जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही’ युवा संगीत महोत्सवाचे आयोजन

मुंबई, दि. १९ : महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने जागतिक संगीत दिनानिमित्त ‘आरोही – अ फेस्टिव्हल ऑफ रायझिंग स्टार्स’ या विशेष सांगीतिक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. ग्रेस फाउंडेशनच्या सहकार्याने आयोजित करण्यात आलेला हा महोत्सव युवा आणि होतकरू संगीत कलाकारांना व्यासपीठ उपलब्ध करून देणारा महत्त्वपूर्ण सांस्कृतिक उपक्रम ठरणार आहे.

२००२ पासून सुरू असलेल्या ‘आरोही’ या संगीत महोत्सवाने गेल्या २४ वर्षांत १३८ हून अधिक युवा संगीतकारांना आपली कला सादर करण्याची संधी उपलब्ध करून दिली आहे. भारतीय शास्त्रीय संगीत, गायन आणि वाद्यसंगीताच्या परंपरेला प्रोत्साहन देत नवोदित कलाकारांना प्रेक्षकांसमोर सादरीकरणाची संधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा महोत्सव आयोजित करण्यात येतो.

हा संगीत महोत्सव बुधवार, २० मे २०२६ आणि गुरुवार, २१ मे २०२६ रोजी सायंकाळी ६ वाजल्यापासून रवींद्र नाट्यमंदिर, प्रभादेवी, मुंबई येथील मिनी थिएटरमध्ये रंगणार आहे. कार्यक्रमास प्रवेश विनामूल्य असून संगीतप्रेमी नागरिकांसाठी ही एक विशेष सांगीतिक पर्वणी ठरणार आहे.

२० मे रोजी चैतन्य परब (गायन), दिव्यांश श्रीवास्तव (संतूर) आणि आद्या मुखर्जी (गायन) हे युवा कलाकार आपली कला सादर करणार आहेत. तसेच २१ मे रोजी स्वाती तिवारी (गायन), सम्यक पराशरी (बासरी) आणि अभेद अभिषेकी (गायन) यांचे सादरीकरण होणार आहे. या कार्यक्रमात यती भागवत, स्वप्नील भिसे, रोहित देव, मनोज सोलंकी, सुधांशू घारपुरे आणि ज्ञानेश्वर सोनवणे हे सहकलाकार सहभागी होणार आहेत.

हा कार्यक्रम ॲड. आशिष शेलार, मंत्री (सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता), महाराष्ट्र राज्य यांच्या संकल्पनेतून तसेच डॉ. किरण कुलकर्णी, सचिव, सांस्कृतिक कार्य विभाग यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे. सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने कार्यक्रमाचे नियोजन करण्यात आले असून महाराष्ट्राच्या समृद्ध संगीत परंपरेचा वारसा जतन व संवर्धित करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम राबविण्यात येत आहे.

सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी संगीत, कला व संस्कृतीप्रेमी नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या विशेष सांगीतिक महोत्सवाचा लाभ घ्यावा, असे आवाहन केले असून उपक्रमास नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभेल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

000

संजय ओरके/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *