छोट्या स्वरुपातील आग नियंत्रणासाठी फायर बाईक वरदान ठरेल – पालकमंत्री अनिल पाटील

नंदुरबार, दिनांक 13 जुलै 2024 (जिमाका वृत्त) राज्य आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरण, आपत्ती व्यवस्थापन, महसूल व वनविभाग यांच्यामार्फत दाट वस्तीच्या ठिकाणी  अथवा छोट्या स्वरूपातील आगीवर नियंत्रण मिळविण्यासाठी फायर बाईकची निर्मिती करण्यात आली असून ही आपत्ती नियंत्रण फायर बाईक छोट्या स्वरूपातील आगीच्या नियंत्रणासाठी वरदान ठरणार असल्याचे प्रतिपादन, आज राज्याचे मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री अनिल पाटील यांनी केले आहे.

ते आज नंदुरबार जिल्हाधिकारी कार्यालयात राज्यात प्रथमच केल्या जाणाऱ्या फायर बाईक च्या वितरण समारंभात बोलत होते. यावेळी राज्याचे आदिवासी विकास मंत्री डॉ. विजयकुमार गावित, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा डॉ. सुप्रिया गावित, खासदार ॲड. गोवाल पाडवी, आमदार सर्वश्री आमश्या पाडवी, ॲड. के. सी. पाडवी, राजेश पाडवी, शिरीष नाईक, प्रभारी जिल्हाधिकारी धनंजय गोगटे, जिल्हा पोलीस अधिक्षक श्रवण दत्त, जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी सावन कुमार, निवासी उपजिल्हाधिकारी हरिष भामरे, उपजिल्हाधिकारी गोविंद दाणेज, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वसंत बोरसे यांच्यासह विविध यंत्रणांचे अधिकारी, पदाधिकारी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील यावेळी बोलताना म्हणाले, जेथे दाट वस्ती आहे अशा ठिकाणी नगरपालिकेची अथवा स्थानिक स्वराज्य संस्थांची मोठी गाडी जाण्यासाठी, पोहोचण्यासाठी बराच कालावधी जाऊ शकतो. परंतु आपत्ती व्यवस्थापनाची तात्काळ प्रतिसाद यंत्रणा बळकट करण्याच्या दृष्टीने या फायर बाईक अत्यंत परिणामकारक ठरणार आहेत. या बाईकवर २०० लिटर पाण्याचे २ टॅंक अथवा केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लागणारे २०० लिटर लिक्विड फोम चे टॅंक असणार आहे.  येणाऱ्या दोन महिन्यात राज्यात केमिकल आगीवर नियंत्रणासाठी लिक्विड फोम असलेल्या फायर बाईक सोबतच मोठ्या वाहनांचेही वितरण केले जाणार असून अशा प्रकारे फायर बाईक चे वितरण राज्यात सर्वप्रथम दुर्गम जिल्हा असलेल्या नंदुरबार जिल्ह्यातून करण्यात येत आहे.  राज्यात पहिल्या टप्प्यात ५० फायर बाईकची निर्मिती करण्यात आली आहे. क्यातील ९ फायर बाईक आज नंदुरबार येथे वितरित करण्यात येत असून त्यातील ४ नंदुरबार नगरपरिषद, २ शहादा नगर परिषद, धडगाव, नवापूर व तळोदा येथे प्रत्येकी १ फायर बाईक वितरीत करण्यात येत असल्याचेही यावेळी पालकमंत्री श्री. पाटील यांनी सांगितले.

आपत्कालीन फायर बाईक विषयी….

ही जलद प्रतिसाद आणीबाणी अग्निशमन बाईक जेथे मोठा फायर ट्रक प्रवेश करू शकणार नाही अशा भागात आग विझविण्यासाठी लक्षणीय पद्धतीने  डिझाइन केलेली आहे. इंजिनद्वारे चालणाऱ्या या वाहनामध्ये दोन पाण्याच्या टाक्या आहेत. त्यांना सिलेंडरची आवश्यकता नाही.  वापराचे स्वरूप सुनिश्चित करून, ऑपरेशन दरम्यान टाक्या पुन्हा भरल्या जाऊ शकतात. सायरन आणि हूटरने सुसज्ज, अगदी दाट लोकवस्तीच्या भागात, बाईकमध्ये नेव्हिगेशन सुलभ करण्यासाठी आपत्कालीन दिवे देखील आहेत. ही वैशिष्ट्ये जलद प्रतिसादाबरोबरच जेथे पोहोचणे कठीण आहे अशा भागात त्यामुळे या बाईकचा प्रवेश सुलभ होईल त्यामुळे बचाव मोहिमेचा प्रभाव आणि सुरक्षितता लक्षणीयरित्या वाढते.  ही अत्यंत विश्वासार्ह बाईक अरुंद गल्ल्यांमधील आगीचा सामना करण्यासाठी योग्य आहे आणि इतर आपत्कालीन आणि अग्निसुरक्षा प्रतिसाद पथकांद्वारे तिचा वापर केला जाऊ शकतो.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *