चौकीदार भरती जाहिरात दुरुस्त करण्याचे आदिवासी विकास मंत्री अशोक वुईके यांचे निर्देश

मुंबई, दि. २८ : आदिवासी विकास विभागाच्या नाशिक येथील आयुक्तालयाने २७ एप्रिल २०२६ रोजी प्रसिद्ध केलेल्या चौकीदार पदांच्या जाहिरातीत अनुसूचित जमाती (एसटी) संवर्गासाठी एकही पद राखीव नसल्याचे समोर आल्यानंतर आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी तातडीने हस्तक्षेप करत संबंधित अधिकाऱ्यांना जाहिरात दुरुस्तीचे निर्देश दिले.

मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी विभागाचे सचिव व आयुक्त यांच्यासोबत व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक घेतली. या बैठकीत २० नोव्हेंबर २०२५ च्या शासन निर्णयातील तरतुदींचा सखोल अभ्यास करून जाहिरात दुरुस्त करण्याचे आणि तत्काळ सुधारित जाहिरात प्रसिद्ध करण्याचे आदेश देण्यात आले.

मंत्री डॉ. अशोक वुईके म्हणाले, चौकीदार पदांच्या भरतीसाठी शुद्धीपत्रक काढण्यात येणार असून, अनुसूचित जमाती उमेदवारांवर होणारा अन्याय दूर केला जाणार आहे. तसेच, अट्रॉसिटी कायद्यांतर्गत पीडितांच्या वारसदारांना शासकीय सेवेत संधी देण्यासाठी विशेष उपाययोजना करण्यात आली आहे. आदिवासी विकास विभागातील वर्ग-४ मधील १५१ पदे पुनरुज्जीवित करून एकदाच विशेष बाब म्हणून या पदांवर नियुक्त्या केल्या जाणार आहेत. या सुधारित प्रक्रियेत अनुसूचित जमाती उमेदवारांसाठी पदे राखीव ठेवण्यात येणार आहेत.

अनुसूचित जमाती उमेदवारांवर कोणताही अन्याय होऊ दिला जाणार नाही. त्यामुळे कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये,” असे आवाहन मंत्री डॉ. अशोक वुईके यांनी केले आहे.

0000

शैलजा पाटील/विसंअ

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *