तासगावातील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी तातडीने उपाययोजना कराव्यात – पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील

 मुंबई, दि. २९ : तासगाव नगरपरिषदेतील नागरिकांना नियमित व सुरळीत पाणीपुरवठा मिळावा यासाठी आवश्यक त्या सर्व तांत्रिक व प्रशासकीय उपाययोजना तातडीने राबवाव्यात, असे निर्देश पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले. मंत्रालयात तासगाव नगरपरिषदेतील पाणीपुरवठ्याच्या सद्यस्थितीचा आढावा घेण्यासाठी आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस माजी खासदार संजयकाका पाटील, जलजीवन मिशनचे अभियान संचालक ए. रंगानायक, सहसचिव गीता कुलकर्णी, मुख्य अभियंता प्रशांत भांबरे तसेच संबंधित विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी पाणीपुरवठा व्यवस्थेतील अडचणींचा सविस्तर आढावा घेतला. पाईपलाईनच्या कामातील त्रुटी, पंपिंग यंत्रणेतील अडथळे तसेच इतर तांत्रिक अडचणी तातडीने दूर करून नागरिकांना नियमित पाणीपुरवठा मिळेल याची दक्षता घ्यावी. संबंधित यंत्रणांनी समन्वयाने काम करून पाणीपुरवठा यंत्रणा सक्षम करण्यावर भर द्यावा, असेही निर्देश त्यांनी दिले.

जलजीवन मिशन अंतर्गत सुरू असलेल्या योजनांची प्रभावी अंमलबजावणी करून तासगाव शहरातील पाणी समस्येचे दीर्घकालीन समाधान करण्यासाठी नियोजनबद्ध उपाययोजना करण्याचे निर्देश  पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांनी दिले.

0000

राजू धोत्रे/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *