२७-मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघाच्या खर्च तपासणीस निवडणूक निरीक्षकांकडून सुरूवात

मुंबई, दि. 9 : लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करिता 27- मुंबई उत्तर पश्चिम मतदारसंघातील उमेदवारांच्या प्रचार कालावधीतील पहिली खर्च तपासणी आज खर्च विषयक निवडणूक निरीक्षकांकडून होत आहे. निरीक्षक किरण के. छत्रपती (आयआरएस) आणि राजकुमार चंदन (आयआरएस) यांनी आज उमेदवारांच्या खर्चाच्या नोंद वही तपासणीस सुरुवात केली.

लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 करीता लोकसभा मतदारसंघात उमेदवाराने अर्ज दाखल केल्यानंतर उमेदवारांनी त्यांचा निवडणूक खर्च त्यांच्या खर्च नोंद वहीमध्ये नोंदविणे अपेक्षित आहे. निवडणूक खर्च सनियंत्रण यावरील अनुदेशाचा सारसंग्रह ऑगस्ट 2023 मधील सुचनेनुसार खर्च निरीक्षक हे प्रचार कालावधीत तीन वेळेस उमेदवाराच्या खर्च नोंदवहीची तपासणी करण्यात येणार आहे. त्यातील आज पहिल्या टप्प्यातील खर्च तपासणीस सुरूवात झाली आहे.

लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघासाठी खर्चविषयक केंद्रीय निवडणूक निरीक्षक म्हणून भारतीय राजस्व सेवेतील वरिष्ठ अधिकारी किरण के. छत्रपती (आयआरएस) आणि राजकुमार चंदन (आयआरएस) यांची नियुक्ती भारत निवडणूक आयोगाने केली आहे. या मतदार संघातील 164- वर्सोवा, 165- अंधेरी पश्चिम आणि 166- अंधेरी पूर्व या विधानसभा मतदारसंघातील खर्चविषयक बाबींचे निरीक्षक म्हणून श्री. छत्रपती आणि 158- जोगेश्वरी पूर्व, 159- दिंडोशी, 163- गोरेगाव या विधानसभा मतदारसंघातील खर्चविषयक बाबींचे निरीक्षक म्हणून श्री. चंदन काम पाहणार आहे.

उमेदवारांच्या दैनंदिन खर्चाच्या नोंदवही तपासणी यानंतर चे वेळापत्रक (अनुक्रमे तपासणी क्रमांक, दिनांक, वार आणि वेळ या क्रमाने) : प्रथम तपासणी, आज 9 मे 2024, गुरूवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. द्वितीय तपासणी, 13 मे 2024, सोमवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तृतीय तपासणी, 17 मे 2024, शुक्रवार, सकाळी 10 ते सायंकाळी 5. तपासणीचे ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकारी, 27- मुंबई उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघ अर्थ व सांख्यिकी सभागृह, प्रशासकीय इमारत, आठवा मजला, शासकीय वसाहत, वांद्रे (पूर्व), मुंबई- 400051 तपासणीसाठी उमेदवारांनी परिशिष्ट ई-1, भाग ‘अ’, ‘ब’, ‘क’, खर्चाची मूळ प्रमाणक (Invoice, GST क्रमांक आदींसह परिपूर्ण), तपासणी दिनांकापूर्वी अद्ययावत बँक पासबुक/ बँक विवरणपत्र (Bank Statement), सर्व परवाने (वाहन, रॅली आदी). या नमूद केलेल्या वेळापत्रकाप्रमाणे खर्च लेखाच्या तपासणीसाठी उमेदवार/उमेदवाराचे प्रतिनिधी यांनी विहित वेळेत अभिलेख्यांसह निवडणूक खर्च निरीक्षक यांच्याकडे उपस्थित न राहिल्यास संबंधित उमेदवारांविरुद्ध लोकप्रतिनिधीत्व अधिनियम 1951 प्रमाणे आवश्यक कार्यवाही करण्यात येईल, असेही निवडणूक निर्णय अधिकारी श्रीमती सुर्यवंशी यांनी म्हटले आहे.

000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *