मुंबई, दि. २२ : महाराष्ट्राच्या समृद्ध संतपरंपरेचा, भक्तीसंगीताचा आणि वारकरी सांस्कृतिक वारशाचा जागर घडवून आणण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या सांस्कृतिक कार्य विभागांतर्गत सांस्कृतिक कार्य संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांच्या वतीने ‘गजर माऊलीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम शुक्रवार, २४ जुलै २०२६ रोजी सायंकाळी ६.०० वाजता परांजपे हॉल, भांडुप (पूर्व), मुंबई येथे होणार आहे.
महाराष्ट्राच्या सांस्कृतिक जीवनात संतपरंपरेला अनन्यसाधारण महत्त्व आहे. संत ज्ञानेश्वर महाराज, संत तुकाराम महाराज आणि संतपरंपरेतील अनेक संतांनी अभंग, ओवी, भारूड आणि भक्तिसंगीताच्या माध्यमातून समाजप्रबोधन तसेच अध्यात्मिक आणि सांस्कृतिक मूल्यांची जपणूक केली. या समृद्ध परंपरेचा भक्तिमय सांगीतिक आविष्कार ‘गजर माऊलीचा’ या कार्यक्रमातून सादर करण्यात येणार आहे.
‘सृजना – एक स्त्री प्रतिभा निर्मित’ यांच्या वतीने सादर करण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाचे निरूपण योगिता मानगेकर करणार आहेत. विभव सवदी, विद्या शिवलिंग, पल्लवी केळकर आणि रोहन आणचेकर हे गायक आपल्या सुरेल सादरीकरणातून संतवाणी, अभंग आणि भक्तिसंगीताची अनुभूती रसिकांना देणार आहेत. संतपरंपरेतील भक्तिरसपूर्ण रचना आणि माऊलीच्या नामगजरातून उपस्थित रसिकांना भक्तिमय वातावरणाचा अनुभव घेता येणार आहे. हा सांस्कृतिक उपक्रम सांस्कृतिक कार्य, इलेक्ट्रॉनिक्स, माहिती तंत्रज्ञान व कृत्रिम बुद्धिमत्ता मंत्री ॲड. आशिष शेलार यांच्या संकल्पनेतून तसेच सांस्कृतिक कार्य विभागाचे सचिव डॉ. किरण कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली आयोजित करण्यात आला आहे.
महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे जतन, संवर्धन आणि प्रसार करण्याबरोबरच संतपरंपरा, भक्तिसंगीत आणि लोकसंस्कृतीचा वारसा नव्या पिढीपर्यंत पोहोचविण्याच्या उद्देशाने सांस्कृतिक कार्य संचालनालयामार्फत विविध सांस्कृतिक कार्यक्रमांचे सातत्याने आयोजन करण्यात येत आहे. ‘गजर माऊलीचा’ या विशेष सांगीतिक कार्यक्रमास रसिकांसाठी विनामूल्य प्रवेश असून, मुंबईकरांनी या भक्तिमय सांस्कृतिक सोहळ्यास मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन सांस्कृतिक कार्य संचालनालयाचे संचालक श्रीराम पांडे यांनी केले आहे.
0000
संजय ओरके/विसंअ