नवी दिल्ली, 16 मार्च : देशात 18 व्या लोकसभेसाठी निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झाला आहे. सर्व राज्ये व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये दिनांक 19 एप्रिल ते 1 जून 2024 या कालावधीत एकूण सात टप्प्यांमध्ये मतदान पार पडणार असून 4 जून 2024 रोजी निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होणार आहे. महाराष्ट्रात १९ एप्रिल ते २० मे दरम्यान पहिल्या ५ टप्प्यांमध्ये निवडणुका घेण्यात येणार आहेत. तसेच विधानसभेच्या अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने येथील विज्ञान भवनात आज पत्रकार परिषद घेवून 18 व्या लोकसभा निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर करण्यात आला. मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी हा निवडणूक कार्यक्रम जाहीर केला. निवडणूक आयुक्त ग्यानेश कुमार आणि डॉ.सुखबीर सिंह संधू यावेळी उपस्थित होते. निवडणूक कार्यक्रमांच्या या घोषणेमुळे देशात आजपासून आदर्श आचार संहिता लागू झाली आहे.
महाराष्ट्रात पहिल्या पाच टप्प्यात मतदान
महाराष्ट्रातील ४८ लोकसभा जागांसाठी एकूण पाच टप्प्यांमध्ये मतदान घेण्यात येणार आहे. १९ एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात राज्यातील एकूण ५ लोकसभा मतदार संघांसाठी निवडणूक पार पडणार आहेत. दुसऱ्या टप्प्यात २६ एप्रिल रोजी राज्यातील ८ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहेत. ७ मे रोजी तिसऱ्या टप्प्यात राज्यातील एकूण ११ मतदार संघांसाठी, १३ मे रोजी चौथ्या टप्प्यात तर २० मे रोजी राज्यातील उर्वरित १३ मतदार संघांसाठी निवडणूक घेण्यात येणार आहे.
महाराष्ट्रात मतदान कधी आणि कुठे ?
पहिला टप्पा – 19 एप्रिल – रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदीया, गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर
दुसरा टप्पा 26 एप्रिल – बुलडाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ – वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी
तिसरा टप्पा 7 मे – रायगड, बारामती, धाराशीव, लातूर, सोलापूर, माढा, सांगली, सातारा, रत्नागिरी- सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगले
चौथा टप्पा 13 मे – नंदूरबार, जळगाव, रावेर, जालना, छत्रपती संभाजीनगर, मावळ, पुणे, शिरुर, अहमदनगर, शिर्डी, बीड
पाचवा टप्पा 20 मे – धुळे, दिंडोरी, नाशिक, पालघर, भिवंडी, कल्याण, ठाणे, मुंबईतील सहा मतदारसंघ
लोकसभा निवडणुकांबरोबरच देशातील विधानसभांच्या २६ जागांसाठी पोट निवडणुका होत असून यात महाराष्ट्रातील अकोला पश्चिम मतदार संघासाठी लोकसभेच्या निवडणुकीच्या दुसऱ्या टप्प्यात 26 एप्रिल रोजी मतदान होणार आहे.
देशात सात टप्प्यात मतदान
देशात 19 एप्रिल रोजी पहिल्या टप्प्यात 21 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 102 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 20 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 27 मार्च ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 28 मार्च रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 30 मार्च ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
देशात 26 एप्रिल रोजी दुसऱ्या टप्प्यात 13 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 89 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी 28 मार्च रोजी अधिसूचना जारी होणार आहे. 4 एप्रिल ही उमेदवारी अर्ज भरण्याची शेवटची तारीख असेल तर 5 एप्रिल रोजी उमेदवारी अर्जांची छानणी करण्यात येणार आहे. तर 8 एप्रिल ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख आहे.
देशात 7 मे रोजी तिसऱ्या टप्प्यात 12 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 94 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी १२ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 13 मे रोजी चौथ्या टप्प्यात 10 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 96 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी १८ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 20 मे रोजी पाचव्या टप्प्यात 8 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 49 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी ३ मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 25 मे रोजी सहाव्या टप्प्यात 7 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी २९ एप्रिल रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
देशात 1 जून रोजी सातव्या टप्प्यात 8 राज्य व केंद्रशासीत प्रदेशांमध्ये एकूण 57 लोकसभा मतदारसंघांसाठी मतदान घेण्यात येणार आहे. यासाठी ७ मे रोजी अधिसूचना जारी होणार आहे.
ठळक मुद्दे
1 कोटी 84 लाख मतदार (वयाची 18 वर्षे पूर्ण झालेले ) देशात प्रथमच मतदाते
18 ते 29 वर्ष वयोगटातील 21 कोटी 50 लाख मतदार
देशात 85 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 82 लाख मतदार
100 वर्षापेक्षा जास्त वयोगटातील 2 लाख मतदार
85 वर्षावरील व 40 टक्के पेक्षा जास्त दिव्यांगता असणाऱ्या व्यक्तींसाठी देशात प्रथमच घर जावून मतदान
12 राज्यात महिला मतदारांचे प्रमाण प्रति 1 हजार पुरुषांच्या तुलनेत 1 हजारापेक्षा जास्त. देशात 1 हजार पुरुषांमागे सरासरी 948 महिला मतदार
निवडणूक यंत्रणेसमोर ही चार आव्हाने : आदर्श आचार संहितेचे उल्लंघन केल्यास
बळाचा प्रयोग (मसल पावर), पैशांचा वापर (मनी पावर), चुकीची माहिती (मिस इन्फॉर्मेशन) आणि माध्यम समन्वय समितीच्या नियमांचे उल्लंघन ही निवडणूक यंत्रणेसमोरील महत्वाची आव्हाण असून यावर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यात आल्याचेही मुख्य निवडणूक आयुक्त राजीव कुमार यांनी यावेळी सांगितले.
00000