सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील – मुख्य सचिव सुजाता सौनिक

मुंबई, दि. 24 : सध्या समाजात डिजिटल साधनांचा मोठ्या प्रमाणावर उपयोग होत आहे. मात्र, ऑनलाईन व्यवहारांच्या माहितीअभावी अनेकांची फसवणूक होण्याच्या घटनाही घडत आहेत. अशा परिस्थितीत राज्यातील सायबर सुरक्षा अधिक भक्कम करून सायबर गुन्हेमुक्त वातावरण निर्माण करण्यासाठी शासन प्रयत्नशील आहे. ‘व्हॉट नाऊ’ ही संस्था सायबर जनजागृतीबाबत काम करीत आहे. अशा उपक्रमांना शासनाचे सर्वतोपरी सहकार्य राहील, असे प्रतिपादन राज्याच्या मुख्य सचिव सुजाता सौनिक यांनी आज केले.

यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहात महाराष्ट्र युवा सायबर सुरक्षा उपक्रम तसेच ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या 9019115115 या हेल्पलाईनचे उद्घाटन मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांच्या हस्ते करण्यात आले. बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर, महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग, मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव तथा माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाचे महासंचालक ब्रिजेश सिंह, ‘व्हॉट नाऊ’च्या फाऊंडर निती गोयल, निवेदिता श्रेयांस आदी यावेळी उपस्थित होते.

महापे येथे सायबर सुरक्षा केंद्राची उभारणी

सायबर गुन्हे व ऑनलाईन छळवणुकीच्या प्रकारांमुळे युवकांवर विपरीत परिणाम होत असल्याचे सांगत मुख्य सचिव श्रीमती सौनिक म्हणाल्या, महाराष्ट्रात सायबर गुन्ह्यांवर प्रतिबंध व उलगड्यासाठी यंत्रणा मजबूत करण्यात येत आहे. महापे येथे सायबर सुरक्षेबाबत केंद्राची उभारणी करण्यात येत आहे. ‘व्हॉट नाऊ’ संस्थेने हेल्पलाईन क्रमांक जारी करून सर्वांना सायबर सुरक्षा देण्याविषयी पाऊल उचलले आहे. यासोबतच राज्याच्या पोलीस विभागाची सायबर गुन्ह्यांमध्ये मदतीसाठी 1930 क्रमांकाची हेल्पलाईन सुरू आहे. ऑनलाईन व्यवहार व वर्तनाबाबत फसवणूक  झाल्यास न घाबरता पुढे येवून या हेल्पलाईनवर तक्रार द्यावी. तसेच संबंधित पोलीस स्टेशनला तक्रार नोंदवावी, असे आवाहनही त्यांनी केले.

शाळा, महाविद्यालय, कार्यालये, रहिवासी संकुले यामध्ये सायबर सुरक्षेसाठी युवकांनी जनजागृती करावी, अशी सूचना त्यांनी केली. महाराष्ट्र सायबर सेलच्या सहकार्याने सुरू होत असलेल्या ‘व्हॉट नाऊ’ चळवळीच्या माध्यमातून  सायबर सुरक्षा अधिक मजबूत होण्यास हातभार लागेल, असा विश्वासही मुख्य सचिव श्रीमती सौनिक यांनी यावेळी व्यक्त केला.

सायबर गुन्हेमुक्त मुंबई करण्यासाठी मुंबई पोलीस सदैव तत्पर पोलिस आयुक्त विवेक फणसळकर

बृहन्मुंबई पोलिस आयुक्त विवेक फणसळकर म्हणाले की, सायबर गुन्हेगारी मोडीत काढण्यासाठी मुंबई पोलीस आपल्या सदैव पाठिशी आहे. मुंबई पोलिस सायबर सुरक्षेसाठी विविध उपक्रम राबवित आहे. युवकांनी समाजमाध्यमे वापरताना अनोळखी व्यक्तींचे कॉल, फ्रेंड रिक्वेस्ट यांना प्रतिसाद देवू नये. फसवणुकीची घटना घडल्यास आपल्या पालकांना कल्पना द्यावी. तसेच कुठलीही शंका न बाळगता पोलिसांकडे तक्रार नोंदवावी. अशा प्रकरणांमध्ये पोलिसांच्या 1930 या हेल्पलाईन क्रमांकाची सुद्धा मदत घ्यावी. व्हॉट नाऊ संस्थेच्या माध्यमातून सुरू केलेली मोहीम प्रशंसनीय आहे. युवकांनी विविध उपक्रमांच्या माध्यमातून सायबर विषयक जनजागृती करावी, असे आवाहन करून मुंबई पोलिस आपल्या सहकार्यासाठी सदैव तत्पर असल्याची ग्वाही त्यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांचे प्रधान सचिव ब्रिजेश सिंह म्हणाले की, मोबाईल हे केवळ संपर्काचे साधन राहिलेले नसून आपली ओळख बनले आहे. यामध्ये आर्थिक व्यवहारांची सर्व माहिती संकलित असते. त्यामुळे मोबाईलला हॅक करून, त्यामधील माहिती चोरून आपली फसवणूक होऊ शकते. देशात नवीन कायदे लागू झाले असून याबाबत पोलिसांचे प्रशिक्षणही घेण्यात येत आहे. हे कायदे पीडितांना नक्कीच न्याय देणारे आहेत. व्हॉट नाऊ संस्थेने सुरू केलेला हा उपक्रम निश्चितच समाजात सायबर सुरक्षा विषयक साक्षरता निर्माण करणारा ठरणार आहे, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

यावेळी महाराष्ट्र राज्य सुरक्षा महामंडळाचे पोलीस महासंचालक बी. के. सिंग यांनी सायबर सुरक्षेसाठी जनजागृती आवश्यक असल्याचे सांगत ‘व्हॉट नाऊ’ संस्थेच्या उपक्रमाचे कौतुक केले. ‘व्हॉट नाऊ’च्या संस्थापक निती गोयल व सहसंस्थापक निवेदिता श्रेयांश यांनी संस्थेच्या उपक्रमाबाबत माहिती दिली. ऑनलाईन फसवणूक झाल्यास मदत करणारा हा उपक्रम युवकांना निश्चितच सहाय्यभूत ठरणारा असून युवकांमार्फत युवकांसाठी सुरू झालेली ही चळवळ असल्याचे त्यांनी सांगितले. कार्यक्रमाला विद्यार्थ्यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *