कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांची शहीद स्मारक येथे हुतात्म्यांना श्रद्धांजली

मुंबई, ‍‍दि. २६: कारगिल विजय दिनानिमित्त राज्यपाल रमेश बैस यांनी आज कुलाबा येथील शहीद स्मारक येथे पुष्पचक्र अर्पण करून हुतात्म्यांना श्रद्धांजली वाहिली. यावेळी शोक शस्त्र धून वाजविण्यात आली व हुतात्म्यांना सलामी देण्यात आली .

कार्यक्रमाला महाराष्ट्र, गुजरात व गोवा विभागाचे जनरल ऑफिसर कमांडिंग ले. जन. पवन चड्ढा, पश्चिम  मुख्यालयाचे मुख्य ध्वज अधिकारी व्हाईस ऍडमिरल संजय जे. सिंह, मे. जन. बिक्रम दीपसिंह, माजी जीओसी ले. जन. एच. एस. केहालों  तसेच सैन्य दलातील आजी व माजी वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

राज्यपालांच्या हस्ते यावेळी देशासाठी लढताना युद्धभूमीवर हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवानांच्या कुटुंबातील ११ वीर नारींचा सत्कार करण्यात आला. भारतीय सैन्याने कारगिल युद्धात आपल्या अतुलनीय शौर्याचा परिचय देत देशाच्या इतिहासात आपले नाव सुवर्णाक्षरांनी लिहिले, असे राज्यपालांनी यावेळी संबोधित करताना सांगितले.

कारगिल येथील विजयाची परंपरा पुढेही कायम ठेवण्यासाठी युवकांनी सैन्य दलात प्रवेश घ्यावा व देशसेवा करावी, असे आवाहन राज्यपाल श्री. बैस यांनी केले. युद्धात हौतात्म्य प्राप्त झालेल्या जवान व अधिकाऱ्यांच्या कुटुंबांची काळजी घेणे नागरिकांचे कर्तव्य आहे, असे सांगून कुटुंबियांच्या पुनर्वसनासाठी सर्वांनी सशस्त्र सेना ध्वज निधीला योगदान द्यावे, असे आवाहन राज्यपालांनी केले.

या कार्यक्रमानंतर राज्यपालांनी कारगिल विजय दिवस मोटरसायकल रॅलीला झेंडा दाखवून रवाना केले. या रॅलीत आसाम रेजिमेंटचे जवान सहभागी होत असून ते  ४ ऑगस्ट रोजी कारगिल येथे जाऊन १५ ऑगस्ट रोजी पुणे येथे परतणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *