जनसंपर्क क्षेत्राच्या प्रभावी वापरातून परिणामकारक प्रचार-प्रसिद्धी शक्य; जनसंपर्कातील नव्या तंत्रज्ञानावर राष्ट्रीय परिषदेत चर्चा

नवी दिल्ली, दि. १० : माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या नवी दिल्ली येथील महाराष्ट्र परिचय केंद्रामार्फत ९ व १० एप्रिल २०२६ यादरम्यान राष्ट्रीय जनसंपर्क परिषद-२०२६ चे आयोजन करण्यात आले आहे. या परिषदेच्या पहिल्या दिवशी झालेल्या चार सत्रांमधून जनसंपर्क क्षेत्रातील नवनवीन तंत्रज्ञान आणि त्याच्या वापरासंबंधी चर्चा करण्यात आली.

परिषदेच्या पहिल्या दिवशी बीबीसीचे आऊटपुट एडिटर (भारतीय भाषा) शशांक चव्हाण यांनी बातमी निर्मिती, संपादन आणि वितरणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेच्या (एआय) वापरासंबंधी मार्गदर्शन केले. पत्रकारिता आणि जनसंपर्क क्षेत्राचा वेग कित्येक पटीने वाढला असून आपले काम प्रभावी आणि परिणामकारक होण्यासाठी एआयचा चांगला उपयोग होऊ शकतो. आपला संदेश लोकांपर्यंत प्रभावीपणे पोहोचविण्यासाठी अधिकाधिक क्रिएटिव्ह्जचा वापर करून त्यांची एंगेजमेंट वाढविण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे. समाज आणि डिजिटल माध्यमांच्या वाढत्या वापराच्या काळात माहितीची सत्यता तपासण्याचे मोठे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर जनसंपर्क अधिकाऱ्यांची जबाबदारी वाढली असून त्यासाठी फॅक्ट चेक सारख्या बाबींवर भर देणे आवश्यक असल्याचेही श्री. चव्हाण यांनी यावेळी सांगितले.

गुगल इंडियाचे प्रतिनिधी करणपाल सिंग झुल्का, धर्मेश महामवाल आणि विकास यादव यांनी दुसऱ्या सत्रात ‘डिजिटल ट्रान्स्फॉर्मेशन ऑफ गव्हर्नन्स कम्युनिकेशन’ या विषयावर सविस्तर चर्चा केली. इलेक्ट्रॉनिक माध्यमांबरोबरच वाढत्या डिजिटल माध्यमांबाबत त्यांनी यावेळी माहिती दिली. पूर्वीच्या तुलनेत इंटरनेटचे दर मोठ्या प्रमाणात स्वस्त झाल्याने इंटरनेटचा वापर लक्षणीयरित्या वाढला आहे. गुगल इंडियाच्या विविध प्लॅटफॉर्मचा वापर करून शासकीय माहिती अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवली जाऊ शकते, असे त्यांनी यावेळी सांगितले.

मेटा कंपनीचे आशीष पांडे, नेहा माथूर यांनी ‘डिजिटल ट्रान्सफॉर्मेशन विथ मेटा’ या विषयावर माहिती दिली. चांगल्या क्रिएटिव्ह्जच्या माध्यमातून शासकीय संदेश अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचविण्यासाठी मेटाच्या प्लॅटफॉर्मचा वापर करावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

राष्टीय जनसंपर्क परिषदेत सहभागी झालेल्या गुजरात, राजस्थान, पंजाब, आंध्र प्रदेश आणि कर्नाटक या राज्यांच्या प्रतिनिधींनी ‘बेस्ट प्रॅक्टीसेस इन इंडिया’ या विषयांतर्गत जनसंपर्कासाठी वापरलेल्या प्रभावी पद्धतींचे यावेळी सादरिकरण केले. या सत्राचे अध्यक्षस्थान कर्नाटक जनसंपर्क संचालनालयाचे आयुक्त हेमंत निंबाळकर यांनी भूषविले. विविध राज्यांनी राबविलेल्या जनसंपर्काच्या प्रभावी पद्धतींचा प्रत्येक राज्याने आपल्या राज्यासाठी करावा, असे आवाहन श्री. निंबाळकर यांनी यावेळी केले.

********

महाराष्ट्र परिचय केंद्र, नवी दिल्ली-वृत्त विशेष – 93/ दि.10.04.2026

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *