गणेशोत्सवाचे ‘वैश्विक अद्वितीय मूल्य’ अधोरेखित करुया – मंत्री ॲड. आशिष शेलार

मुंबई, दि, . १८ : आपला गणेशोत्सव हा वैश्विक अद्वितीय मूल्य असलेला उत्सव असून त्यामुळेच त्याला राज्य महोत्सवाचा दर्जा शासनाने दिला आहे. आता यापुढील काळात विविध आकडेवारीचे संकलन व विश्लेषण करुन या उत्सवाची अभ्यासपूर्ण नियोजनबध्द मांडणी जगासमोर करुन पौराणिक, ऐतिहासिक, सामाजिक चळवळीची 100 वर्षाहून अधिक परंपरा असलेल्या या उत्सवाचे वैश्विक अद्वितीय मूल्य जगासमोर आणूया, असे आवाहन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी केले

गणेशोत्सवाला राज्य महोत्सवाचा दर्जा दिल्यानंतर उत्सवाचे हे दुसरे वर्षे असून, महाराष्ट्रासह जगभर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवामध्ये सुसूत्रता यावी व नियोजनबद्ध उत्सव साजरा व्हावा या दृष्टीने सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड. आशिष शेलार यांनी याबाबत पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी येथे दोन वेगवेगळ्या बैठका घेतल्या. सांस्कृतिक कार्य विभाग व सर्व जिल्हाधिकारी व राज्याचे पोलीस, वाहतूक व जिल्हाधिकाऱ्यांची बैठकीत उत्सव आयोजनाबाबत महत्त्वाच्या सूचना केल्या. तर दुसरी बैठक गणेशोत्सव समन्वय महासंघ, समन्वय समिती, मूर्तीकार संघ यांच्यासह महापालिका, पोलीस, एसटी महामंडळ, रेल्वे, पोलीस तसेच सांस्कृतिक कार्य विभाग यांची संयुक्त बैठक मंत्री शेलार यांनी घेऊन गणेशोत्सवाबाबत येणाऱ्या अडचणी, समजून घेऊन अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना दिल्या.

यावेळी अधिकाऱ्यांना सूचना करताना मंत्री शेलार यांनी सांगितले की, गतवर्षीपर्यंत आपण शासन म्हणून परवानगी देणारे होतो, पण आता आपण राज्य महोत्सव म्हणून गणेशोत्सवाला दर्जा दिल्यामुळे शासनसुध्दा आयोजक आहे. त्या पध्दतीने आता काम करणे आवश्यक आहे. एकाचवेळी एवढ्या मोठ्या प्रमाणात जगभर साजरा होणाऱ्या गणेशोत्सवात वैश्विक अद्वितीय मुल्यं आहेत. आता आपणाला याबाबत एक सुसूत्रता आणून त्यामधील उपक्रम, कार्यक्रम वाढवून त्याचा डेटा शास्त्रशुध्द पध्दतीने संकलित करुन तो जगासमोर मांडण्याची गरज आहे. त्यादृष्टीने नियोजन व आयोजन करायचे आहे. याशिवाय सार्वजनिक स्वरूपात हा गणेशोत्सव आपण साजरा करत आहोतच पण महाराष्ट्रामधील असंख्य घराणी ही वर्षानुवर्ष घरगुती गणेश उत्सव अत्यंत नाविन्यपूर्ण आणि विविध सामाजिक उपक्रम राबवून साजरे करत आहेत. अशी घराणी आणि घरगुती गणेश उत्सव याबाबतची माहिती सुद्धा संकलित करून त्याची माहिती इंटरनेटच्या माध्यमातून जगभर पोहोचवणे आवश्यक आहे. त्या दृष्टीने नियोजन करा आणि ऑनलाईन दर्शन सुविधा आपण उपलब्ध करून दिली आहे त्यामध्ये राज्यातील जास्तीत जास्त गणेशोत्सव मंडळे आणि प्रसिद्ध गणेश मंदिरे सहभागी होतील याबाबत नियोजन करा अशा सूचना मंत्री शेलार यांनी केल्या.

जेणेकरुन आपण हा उत्सव वर्ल्ड युनोस्कोच्या यादीत मांडू शकू. त्यासाठी सगळ्यांची सहभागिता महत्त्वाची असून समन्वय ही आवश्यक आहे. यादृष्टीने जे उपक्रम राबवायचे आहेत त्याबद्दल सविस्तर सूचना शासकीय यंत्रणांना मंत्री, शेलार यांनी दिल्या. गणेशोत्सव मंडळे, समन्वय समिती, गणेशोत्सव महामंडळ आणि मुर्तीकार संघटना व शासन यामध्ये समन्वय रहावा म्हणून सांस्कृतिक कार्य विभागाच्या पुढाकाराने एक समन्वय समिती स्थापन करावी, असे निर्देश त्यांनी विभागाला दिले.

मूर्तिकारांना वेलिंग खातू पुरस्कार देणार

तसेच ज्या पध्दतीने मंडळांना पुरस्कार दिले जातात त्या पध्दतीने मूर्तीकार दिनानाथ वेलिंग आणि विजय खातू यांच्या नावाने “वेलिंग- खातू” असा पुरस्कार मूर्तीकारांना देण्यात येईल, अशी घोषणा ही मंत्री शेलार यांनी बैठकीत केली.

मुंबईत विसर्जनाप्रमाणे आगमन मिरवणूकीचे मार्ग, रस्त्यावरील खड्डे, मंडळांच्या परवानग्या याबाबत महापालिका, पोलीस यांनी तातडीने उपाययोजना कराव्यात. तसेच बेस्टने गणेशोत्सव काळात प्रसिद्ध गणेशोत्सव मंडळांच्या बाप्पांचे दर्शन घेण्यासाठी एका तिकीटात प्रवास करता येईल अशी विशेष सेवा सुरू करावी, रेल्वेने रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा उपलब्ध करुन देणे, कोकणात जाणाऱ्या प्रवाशांप्रमाणे मुंबई लोकलच्या विशेष लोकल सुरु कराव्यात, तसेच कोकणात जाणाऱ्या एसटीच्या प्रवासाचे ज्यांनी ग्रुप बुकिंग केले आहे, मात्र परतीचे त्यांचे बुकिंग नसेल तर सदर गाडी रिकामी परत आणावी लागत असल्याने एसटीने अशा भाड्यात 30% वाढ केली आहे. याबाबत महामंडळाने फेरविचार करावा अशी सूचना एसटी महामंडळाला केली. मुंबई महापालिकेने विसर्जन मार्गावर अतिरिक्त प्रकाशयोजना करावी तसेच जेलीफिशचा त्रास होणार नाही याबाबत ही आवश्यक त्या उपाययोजना करा अशा सूचना मंत्री शेलार यांनी केल्या.

तसेच उत्सव मंडळांनी आवश्यक ते नियम पाळा. शांततेने उत्सव पार पाडावा, आपल्या उत्सवाची परंपरा ही उज्वल आहे आता आपल्याला ती जगभर पोहोचवायची आहे त्या दृष्टीने सर्वांनी एकत्र येऊन उत्साहात आणि नियमांचे उल्लंघन न करता गणेशोत्सव साजरा करूया असे आवाहनही मंत्री शेलार यांनी यावेळी केले.

0000

संजय ओरके/विसंअ

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *