मुंबई, दि. १२ : फॉरेस्ट इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (एफआयडीसी) स्थापन करण्याबाबत तसेच चंद्रपूर जिल्ह्यातील सावली तालुक्यात हत्ती, वाघ आणि इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे होणारे हल्ले व नुकसान रोखण्यासाठी आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करावा, अशा सूचना वनमंत्री गणेश नाईक यांनी दिल्या. यासंदर्भात त्यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयातील दालनात आढावा बैठक झाली. बैठकीस बल्लारपूरचे आमदार सुधीर मुनगंटीवार तसेच वन विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते.
एफआयडीसीच्या स्थापनेबाबत सविस्तर सादरीकरण करण्यात यावे. देशातील अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या उपक्रमाची प्रभावीपणे अंमलबजावणी करावी, अशी सूचना आमदार सुधीर मुनगंटीवार यांनी केली. वन विभागासाठी स्वतंत्र अभियांत्रिकी विभाग लवकरात लवकर सुरू करण्याबाबत कार्यवाही करावी आणि यासंदर्भातील आवश्यक सूचना आमदार मुनगंटीवार यांच्याकडून घेण्यात याव्यात, असे वनमंत्री नाईक यांनी सांगितले.
फर्निचर निर्मितीच्या क्षेत्रात महाराष्ट्राला मोठी संधी असून, राज्यात उत्पादित होणारे फर्निचर जगाच्या बाजारपेठेत पाठविता येऊ शकते, असे वनमंत्री गणेश नाईक यांनी सांगितले. कोकण, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भ या विभागांमध्ये या उपक्रमाची व्याप्ती वाढविण्याच्या शक्यता तपासाव्यात. त्यासाठी अद्ययावत माहिती घेऊन आधुनिक यंत्रसामग्री आणि तंत्रज्ञानाचा वापर करावा तसेच कामाला गती द्यावी, असे निर्देश त्यांनी दिले.
हत्तींच्या हालचालींचे अचूक ट्रॅकिंग करा
चंद्रपूर जिल्ह्यातील हत्तींची संख्या २३ वरून ३३ झाल्याची माहिती बैठकीत देण्यात आली. सावली तालुक्यात जंगली हत्तींचा कळप दाखल झाल्याने नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टीने विशेष उपाययोजना करण्याचे निर्देश वनमंत्री नाईक यांनी दिले.
हत्तींच्या हालचालींवर नियमित आणि अचूक पद्धतीने लक्ष ठेवावे. हत्तींच्या ट्रॅकिंगची संपूर्ण माहिती अद्ययावत ठेवून त्यानुसार प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. गस्तीसाठी तसेच वन्यप्राण्यांच्या हालचालींवर नियंत्रण ठेवण्यासाठी आवश्यक वाहने उपलब्ध करून द्यावीत. गरज भासल्यास नवीन वाहने खरेदी करण्याची कार्यवाही तातडीने करावी, असे निर्देश त्यांनी दिले.
हत्ती, वाघ तसेच इतर हिंस्त्र वन्यप्राण्यांमुळे नागरिक आणि शेतकऱ्यांचे नुकसान होणार नाही, यासाठी प्रभावी प्रतिबंधात्मक उपाययोजना कराव्यात. वन्यप्राण्यांच्या हल्ल्यांमध्ये होणाऱ्या नुकसानीची नुकसानभरपाई संबंधितांना वेळेत मिळेल, याची दक्षता घ्यावी. धोकादायक ठिकाणी गस्तीसाठी किंवा इतर कामांसाठी जाणाऱ्या वन कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी त्यांना इलेक्ट्रिक स्टिक उपलब्ध करून द्याव्यात, अशी सूचनाही वनमंत्री गणेश नाईक यांनी केली.
वन्यप्राणी नियंत्रण आणि जनसुरक्षेसाठी नवीन तंत्रज्ञानाचा प्रभावीपणे स्वीकार करून वन्यजीव संरक्षणासोबतच नागरिकांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य देत तातडीने कार्यवाही करावी, असे निर्देश वनमंत्री गणेश नाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.
0000
नंदकुमार वाघमारे/विसंअ