पैठण येथे महिला मतदार मेळावा

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- आपल्या जिल्ह्यातच नव्हे तर देशातही ५० टक्के मतदार महिला आहेत. मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी तसेच लोकांचा मतदान प्रक्रियेत सहभाग वाढविण्यासाठी महिलांनी स्वतः मतदान व मतदार जागृतीसाठी पुढाकार घ्यावा, असे आवाहन जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे केले.

पैठण येथे आज महिला मतदारांचा मेळावा घेण्यात आला. पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार स्वप्निल चव्हाण, शिक्षक, नोडल अधिकारी, महिला अंगणवाडी सेविका, विविध  सामाजिक संस्थेच्या महिला पदाधिकारी, निवडणुकीच्या कामकाजात सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी म्हणाले की, महिलांनी स्वयंस्फूर्तीने मतदानाविषयी जागृती करावी  तसेच स्वतः मतदान करावे. आपल्या देशाचे स्वातंत्र्य मिळविण्यासाठी अनेक स्वातंत्र्य सैनिकांनी आपले  बलिदान दिले. आणि आज आपण ज्या स्वातंत्र्याच्या उपभोग घेत आहोत ती लोकशाही अस्तित्वात आणली. या लोकशाहीचे महतत्त्व अबाधित ठेवण्यासाठी प्रत्येकाने मतदानाचा हक्क बजावणे आवश्यक आहे. देशातील मतदार संख्येच्या निम्मे संख्या ही महिला मतदारांची असून महिला मतदारांनी आपला मतदानाचा हक्क बजावून कर्तव्य पार पाडावे. ज्यांच्या कडेवर लहान बाळ आहे अशा महिला मतदारांच्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था मतदान केंद्रावर उभारण्यात येत आहे. त्यामुळे कोणतीही चिंता न बाळगता आपण मतदानाला जावे असे आवाहन जिल्हाधिकारी स्वामी यांनी उपस्थित महिलांना केले.

स्थानिक कलावंत अंकुश बनसोडे यांनी ‘चला मतदानाला जाऊया’  हे मतदान जागृती गीत सादर केले.  तर अब्दुल कादर उर्दू हायस्कूल येथील विद्यार्थ्यांनी पथनाट्याद्वारे मतदारजागृती चा संदेश दिला.

०००००

पैठण येथे निवडणूक पूर्वतयारी आढावा

मतदारांना आवश्यक सर्व सुविधा द्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- मतदानापासून एकही मतदार वंचित राहणार नाही यासाठी सर्व क्षेत्रीय कर्मचारी, अधिकारी यांनी मतदान केंद्रांवर निवडणूक आयोगाने दिलेल्या निर्देशानुसार सर्व आवश्यक सुविधा उपलब्ध करुन द्याव्या,असे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक अधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे निवडणूक पूर्वतयारी आढावा बैठकीत दिले.

पैठण येथे आज जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांच्या अध्यक्षतेत निवडणूक पूर्वतयारीचा आढावा घेण्यात आला. पैठण फुलंब्रीच्या उपविभागीय अधिकारी नीलम बाफना, तहसिलदार स्वप्निल चव्हाण, शिक्षक, नोडल अधिकारी, निवडणुकीच्या कामकाजात सहभागी सर्व अधिकारी कर्मचारी यांची उपस्थिती होती.

जिल्हाधिकारी स्वामी यांनी पैठण विधानसभा क्षेत्रनिहाय मतदान तयारीचा आढावा घेतला. ते म्हणाले की, निवडणूक आयोगाच्या निर्देशानुसार प्रशासनाने योग्य ती खबरदारी घ्यावी. सर्व नोडल अधिकारी, क्षेत्रीय अधिकारी यांनी आपणास सोपवलेल्या जबाबदाऱ्या योग्य व पारदर्शक पद्धतीने पार पाडून मतदारांना आवश्यक सुविधा उपलब्ध  करुन द्याव्या.ज्यांच्या कडेवर लहान बाळ आहे अशा महिला मतदारांच्या लहान बाळांना सांभाळण्यासाठी पाळणाघराची व्यवस्था, दिव्यांग आणि ज्येष्ठ वयोवृद्ध मतदारांनाही आयोगाच्या निर्देशानुसार व्हिलचेअर, सहाय्यक इ. सुविधा उपलब्ध करून द्याव्या. ‘सक्षम’ ॲप बाबत दिव्यांग मतदारांमध्ये जनजागृती करावी असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले. सार्वजनिक ठिकाणी असलेले राजकीय पक्षाचे प्रचार झेंडे किंवा इतर पोस्टर- बॅनर हटविण्याची कारवाई आचारसंहिता पथकाने तात्काळ करून अहवाल आचारसंहिता कक्षात सादर करावा, असे निर्देशही जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

यात्रेकरुंसाठी सर्व आवश्यक सुविधा द्याव्या- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, दि.२०(जिमाका):- नाथषष्ठी यात्रेसाठी पैठण येथे येणाऱ्या यात्रेकरुंसाठी स्वच्छता, सुव्यवस्था आणि सुविधा पुरविण्यात याव्या, त्यासाठी प्रशासनाने सर्व सज्जता करावी, असे निर्देश जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी आज पैठण येथे दिले.

पैठण तहसील कार्यालयामध्ये नाथषष्ठी यात्रेच्या पूर्वतयारीचा आढावा जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी घेतला. तहसीलदार स्वप्निल चव्हाण पैठण नगरपालिकेचे मुख्याधिकारी तसेच सर्व विभागाचे विभाग प्रमुख, तालुकास्तरीय विभाग प्रमुख या बैठकीस उपस्थित होते.

जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, नाथषष्ठीच्या यात्रेसाठी येणाऱ्या वारकऱ्यांना सर्व सुविधा उपलब्ध करून द्याव्या. षष्ठीच्या निमित्ताने पाच ते सात दिवस चालणाऱ्या यात्रा महोत्सवात विविध ठिकाणावरून दिंड्याच्या माध्यमातून नागरिक आणि भाविक सहभागी होतात. त्यांना पिण्याचे पाणी, स्वच्छता, रात्रीच्या वेळी प्रकाश व्यवस्था, स्वच्छता गृह, महिला यात्रेकरुंसाठी कपडे बदलण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था, आरोग्य तपासणी कक्ष आदी सुविधा प्रशासनाने उपलब्ध करुन द्याव्या. या कालावधीत कायदा व सुव्यवस्था अबाधित राखावी. तसेच आरोग्य सुविधा उपलब्ध करून द्याव्यात. आरोग्य तपासणीसाठी आरोग्य पथक, आरोग्य विभागाने डॉक्टर्स आणि संबंधित कर्मचाऱ्यांची नियुक्ती करावी.  आवश्यक वैद्यकीय साहित्य, औषधे साठा ठेवावा. महिला डॉक्टर्सची नियुक्ती करुन महिला वारकऱ्यांसाठी आरोग्य सुविधा द्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी स्वामी यांनी दिले.

०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *