मुंबई, दि. २२ : महात्मा ज्योतिराव फुले जनआरोग्य योजनेअंतर्गत किमान ६० टक्के उपचार शासकीय आरोग्य यंत्रणेच्या माध्यमातूनच झाले पाहिजेत, असे स्पष्ट निर्देश देत सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर म्हणाले राज्य आरोग्य हमी योजनेचा जास्तीत जास्त निधी शासकीय रुग्णालयांकडे वळविल्यास शासकीय आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. आरोग्य हमी सोसायटीची आढावा बैठक सार्वजनिक आरोग्य मंत्री आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात झाली. या बैठकीत ते बोलत होते. बैठकीला आरोग्य विभागाचे सचिव डॉ. निपुण विनायक, सचिव ई. रवींद्रन, आरोग्य सेवा आयुक्त संजय काटकर, राज्य आरोग्य हमी सोसायटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी अण्णासाहेब चव्हाण, राष्ट्रीय शहरी आरोग्य अभियानाचे आयुक्त डॉ. सुनील भोकरे उपस्थित होते. तर राज्यातील सर्व क्षेत्रीय व्यवस्थापक आणि जिल्हा समन्वयक दूरदृश्य प्रणालीद्वारे बैठकीत सहभागी झाले होते.
मंत्री आबिटकर म्हणाले, महात्मा फुले जनआरोग्य योजना ही खाजगी रुग्णालयकेंद्रित नसून जनताकेंद्रित योजना आहे. त्यामुळे नागरिकांना शासकीय आरोग्य संस्थांच्या माध्यमातूनच या योजनेचा जास्तीत जास्त लाभ मिळाला पाहिजे. शासनाच्या आरोग्य योजनांचा अधिकाधिक निधी शासकीय रुग्णालयांकडे वळल्यास आरोग्य विभागाची अंतर्गत यंत्रणा अधिक बळकट होईल. यासाठी क्षेत्रीय व्यवस्थापक आणि जिल्हा समन्वयकांनी प्रभावीपणे काम करून जिल्हा शल्यचिकित्सक व संबंधित अधिकाऱ्यांशी सातत्याने समन्वय ठेवावा. तसेच शासकीय रुग्णालयांतील क्लेम मंजुरीतील अडचणी तातडीने दूर करून योजनेची प्रभावी अंमलबजावणी सुनिश्चित करावी.
राज्य आरोग्य हमी सोसायटीच्या कामकाजात पारदर्शकता, उत्तरदायित्व आणि शासकीय आरोग्य संस्थांचे बळकटीकरण यावर विशेष भर देत प्रत्येक पात्र नागरिकापर्यंत गुणवत्तापूर्ण व मोफत आरोग्यसेवा पोहोचविण्यासाठी आणि आरोग्य यंत्रणा अधिक सक्षम करण्यासाठी आरोग्य यंत्रणेतील सर्वच घटकांनी संवेदनशीलपणे व समन्वयाने काम करावे, असे आवाहनही आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांनी केले.
0000
एकनाथ पोवार/स.सं.