उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत(दादा) पाटील यांनी साधला विद्यार्थ्यांशी थेट संवाद

मुंबई, दि. १२ : उच्च शिक्षणाच्या विविध योजना, शिक्षणातील पारदर्शकता, करिअर मार्गदर्शन, परीक्षा सुरक्षा आणि सामाजिक जबाबदारी अशा विविध विषयांवर विद्यापीठ व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांशी उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी थेट संवाद साधला. मंत्रालयात उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी  विद्यार्थ्यांशी मनमोकळा संवाद साधला. या संवादातून विद्यार्थ्यांनी शासनाच्या योजना अधिक प्रभावीपणे तळागाळापर्यंत पोहोचविण्यासह युवकांचा धोरणनिर्मिती प्रक्रियेतील सहभाग वाढविण्यासाठी विविध अभ्यासपूर्ण सूचना मांडल्या.

विद्यार्थ्यांनी शासनाच्या विविध योजना, अनुदाने व सवलती यांची माहिती अधिक व्यापकपणे सर्वसामान्यांपर्यंत पोहोचण्याची गरज व्यक्त केली. धोरणे जाहीर झाल्यानंतर त्यांचा प्रत्यक्ष लाभ नागरिकांपर्यंत पोहचवण्यासंदर्भात विश्वास, पारदर्शकता आणि प्रभावी संवाद निर्माण होणे आवश्यक असल्याचे विद्यार्थ्यांनी नमूद केले. विद्यार्थ्यांनी नवीन कायदे, निर्णय किंवा शैक्षणिक धोरणांबाबत युवकांची मते जाणून घेण्यासाठी ‘ओपिनियन पोल’ किंवा डिजिटल अभिप्राय यंत्रणा विकसित करण्याची सूचनाही केली. शासनाच्या विविध पोर्टलवर विद्यार्थ्यांना आपली मते नोंदविता येतील, अशी अधिक सुलभ व्यवस्था असावी, असे मत चर्चेदरम्यान व्यक्त करण्यात आले.

उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी विद्यार्थ्यांच्या सूचनांचे स्वागत केले. विद्यार्थ्यांनी आपल्या अपेक्षा मनमोकळेपणे व्यक्त कराव्यात, मात्र सोबतच युवकांनी नेतृत्व घेऊन शासनाच्या उपक्रमांचा अभ्यास करावा, असे आवाहनही केले. आजच्या डिजिटल युगात उपलब्ध माहितीचा उपयोग करून महाराष्ट्र शासनाच्या योजना, उपक्रम आणि त्यांच्या लाभार्थ्यांची माहिती संकलित करून विद्यार्थ्यांनी दस्तऐवज अथवा माहितीपुस्तिका तयार करावी, अशी सूचनाही त्यांनी केली. मंत्री पाटील म्हणाले, विद्यार्थ्यांनी प्रत्यक्ष समाजात जाऊन सामाजिक प्रश्नांचा अनुभव घ्यावा. प्रत्येक विद्यार्थ्याने आठवड्यातून किमान एक तास सामाजिक कार्यासाठी द्यावा. या माध्यमातून विद्यार्थ्यांनी ठोस सामाजिक उपक्रम हाती घेतल्यास त्यांना आवश्यक ते सर्व सहकार्य, तसेच आर्थिक पाठबळही देण्याची शासनाची तयारी असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

संवादादरम्यान मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी उच्च शिक्षणासाठी राबवल्या जाणाऱ्या विविध सवलती व योजनांची सविस्तर माहिती दिली. प्रत्येक कॉलेजमध्ये महिला प्राध्यापकांच्या नेतृत्वाखाली ‘नोडल कमिटी’ स्थापन करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच व्हॉट्सॲप आणि डिजिटल माध्यमांतून विद्यार्थ्यांपर्यंत ही माहिती थेट पोहोचवण्याची यंत्रणाही उभारली जात असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. स्पर्धा परीक्षा आणि सीईटी परीक्षांच्या सुरक्षेबाबत विचारलेल्या प्रश्नावर अधिकाऱ्यांनी विद्यार्थ्यांना आश्वस्त केले. राज्य सरकार आणि सीईटी सेलने सुरक्षेसाठी ७३ हून अधिक बिंदू निश्चित केले आहेत. सायबर सुरक्षा यंत्रणांच्या मदतीने मानवी हस्तक्षेप कमी करून परीक्षा अधिक पारदर्शक आणि सुरक्षित करण्यावर भर दिला जात असल्याचे यावेळी स्पष्ट करण्यात आले.

विद्यार्थ्यांच्या सर्व प्रश्नांची समाधानकारक उत्तरे देत मंत्री चंद्रकांतदादा पाटील म्हणाले नशा मुक्ती, महाविदयालयातील विद्यार्थ्यांचे मानसिक आणि भावनिक स्वास्थ, रस्ते सुरक्षा ,एकल पाल्यांच्या समस्या, NSS, NCC मधील सहभाग ,शासनाच्या योजनांच्या अंमलबजावणीतील वास्तव, माहितीतील दरी आणि लोकसहभागाचे महत्त्व स्पष्ट करत मंत्रालयातील हा संवाद विद्यार्थ्यांसाठी शासनव्यवस्थेचे प्रत्यक्ष आकलन करून देणारा आणि सामाजिक बांधिलकीची जाणीव दृढ करणारा ठरेल.

00000

काशीबाई थोरात/विसंअ

 

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *