पूरपरिस्थिती बिकट झाली तरी घाबरून न जाता सर्व मिळून सामोरे जाऊ – पालकमंत्री हसन मुश्रीफ

पूर निवारणासाठी प्रशासनाकडून तयारीला सुरूवात

कोल्हापूर, दि.27 : कोल्हापूर जिल्ह्यात आलेली अभूतपूर्व पुरपरिस्थिती लक्षात घेऊन पूरग्रस्तांचे पुनर्वसन जलदगतीने व्हावे ह्या उद्देशाने कोल्हापूर जिल्ह्यातील महापुरात देण्यात येणाऱ्या विविध मदतकार्याच्या अनुषंगाने जिल्ह्यातील विविध संघटना, व्यावसायिकांसोबत नियोजन बैठक पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी जिल्हाधिकारी कार्यालयात घेतली. पूर निवारणासाठी प्रशासनाकडून जय्यत तयारीला सुरूवात झाली असून घरांची पडझड, शेतीचे नुकसान तसेच इतर पुरग्रस्तांना पुरामुळे झालेला त्रास याबाबत प्रशासनाकडून पंचनामे करण्याचे आणि नागरिकांना मदत देण्याचे कार्य गतीने सुरू आहे. ताराराणी सभागृहात झालेल्या बैठकीत पालकमंत्री मुश्रीफ यांनी सर्व  उपस्थित संघटना, व्यावसायिकांना पुरस्थितीतून सावरण्यासाठी आपण सर्व मिळून प्रयत्न करू असे आवाहन केले. ते म्हणाले, पुरस्थिती बिकट झाली तरी जिल्हावासियांनी घाबरून न जाता सर्व मिळून त्याला सामोरे जावू. अलीकडील काळात दर दोन वर्षाला आपणाला या परिस्थितीला सामोरे जावे लागत आहे. आपण यामध्ये आता अनुभवी झालो आहे. मात्र पुरग्रस्तांना चांगल्या प्रकारे मदत व्हावी, या उद्देशाने आपल्या मदतीने व प्रशासनामार्फत नियोजन केले जाईल. यावेळी जिल्हाधिकारी अमोल येडगे, महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी, मुख्य कार्यकारी अधिकारी एस. कार्तिकेयन, अपर जिल्हाधिकारी संजय शिंदे, आपत्ती व्यवस्थापन अधिकारी प्रसाद संकपाळ आदी उपस्थित होते.

मागील पुरस्थितीत क्रिडाईच्या पुढाकाराने कोल्हापूर डिझास्टर मॅनेजमेंट ग्रुपची स्थापना झाली असून कोल्हापुरातील मेडिकल असोसिएशन, पत्रकार संघ, हॉटेल मालक संघ, आयटी, व्हाईट आर्मी, अर्थ मुव्हींग यासह बहुतेक असोसिएशन, सोशल ग्रुप्स, एनजीओ, समाजसेवी संस्था, समाजसेवक एकाच व्यासपीठावर आले होते. तसेच आताही मदत कार्य व्हावे यासाठी जिल्हाधिकारी यांनी प्रशासनाच्या मदतीने पुरपश्चात मदतकार्याला सुरूवात केली आहे. शहरातील मदत कार्यात सुसूत्रता आणणे, पुरग्रस्तांसाठी जलदगतीने सहाय्य उपलब्ध करून देणे, जिल्हा प्रशासन-पोलीस व महानगरपालिका, जिल्हा परिषद आदी संस्थाना सहाय्य करणे, पूर ओसरल्यावर काय करावे व काय करू नये याचे प्रबोधन करणे, विविध स्वयंसेवक, स्वयंसेवी संस्था यांच्यामध्ये सुसूत्रता आणून त्यांची सेवा व माहिती गरजू पुरग्रस्त व नागरिकांपर्यंत पोहोचवणे व दानशूर व्यक्ती, ग्रुप्स, संस्थातर्फे येणारे धान्य,वस्तू, कपडे एकाच ठिकाणी गोळा करणे व वाटप करणे इत्यादी उद्देश या बैठकीत चर्चेला होते. यानुसार इच्छुक संघटनांची नियोजन बैठक रविवारी जिल्हाधिकारी कार्यालयात घेण्याचे यावेळी ठरले. महानगरपालिका आयुक्त के.मंजूलक्ष्मी यांनी शहरातील मदतीबद्दल माहिती दिली. त्या म्हणाल्या, कालपासून मोठ्या प्रमाणात दानशूर व्यक्ती मदत करीत आहेत. आता पूर ओसरत जाईल तसे स्वछता कामी आम्हाला मदत लागेल. याबाबत ज्यांना सहकार्य करायचे आहे त्यांनी प्रशासनाशी संपर्क साधावा.

जिल्हाधिकारी अमोल येडगे यांनी बैठकीचा उद्देश सांगून पुरस्थितीदरम्यान व पुरस्थिती पश्चात मोठ्या प्रमाणात प्रशासनाला सहकार्य लागते. तेच सहकार्य चांगल्या प्रकारे नियोजन करून सुत्रबद्ध केले तर चांगल्या प्रकारे नागरिकांना मदत देता येईल. चांगल्या समन्वयातून आवश्यक मदत योग्य ठिकाणी पोहचण्यासाठी प्रशासन एक केंद्र किंवा यंत्रणा उभारेल. तिथून मदतकार्याचे नियोजन करु. कोल्हापूर शहरासह शिरोळ तसेच हातकणंगले येथील पुरग्रस्तही समोर ठेवून मदतकार्य करण्याचे आवाहन त्यांनी यावेळी केले. जेवण, आरोग्य सुविधा, जनावरांना चारा यासह पशुंचे आरोग्य व पुरपश्चात सेवा यात स्वच्छता, किटकनाशक फवारणी आदी कामांचा समावेश आहे. यातून निश्चितच कमी वेळेत आपण पुरग्रस्त नागरिकांचे जीवनमान पुर्वपदावर आणू.

***

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *