्घकाळ वारीचे व्यवस्थापन हे स्थानिक गावकरी, मानकरी, दिंडीप्रमुख आणि वारकरी परंपरेच्या सामूहिक शिस्तीवर आधारित होते. पूर्वीपासून काही प्रमाणात प्रशासकीय मदत असली तरी १९९० च्या दशकानंतर शासनाचा सहभाग अधिक औपचारिक आणि व्यापक झाला. “निर्मल वारी”सारख्या स्वच्छता मोहिमा, आरोग्य सुविधा आणि वाहतूक नियंत्रण यांमधून शासनाची भूमिका अधिक स्पष्ट झाली. त्यानंतर पालखी मार्गांचा विकास, मूलभूत सुविधा, मुक्काम व्यवस्थापन आणि समन्वित नियोजन या कामांना अधिक गती मिळाली.

वारीच्या यशस्वी आयोजनासाठी शासनाकडून पालखी मार्गांची दुरुस्ती, तात्पुरते रस्ते, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था आणि पालखी तळांवर निवाऱ्याची सोय केली जाऊ लागली. आरोग्य विभागामार्फत फिरते दवाखाने, रुग्णवाहिका, आरोग्यदूत आणि वैद्यकीय पथके तैनात करण्यात येऊ लागली. “निर्मल वारी” अभियानांतर्गत स्वच्छतेसाठी विशेष निधी आणि मनुष्यबळाची तरतूद करण्यात आली; तर कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी आणि वाहतूक नियंत्रणासाठी मोठा पोलीस बंदोबस्त उभा राहू लागला.

अलीकडील काळात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी नियोजनासंदर्भात विशेष बैठका घेऊन प्रशासनाला आवश्यक सुविधा आणि समन्वयाबाबत निर्देश दिले. पुण्याचे जिल्हाधिकारी जितेंद्र डुडी यांनीही पालखी व्यवस्थापनासंदर्भात संयुक्त बैठका घेऊन विविध विभागांमध्ये समन्वय साधण्यावर भर दिला.

प्रशासन, तंत्रज्ञान आणि आधुनिक व्यवस्थापन

आजचा पालखी सोहळा हा महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या प्रशासकीय व्यवस्थापनांपैकी एक मानला जातो. लाखो वारकरी सुमारे तीन आठवडे पायी चालत असताना संपूर्ण प्रशासन त्यांच्या सेवेसाठी कार्यरत असते. जिल्हाधिकारी, पोलीस प्रशासन, जिल्हा परिषद, आरोग्य विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग, ग्रामपंचायती, महापालिका, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा, वीज वितरण कंपन्या आणि स्वयंसेवी संस्था यांचा मोठा समन्वय या काळात पाहायला मिळतो.

वारकऱ्यांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, मोबाइल शौचालये, आरोग्य तपासणी शिबिरे, रुग्णवाहिका, हरवलेल्यांसाठी नियंत्रण कक्ष, स्वच्छता मोहीम, वाहतूक नियंत्रण आणि मुक्काम व्यवस्था मोठ्या प्रमाणावर केली जाते. आता वारीत ड्रोन निरीक्षण, सीसीटीव्ही, डिजिटल कमांड सेंटर आणि जीपीएस आधारित नियंत्रण व्यवस्थेचाही वापर होतो. लाखो लोकांचा हा प्रवास कोणताही मोठा अनुशासनभंग न होता पूर्ण होतो, हे प्रशासन आणि वारकरी शिस्त यांच्या अद्वितीय समन्वयाचे उदाहरण मानले जाते.

केंद्र सरकार आणि राज्य शासनच्या पुढाकारातून पालखी मार्गाचा कायापालट

केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पालखी मार्गाच्या विकासासाठी विशेष लक्ष दिल्यानंतर या ऐतिहासिक वारीला आधुनिक पायाभूत सुविधांची नवी जोड मिळाली. वाढती वाहतूक, वारकऱ्यांची वाढती संख्या आणि सुरक्षिततेच्या गरजा लक्षात घेऊन पालखी मार्ग अधिक सुरक्षित, रुंद आणि सुसज्ज करण्याची कामे वेगाने सुरू झाली.

पुणे ते पंढरपूर या मार्गावर रस्त्यांचे रुंदीकरण, उड्डाणपूल, सेवा रस्ते, वाहतूक नियंत्रण व्यवस्था आणि काही ठिकाणी वारकऱ्यांसाठी संरक्षित पदयात्रा मार्ग उभारण्यावर भर देण्यात आला. पालखी मार्ग हा केवळ धार्मिक प्रवासाचा रस्ता नसून महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनवाहिनीचा भाग आहे, या दृष्टीने केंद्र आणि राज्य शासनाने त्याच्या विकासाकडे पाहण्यास सुरुवात केली.

नव्या पालखी मार्गावरील आधुनिक सुविधा

संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्ग आणि संत तुकाराम महाराज पालखी मार्गाच्या चौपदरीकरणामुळे वारकऱ्यांचा प्रवास अधिक सुरक्षित आणि सुखकर झाला आहे. नव्याने विकसित करण्यात आलेल्या मार्गावर अनेक सुविधा उभारण्यात आल्या असून काही कामे अद्याप प्रगतिपथावर आहेत.

काही ठिकाणी वारकऱ्यांसाठी मुख्य महामार्गापासून स्वतंत्र अथवा संरक्षित पदयात्रा मार्ग विकसित करण्यात आला आहे. त्यामुळे वाहनांच्या वर्दळीपासून वारकऱ्यांचे संरक्षण होण्यास मदत होते. पालखी तळांवर संरक्षक भिंती, पालखी कट्टे, कायमस्वरूपी स्वच्छतागृहे, हँगर व्यवस्था आणि हायमास्ट प्रकाशयोजना उभारण्यात आली आहे.

मार्गाच्या दुतर्फा वड, पिंपळ, कडुलिंब यांसारख्या सावली देणाऱ्या देशी वृक्षांची लागवड करून “ग्रीन कॉरिडॉर” उभारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. सासवड, नीरा, लोणंद, फलटण, नातेपुते, माळशिरस आणि पंढरपूर येथे बायपास रस्ते, उड्डाणपूल, रेल्वे ओव्हरब्रिज आणि अंडरपास तयार करण्यात आले आहेत. त्यामुळे वाहतूक अधिक वेगवान आणि सुरक्षित झाली आहे.

विशेष म्हणजे या विकासकामांदरम्यान पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची ऐतिहासिक विहीर, बाजीराव विहीर यांसारख्या ऐतिहासिक वास्तूंचे जतन करण्याचाही प्रयत्न करण्यात आला आहे. त्यामुळे आधुनिक विकास आणि ऐतिहासिक वारसा यांचा संतुलित संगम या मार्गावर पाहायला मिळतो.

वारी : महाराष्ट्राच्या लोकमनाची जैविक परंपरा

वारी ही फक्त पंढरपूरकडे जाणारी धार्मिक यात्रा नाही; ती महाराष्ट्राच्या लोकमनाची जैविक परंपरा आहे. यात समता आहे, सेवा आहे, श्रमसंस्कृती आहे, लोकशाही आहे आणि सामूहिकतेची अद्भुत ताकद आहे.

खडतर पायवाटांपासून आधुनिक राजमार्गापर्यंत आलेल्या या परंपरेने काळ बदलला, व्यवस्था बदलली, रस्ते बदलले; पण वारकऱ्यांच्या ओठांवरील “ज्ञानोबा-तुकोबा”चा गजर आजही तितक्याच श्रद्धेने  आसमंतात घुमत आहे.

— युवराज पाटील

जिल्हा माहिती अधिकारी, पुणे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *