२८ – मुंबई उत्तर पूर्व उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी – केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. सुनील यादव

मुंबई उपनगर, दि. 27 : लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी 28 – मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघात उमेदवारी अर्ज दाखल करण्यास सुरुवात झाली आहे. त्या अनुषंगाने उमेदवारांच्या खर्चाची काटेकोरपणे तपासणी करावी, असे निर्देश केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) सुनील यादव यांनी दिले. मुंबई उत्तर पूर्व मतदारसंघाच्या विक्रोळी येथील पिरोजशहा सांस्कृतिक सभागृहातील कार्यालयात आज सकाळी खर्च विभागांचे निरीक्षक डॉ. यादव यांनी आढावा बैठक घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

या बैठकीला निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर, निवडणूक खर्च विभागाचे नोडल अधिकारी सीताराम काळे यांच्यासह पोलीस अधिकारी, 155 मुलुंड, 156- विक्रोळी, 157 – भांडुप पश्चिम , 169 – घाटकोपर पश्चिम , 170 – घाटकोपर पूर्व, 171 – मानखुर्द शिवाजी नगर मतदार संघाचे सहायक निवडणूक निर्णय अधिकारी उपस्थित होते.

निवडणूक खर्च विभागात नियुक्त अधिकारी – कर्मचारी यांच्या कामकाजाचा आढावा घेत निरीक्षक डॉ. यादव म्हणाले की,  मुंबई उत्तर पूर्व अंतर्गत निवडणुकीसाठीच्या उमेदवारांच्या खर्चाच्या बँक खात्यावर देखरेख ठेवणे, संवेदनशील क्षेत्रात दिवसा तसेच रात्रीच्या वेळेतही भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाने सतर्क रहावे. राजकीय पक्ष आणि उमेदवारांनी केलेल्या खर्चाकडे बारकाईने लक्ष द्यावे. प्रत्येक बाब ही उमेदवार अथवा राजकीय पक्षांनी त्यांच्या खर्चविषयक बाबींमध्ये नोंदविली गेली असल्याबाबत  नेमलेल्या विविध पथकांनी दक्ष राहण्याच्या सूचना त्यांनी केल्या. कक्ष, तक्रार कक्ष, आचारसंहिता कक्ष, पोलीस कक्ष सर्वांनी एकत्रितरित्या कार्य काम करून, उत्कृष्ट पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडावी, असेही त्यांनी यावेळी सांगितले.

आचार संहितेच्या अनुषंगाने तक्रारी असल्यास 8130122499 या क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन केंद्रीय निवडणूक निरीक्षक (खर्च) डॉ. यादव यांनी केले आहे.

सिव्हिजील ॲपवरील प्राप्त तक्रारींचा १०० टक्के निपटारा – निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर

सी – व्हिजिल ॲपवर ऑनलाईन 49 तक्रारी आणि ऑफलाईन 18 तक्रारी प्राप्त झाल्या असून सर्व तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. तसेच , आचारसंहिता भंग प्रकरणी प्राप्त 18 तक्रारींचा निपटारा करण्यात आला आहे. यापैकी चार तक्रारींबाबत 93 लाखांची जप्ती करण्यात आली असल्याची माहिती यावेळी निवडणूक निर्णय अधिकारी डॉ. दादाराव दातकर यांनी दिली. यापुढेही असेच काम करून पारदर्शक पद्धतीने निवडणूक प्रक्रिया पार पाडणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या बैठकीस पोलिस उपायुक्त (परिमंडळ 6) हेमराज सिंग राजपूत, (परिमंडळ 7) पुरूषोत्तम कराड, (परिमंडळ 10) मंगेश शिंदे, बृहन्मुंबई महानगरपालिकेचे उपायुक्त श्री. देविदास क्षीरसागर, राज्य उत्पादन शुल्क विभागाचे अधिकारी, बँकेचे समन्वय अधिकारी, अमली पदार्थ नियंत्रण ब्युरोचे अधिकारी, भरारी पथक आणि स्टॅटिक सर्व्हिलन्स पथकाचे अधिकारी उपस्थित होते.

०००

                                                                        

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *