पनवेल येथे सिल्ला मत्स्यालय व सी लायन मनोरंजन केंद्र उभारणीला गती द्या – मंत्री नितेश राणे

मुंबई, दि. १७ : पनवेल येथील प्रस्तावित सिल्ला मत्स्यालय आणि सी लायन मनोरंजन केंद्र या महत्वाकांक्षी प्रकल्पाबाबत मत्स्यव्यवसाय व बंदरे मंत्री नितेश राणे यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात आढावा बैठक झाली. प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीस गती देऊन आवश्यक प्रक्रिया तातडीने पूर्ण करण्याचे निर्देश मंत्री राणे यांनी दिले.

पनवेल येथील मत्स्य उपकेंद्रात प्रस्तावित प्रकल्पाच्या अनुषंगाने यापूर्वी झालेल्या बैठकीतील निर्णयांची अंमलबजावणी, प्रकल्पाचे तांत्रिक स्वरूप, प्रशासकीय बाबी तसेच पर्यटनाच्या दृष्टीने प्रकल्प विकसित करण्याबाबत बैठकीत सविस्तर चर्चा करण्यात आली. यावेळी आमदार विक्रांत पाटील, पर्यटन विभागाचे अपर मुख्य सचिव, मत्स्यव्यवसाय विभागाचे सचिव एन.रामास्वामी, मत्स्यव्यवसाय आयुक्त प्रेरणा देशभ्रतार, रायगडचे जिल्हाधिकारी, पनवेल महानगरपालिकेचे आयुक्त, डॉ.बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ.संजय भावे, मत्स्य उपकेंद्र पनवेल येथील शास्त्रज्ञ डॉ. विवेक वर्तक तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.

बैठकीत प्रकल्पाचे सविस्तर सादरीकरण मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांच्यासमोर करण्यात आले. प्रस्तावित केंद्रामध्ये सागरी व गोड्या पाण्यातील मत्स्यालय, समुद्रातील जैवविविधतेवर आधारित प्रदर्शन, ओशन टनेल, विद्यार्थ्यांसाठी डिजिटल शिक्षण केंद्र, टच पूल, जेलीफिश, कोरल रीफ व विविध सागरी जीवांचे प्रदर्शन तसेच संशोधन व प्रजनन सुविधा उपलब्ध करून देण्याचे प्रस्तावित आहे. तसेच सी लायन मनोरंजन केंद्र, सागरी सस्तन प्राण्यांच्या संगोपनासाठी सुविधा, प्रशिक्षण व देखभाल केंद्र, अभ्यागतांसाठी अॅम्फीथिएटर, स्नो पार्क आणि १२-डी थिएटर यांसारख्या सुविधा प्रस्तावित आहेत. पर्यटकांसाठी खाद्यपदार्थ केंद्र, स्मृतिचिन्हांची दुकाने, वाहनतळ, उद्यान व इतर पूरक सुविधांचाही प्रकल्पात समावेश आहे.

पनवेल परिसरातील उपलब्ध शासकीय जागेचा पर्यटन, शिक्षण, संशोधन आणि महसूल निर्मितीसाठी प्रभावी वापर करण्याच्या दृष्टीने हा प्रकल्प महत्त्वपूर्ण ठरणार आहे. मुंबई, नवी मुंबई आणि पनवेल परिसरातील पर्यटनाची क्षमता लक्षात घेता या प्रकल्पामुळे राज्यातील सागरी पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होईल. विद्यार्थ्यांना सागरी जीवशास्त्र व मत्स्यविज्ञानाचा प्रत्यक्ष अनुभव मिळण्याबरोबरच संशोधनासाठीही सुविधा उपलब्ध होणार आहेत.

“प्रकल्पाची संकल्पना व्यवस्थित असून पर्यटनाच्या दृष्टीने हा महत्त्वाचा प्रकल्प आहे. प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीला गती देऊन दिवाळीपर्यंत भूमिपूजन होईल, या दृष्टीने नियोजन करावे,” असे निर्देश मंत्री नितेश राणे यांनी दिले. प्रकल्पाच्या प्रगतीचा आढावा घेण्यासाठी दोन आठवड्यांनंतर पुन्हा बैठक घेण्यात यावी, असेही त्यांनी सांगितले. या प्रकल्पाचा दर्जा आणि त्याच्या देखभालीची आवश्यकता लक्षात घेऊन भविष्यातील देखभाल व्यवस्थेचे योग्य नियोजन करण्याच्या सूचनाही मंत्री राणे यांनी दिल्या. विमानतळाच्या जवळ हा प्रकल्प असल्याने देश-विदेशातील पर्यटकांना आकर्षित करण्यासोबतच विद्यार्थ्यांसाठीही तो उपयुक्त ठरेल, असे त्यांनी नमूद केले.

प्रकल्पाच्या पुढील कार्यवाहीसाठी संबंधित विभागांनी समन्वयाने आवश्यक तांत्रिक व प्रशासकीय प्रक्रिया पूर्ण करून अहवाल सादर करण्याचे निर्देश बैठकीत देण्यात आले.

0000

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *