निसर्गाला सोबत घेणारा, आदिवासी संस्कृतीचा सन्मान करणारा विकास घडवू – पालकमंत्री हसन मुश्रीफ

नंदुरबार, दि. १५: विकास म्हणजे केवळ रस्ते, इमारती आणि आकडेवारी नव्हे तर दुर्गम पाड्यातील रुग्णाला वेळेवर उपचार मिळणे, शेतकऱ्याला आर्थिक बळ मिळणे, महिलेला पुन्हा शिक्षणाची संधी मिळणे, आदिवासी विद्यार्थ्याच्या डोळ्यांत मोठे स्वप्न निर्माण होणे, युवकाच्या हाताला रोजगार मिळणे आणि प्रत्येक नागरिकाला शासनाची सेवा वेळेवर मिळणे, हाच खऱ्या अर्थाने विकास आहे. हा विकास निसर्गाला सोबत घेणारा, आदिवासी संस्कृतीचा सन्मान करणारा आणि शेवटच्या गावापर्यंत पोहोचणारा असला पाहिजे, असे प्रतिपादन वैद्यकीय शिक्षणमंत्री तथा नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

भारताच्या 80 व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हावासीयांना संबोधित करताना ते बोलत होते. यावेळी खासदार गोवाल पाडवी, विधानपरिषदेचे आमदार चंद्रकांत रघुवंशी, जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी नमन गोयल, जिल्हा पोलीस अधीक्षक अश्विनी सानप, निवासी उपजिल्हाधिकारी आशा संघवी, उपजिल्हाधिकारी प्रमोद भामरे, कल्पना ठुबे, उषाराणी देवगुणे,  जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. विनय सोनवणे, जिल्हा पुरवठा अधिकारी अनिल पवार, जिल्हा नियोजन अधिकारी शकांक काळे, सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता अंकुश पालवे, जिल्हा उपनिबंधक एस.वाय. पुरी, आदि विविध विभागांचे विभाग प्रमुख अधिकारी-कर्मचारी यावेळी उपस्थित होते.

प्रारंभी त्यांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी सर्वस्व अर्पण करणाऱ्या ज्ञात-अज्ञात स्वातंत्र्यसैनिक, क्रांतिकारक आणि हुतात्म्यांना विनम्र अभिवादन केले.

पालकमंत्री श्री. मुश्रीफ म्हणाले की, स्वातंत्र्याचा अमृतकाळ हा केवळ भूतकाळातील त्यागाचे स्मरण करण्याचा काळ नसून समृद्ध, सक्षम, समताधिष्ठित आणि आत्मनिर्भर भारत घडविण्याचा संकल्प दृढ करण्याचा काळ आहे. सातपुड्याच्या कुशीत वसलेला नंदुरबार जिल्हाही या विकासयात्रेत नव्या आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

आरोग्य व वैद्यकीय शिक्षणात आशादायी परिवर्तन

जननायक बिरसा मुंडा शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयात दररोज 800 ते 900 रुग्णांना मोफत व दर्जेदार उपचार दिले जात आहेत. कर्करोग शस्त्रक्रिया, केमोथेरपी, दुर्बिणीद्वारे शस्त्रक्रिया, अस्थिरोग उपचार, डिजिटल एक्स-रे आणि सीटी स्कॅनसारख्या सुविधा आता जिल्ह्यातच उपलब्ध आहेत. सिकलसेल निदान व संशोधन प्रयोगशाळेमुळे तपासणीसाठी नमुने जिल्ह्याबाहेर पाठविण्याची गरज राहिलेली नाही. बालरोग व क्षयरोग अतिदक्षता विभाग, मॉलिक्युलर डीएनए निदान प्रयोगशाळा आणि जळीत रुग्ण कक्षामुळे आरोग्यसेवा अधिक सक्षम झाली आहे.

प्रस्तावित कर्करोग उपचार केंद्र, सुपर स्पेशालिटी रुग्णालय, दंत व फिजिओथेरपी महाविद्यालय आणि पदव्युत्तर शिक्षणाचा विस्तार पूर्ण झाल्यानंतर नंदुरबार उत्तर महाराष्ट्रातील वैद्यकीय शिक्षण व आरोग्यसेवेचे महत्त्वपूर्ण केंद्र बनेल, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.

जिल्हा परिषदेच्या ‘ई-आरोग्य धमनी’ या अभिनव उपक्रमाला राष्ट्रीय ई-गव्हर्नन्स सुवर्ण पुरस्कार मिळणे ही जिल्ह्यासाठी अभिमानाची बाब आहे. तंत्रज्ञानाच्या साहाय्याने दुर्गम भागातील आरोग्यसेवा अधिक गतिमान आणि परिणामकारक करण्याच्या प्रयत्नाचा राष्ट्रीय स्तरावर गौरव झाला असल्याचे त्यांनी सांगितले.

कर्जमुक्ती योजनेतून शेतकऱ्यांना आर्थिक बळ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजना-2026 अंतर्गत पात्र शेतकऱ्यांना ₹2 लाखांपर्यंत कर्जमाफी, तर नियमित कर्जफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना ₹50 हजारांपर्यंत प्रोत्साहनपर लाभ मिळणार आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 11,176 शेतकऱ्यांची ई-केवायसी पूर्ण झाली आहे. पहिल्या हरित यादीतील 5,778 शेतकऱ्यांच्या कर्जखात्यांत ₹59 कोटी 23 लाखांहून अधिक रक्कम जमा करण्यात आली आहे. पारदर्शक प्रक्रिया, मोफत ई-केवायसी आणि तक्रार निवारण यंत्रणेच्या माध्यमातून प्रत्येक पात्र शेतकऱ्यापर्यंत योजनेचा लाभ पोहोचविण्यास प्रशासन कटिबद्ध असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

जलसुरक्षेच्या दृष्टीने समाधानकारक स्थिती

जिल्ह्यात 14 ऑगस्टपर्यंत सरासरी 314.2 मिमी पावसाची नोंद झाली आहे. मागील वर्षीच्या याच कालावधीतील 253.9 मिमी पावसाच्या तुलनेत यंदा 60.3 मिमी म्हणजेच सुमारे 24 टक्के अधिक पाऊस झाला आहे. जिल्ह्यातील मध्यम व लघु प्रकल्पांमध्ये सध्या एकूण 99 दशलक्ष घनमीटर म्हणजेच 72.79 टक्के उपयुक्त पाणीसाठा उपलब्ध असून, ही बाब जिल्ह्याच्या जलसुरक्षेच्या दृष्टीने समाधानकारक आहे.

उपलब्ध पाण्याचा सुयोग्य वापर आणि संवर्धन ही सर्वांची सामूहिक जबाबदारी आहे. त्यासाठी 15 ते 21 ऑगस्ट 2026 या कालावधीत ‘जलसंधारण सप्ताह’ साजरा करण्यात येत असून, 21 ऑगस्ट हा ‘जलसंधारण दिन’ म्हणून पाळण्यात येणार आहे. ‘पाणी अडवा, पाणी जिरवा’ हा मूलमंत्र स्वीकारून ‘माती वाचवा, पाणी जपा, सुरक्षित भविष्य घडवा’ हा संकल्प कृतीत उतरविण्याचे आवाहन त्यांनी केले.

शिक्षणातून महिला व आदिवासी विद्यार्थ्यांना नवी संधी

अनुसूचित जमातीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘प्रकाशवाटा 2026’ अंतर्गत NEET, JEE (Main) आणि MHT-CET यांसारख्या स्पर्धात्मक परीक्षांसाठी विनामूल्य निवासी प्रशिक्षण उपलब्ध करून देण्यात आले आहे. जिल्हा परिषदेच्या ‘शिक्षणाची पुनर्संधी’ उपक्रमातून 470 महिला व मुलींनी दहावीची परीक्षा उत्तीर्ण केली आहे. संधी मिळाल्यास प्रत्येक व्यक्ती आपले भविष्य बदलू शकते, हा प्रेरणादायी संदेश या उपक्रमातून मिळत असल्याचे त्यांनी नमूद केले.

जिल्हा परिषदेने दिव्यांग व ज्येष्ठ नागरिकांना मोफत सहाय्यभूत साधनांचे वाटप, ग्रामीण महिला उद्योजिकांना ‘उमेद’च्या माध्यमातून प्रोत्साहन, प्रत्येक सोमवारी ‘नो व्हेईकल डे’ आणि कर्मचाऱ्यांना सेवानिवृत्तीच्या दिवशीच सेवालाभ देण्याचा ‘नंदुरबार पॅटर्न’ असे लोकाभिमुख आणि संवेदनशील उपक्रम राबविले आहेत.

प्रकाशा आणि तोरणमाळच्या विकासाला नवी दिशा

सन 2027 मधील सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर ‘दक्षिण काशी’ प्रकाशा येथे आवश्यक पायाभूत सुविधांसाठी ₹138.87 कोटींचा विशेष आराखडा तयार करण्यात आला आहे. तोरणमाळच्या सर्वांगीण विकासासाठी केंद्र शासनाच्या ‘स्वदेश दर्शन’ योजनेतून ₹78.09 कोटींचा प्रस्ताव तयार करण्यात आला आहे. या प्रकल्पांमुळे जिल्ह्याची धार्मिक, सांस्कृतिक आणि पर्यटन ओळख अधिक बळकट होऊन स्थानिक रोजगार, व्यवसाय आणि अर्थव्यवस्थेला चालना मिळेल.

नवापूरसह जिल्ह्यातील औद्योगिक क्षेत्र, वस्त्रोद्योग, सूक्ष्म व लघुउद्योग तसेच कृषी प्रक्रिया उद्योगांना चालना देऊन युवकांना स्थानिक पातळीवर रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देण्यासाठी शासन प्रयत्नशील असल्याचेही त्यांनी सांगितले.

नागरिकाभिमुख पोलीस व महसूल प्रशासन

नंदुरबार जिल्हा पोलीस दलाने कायदा व सुव्यवस्था राखण्याबरोबरच नागरिकाभिमुख उपक्रमांना प्राधान्य दिले आहे. ‘मिशन सक्षम 3.0’च्या माध्यमातून युवकांना कौशल्य प्रशिक्षण आणि रोजगाराच्या संधी दिल्या जात आहेत. प्रत्येक पोलीस ठाण्यात ‘तक्रार निवारण दिन’, अधिकृत व्हॉट्सॲप चॅनेलद्वारे सूचना, सायबर व रस्ता सुरक्षेबाबत जनजागृती तसेच आदिवासी ढोलवादन स्पर्धेसारख्या उपक्रमांमुळे पोलीस आणि नागरिकांमधील विश्वास अधिक दृढ झाला आहे.

महसूल प्रशासन अधिक कार्यक्षम, पारदर्शक आणि तंत्रज्ञानस्नेही करण्यासाठी गेल्या सहा महिन्यांत 9 प्रशिक्षण सत्रांद्वारे 402 अधिकारी-कर्मचाऱ्यांना महसूलविषयक कायदे, कार्यालयीन कार्यपद्धती, डिजिटल प्रशासन आणि कृत्रिम बुद्धिमत्ता साधनांच्या वापराचे प्रशिक्षण देण्यात आले. नागरिकांना महसूल सेवा अधिक सुलभ व गतिमानपणे उपलब्ध करून देण्यासाठी 22 जुलै ते 2 ऑगस्ट 2026 या कालावधीत जिल्हाभर ‘छत्रपती शिवाजी महाराज राजस्व अभियान’ प्रभावीपणे राबविण्यात आले.

पावसाळ्यात अतिवृष्टी, पूर आणि दरडींसारख्या आव्हानांचा सामना करण्यासाठी प्रशासनाने सतर्कता, पूर्वतयारी आणि समन्वयावर भर दिला आहे. नागरिकांना वेळेवर सूचना देणे, धोकादायक ठिकाणी वाहतूक नियंत्रित करणे आणि आवश्यक प्रतिबंधात्मक उपाययोजना करण्यासाठी प्रशासन तत्पर असल्याचे पालकमंत्री मुश्रीफ यांनी सांगितले.

राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा जागर

राष्ट्रप्रेम आणि राष्ट्रीय एकात्मतेचा संदेश घराघरांत पोहोचविण्यासाठी जिल्ह्यात 9 ते 17 ऑगस्टदरम्यान ‘हर घर तिरंगा’ अभियान राबविण्यात येत आहे. ‘वंदे मातरम्’च्या 150 वर्षपूर्तीला समर्पित या अभियानांतर्गत सामूहिक गायन, प्रदर्शन, तिरंगी रोषणाई, रांगोळी आणि ‘सेल्फी विथ तिरंगा’ असे विविध उपक्रम आयोजित करण्यात आले आहेत. ‘विभाजन विभीषिका स्मृती दिना’निमित्त फाळणीतील पीडितांच्या त्याग, वेदना आणि धैर्याला अभिवादन करण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

स्वातंत्र्यदिनाच्या या पवित्र पर्वावर सर्वांनी एकत्र येऊन निरोगी, सुशिक्षित, जलसमृद्ध, कृषिसंपन्न, रोजगारक्षम, सुरक्षित आणि विकसित नंदुरबार घडविण्याचा संकल्प करूया, असे आवाहन पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी केले.

यांचा झाला सन्मान – 

जिल्ह्यामध्ये उत्कृष्ट प्रशासकीय कामकाज

जिल्हाधिकारी डॉ. मित्ताली सेठी, मुख्‍य कार्यकारी अधिकारी नमन गोयल व पोलीस अधीक्षक अश्विनी संतोष सानप.

महसूल विभागात सन 2025-26 या वर्षात उत्कृष्ट कार्य केलेल्या अधिकारी/कर्मचारी

उपजिल्हाधिकारी (महसूल) प्रमोद बाळासाहेब भामरे, नायब तहसीलदार राजेश मधुकर अमृतकर,जुबेर मुनाफ पठाण, भाऊराव भांगरे, मंडळ अधिकारी, चंद्रज्योती भुरेसिंग नायक वळवी, संदिप समशोन वळवी सहाय्यक महसूल अधिकारी मयूर शिवाजी निकुम, किरण अशोकराव साळवे, राजकुमार काशीराम सुरवाडे, निलय प्रदीप पाटील, ग्राम महसूल अधिकारी,अक्षय शिरीष वसावे, वैशाली बापूराव पवार व शिपाई भटु तुळशीराम भिल.

जिल्हा सरकारी अभियोक्ता ॲड. विनोद रमेशगिर गोसावी.

पोलीस विभाग

पोलीस निरीक्षक निलेश रविंद्र देसले, अभिषेक दिलीप पाटील, बापु निंबा वाघ, भटु शांतिलाल धनगर व मोहन पांडुरंग ढमढेरे पोलीस उपअधीक्षक निवृत्ती गंगाराम पवार व दिपक बाळकृष्ण गोरे.

जिल्हा परिषद

जिल्हा आरोग्य अधिकारी रविंद्र भिकाजी सोनवणे मुख्याध्यापक मनिलाल लालसिंग नावडे व प्राथमिक शिक्षक संदिप एकनाथ फुंदे.

शिष्यवृत्ती परीक्षा गुणवत्ता यादी प्राप्त विद्यार्थीकु.संस्कार निर्मलकुमार जैन.

सामाजिक वनीकरण विभाग

वनमजूर सुखलाल पावरा, गजानन शिंपी, वनरक्षक भूपेश तांबोळी, वनपाल मनीषा मराठे.

००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *