नाशिक, दि. ०८ (जिमाका) : जिल्ह्यात पेरणीयोग्य पाऊस झाल्याने शेतकऱ्यांना पेरणीसाठी आवश्यक दर्जेदार बियाणे, खते व औषधे उपलब्ध करून द्यावीत. त्याचप्रमाणे खतांची जादा दराने विक्री अथवा इतर विद्राव्य खतांचे लिंकिंग केल्याचे आढळल्यास फौजदारी कार्यवाही करण्याच्या सूचना प्रधान सचिव (कृषी) व्ही. राधा यांनी कृषी विभाग व जिल्ह्यातील कृषी निविष्ठा संघास दिल्या.
प्रधान सचिव (कृषी) व्ही. राधा यांनी त्र्यंबकेश्वर तालुक्यातील अंजनेरी येथील सामाईक सूविधा केंद्रांना अचानक भेट दिली व शेतकऱ्यांशी चर्चा केली. यावेळी कृषी आयुक्त रविंद्र बिनवडे, उपसचिव प्रतिभा पाटील, संचालक, फलोत्पादन डॉ. कैलास मोते, विभागीय कृषी सहसंचालक रविंद्र चलवदे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे समवेत होते.
जिल्ह्यातील सामाईक सुविधा केंद्र संचालकांनी कुठल्याही प्रकारच्या देय शुल्काव्यतिरिक्त अतिरिक्त शुल्क आकारल्यास सामाईक सुविधा केंद्र कायमस्वरुपी रद्द करण्याच्या सक्त सूचना व्ही. राधा यांनी यावेळी दिल्या. कृषी विभागाच्या विविध योजनांचा ऑनलाईन पद्धतीने लाभ घेण्याच्या माध्यमातून शेतकरी अर्ज करीत असतात. जिल्ह्यामध्ये १ रुपया पिकविम्याकरिता मोठ्या प्रमाणामध्ये शेतकरी योजनेत सहभागी होत आहेत. अशा परिस्थितीत सामाईक सुविधा केंद्रात गर्दी होते व त्याचाच गैरफायदा म्हणून शेतकऱ्याकडून अतिरीक्त शुल्क आकारण्यात येत असल्याची माहिती प्राप्त झाल्यानंतर तातडीने कृषी विभागाने संबंधित सामाईक सुविधा केंद्रावर प्रशासनाच्या माध्यमातून निलंबनाची कारवाई केली असल्याची माहिती जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी विवेक सोनवणे यांनी यावेळी दिली.
०००