मुंबई, दि ६ : राज्यातील औद्योगिक क्षेत्र अधिक सुरक्षित, सक्षम आणि कौशल्याधारित बनविण्याच्या दृष्टीने नागपूर येथे अत्याधुनिक बाष्पके (बॉयलर) प्रशिक्षण केंद्र उभारण्याच्या प्रक्रियेला गती देण्यात येणार असल्याची माहिती राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी दिली. बाष्पके विभागामार्फत कौशल्यविकास प्रशिक्षण आयोजित करण्यासंदर्भात मंत्रालयात आयोजित महत्त्वपूर्ण बैठकीत त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले.
बैठकीत बाष्पके संचालनालयाचे बळकटीकरण, कायद्याची प्रभावी अंमलबजावणी तसेच प्रशिक्षण व्यवस्थेचा विस्तार याबाबत सविस्तर आढावा घेण्यात आला. बाष्पके संचालनालयामार्फत दरवर्षी बाष्पक निर्माते, वापरकर्ते, अभियंते, बाष्पक प्रचालन अभियंते आणि बाष्पक परिचर यांच्यासाठी बाष्पकाचा सुरक्षित व कार्यक्षम वापर याबाबत जनजागृती कार्यक्रम आयोजित करण्यात येतो. या अंतर्गत विविध चर्चासत्रे, तांत्रिक मार्गदर्शन सत्रे तसेच औद्योगिक सुरक्षिततेविषयी प्रशिक्षण दिले जाते.
तसेच संचालनालयामार्फत दरवर्षी बाष्पक परिचर क्षमता प्रमाणपत्र परीक्षा व बाष्पक प्रचालन अभियंता नैपुण्य प्रमाणपत्र परीक्षा आयोजित करण्यात येत असून, उद्योग क्षेत्रासाठी प्रशिक्षित व कुशल मनुष्यबळ निर्माण करण्याचे महत्वपूर्ण कार्य करण्यात येत आहे.
यावेळी नागपूर येथे सहसंचालक, बाष्पके संचालनालय यांच्या स्तरावर प्रशिक्षण केंद्र उभारण्याचा प्रस्ताव सादर करण्यात आला. प्रस्तावित केंद्रात प्रथम व द्वितीय श्रेणी बाष्पक परिचरांसाठी रिफ्रेशर कोर्स, बाष्पक प्रचालन अभियंत्यांसाठी रिफ्रेशर कोर्स, आय.बी.आर. वेल्डर सर्टिफिकेशन कोर्स तसेच इंसुलेशन व रिफ्रॅक्टरी विषयक विशेष प्रशिक्षण अभ्यासक्रम राबविण्यात येणार आहेत. या माध्यमातून विदर्भासह राज्यातील युवकांना रोजगाराभिमुख तांत्रिक प्रशिक्षणाची मोठी संधी उपलब्ध होणार आहे.
बैठकीत राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी नागपूर येथे प्रस्तावित इमारतीच्या बांधकामाचा दर्जा, आराखडा आणि प्रशिक्षण सुविधांबाबत सविस्तर माहिती घेण्याच्या सूचना दिल्या. इमारतीच्या बांधकामादरम्यान फायर सेफ्टी ऑडिट अनिवार्यपणे करण्याचे निर्देश देत सुरक्षिततेच्या सर्व निकषांचे काटेकोर पालन करण्यावर त्यांनी भर दिला.
तसेच प्रशिक्षण व प्रमाणपत्र प्रक्रियेमध्ये विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण सुविधा उपलब्ध करून देण्यास प्राधान्य देत प्रकल्प पूर्णत्वाचा कालावधी, टप्पे आणि अंमलबजावणीबाबत सविस्तर अहवाल सादर करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.
या उपक्रमाबाबत केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनीही प्रस्तावित अत्याधुनिक बाष्पके प्रशिक्षण केंद्र हे विदर्भासह राज्यातील औद्योगिक व कौशल्यविकास क्षेत्रासाठी अत्यंत महत्त्वाचे ठरणार असल्याचे मत व्यक्त केले. तसेच युवकांना आधुनिक तांत्रिक प्रशिक्षण, प्रमाणपत्र सुविधा आणि रोजगाराभिमुख कौशल्य उपलब्ध करून देण्याच्या दृष्टीने प्रकल्पाला प्राधान्याने पुढे नेण्याचे निर्देशही त्यांनी दिले असल्याची माहिती राज्यमंत्री ॲड.जयस्वाल यांनी यावेळी दिली.
“राज्यातील औद्योगिक विकासासोबत कुशल मनुष्यबळ निर्माण करणे ही काळाची गरज आहे. प्रस्तावित प्रशिक्षण केंद्रामुळे बाष्पक क्षेत्रातील कौशल्यविकासाला चालना मिळून औद्योगिक सुरक्षिततेतही लक्षणीय वाढ होईल,” असा विश्वास राज्यमंत्री ॲड. आशिष जयस्वाल यांनी व्यक्त केला.
या बैठकीस कामगार विभागाचे उपसंचालक दिपक पोकळे, बाष्पके संचालनालयाचे संचालक धवल औतापुरकर, सहसंचालक गजानन वानखेडे, उपसंचालक महेश देशमुख, उपसंचालक बी. बी. इंगळे तसेच संबंधित अधिकारी उपस्थित होते.
०००
दत्तात्रय कोकरे/विसंअ