आरोग्याच्या सुविधा चांगल्या व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम – आरोग्य मंत्री तानाजी सावंत

सोलापूर दि.13(जिमाका): – सर्वसामान्य जनतेला दर्जेदार व चांगल्या आरोग्य सेवा मिळाव्यात यास शासनाने प्राधान्य दिले आहे. आरोग्य सुविधांसाठी आवश्यक तो निधी शासनाकडून उपलब्ध करून देण्यात येत असून, नागरिकांना आरोग्यविषयक सोयी सुविधा तात्काळ व दर्जेदार मिळाव्यात यासाठी आरोग्य विभाग सक्षम असल्याचे  प्रतिपादन आरोग्य मंत्री डॉ.तानाजी सावंत यांनी केले.

   महिला व नवजात शिशू रूग्णालय आण‍ि जिल्हा रूग्णालय सोलापूर या नूतन इमारतीचे  लोकार्पण तसेच 14 व्या वित्त आयोग अंतर्गत खरेदी करण्यात आलेल्या 16 रुग्णवाहिकांचे, अक्कलकोट येथील ड्रामा युनिट व ग्रामीण रुग्णालय वळसंग तालुका दक्षिण सोलापूर या आरोग्य संस्थेचे लोकार्पण आरोग्यमंत्री डॉ.तानाजी सावंत यांच्या  हस्ते व्हीसीद्वारे करण्यात आले.

            यावेळी खासदार डॉ. जय सिद्धेश्वर महास्वामी, जिल्हाधिकारी कुमार आशीर्वाद, मुख्य कार्यकारी अधिकारी मनीषा आव्हाळे, आरोग्य सेवा पुणे मंडळाचे उपसंचालक राधाकिशन पवार, शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. सदानंद भिसे, उपमुख्य कार्यकारी अधिकारी ईशाधिन शेळकंदे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ संतोष नवले, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ सुहास माने, कार्यकारी अभियंता श्री ठाकरे, प्रा. शिवाजी सावंत, अमोल शिंदे, रवीना राठोड,  अनिल सावंत यांच्यासह आरोग्य विभागातील आरोग्य अधिकारी कर्मचारी उपस्थित होते.

        यावेळी आरोग्यमंत्री डॉ. सावंत म्हणाले, सोलापूर शहर हे कामगारांचे शहर म्हणून ओळखले जाते. येथील सर्वसामान्य नागरिकांना आरोग्य विषयक सुविधा तात्काळ व सहज उपलब्ध व्हाव्यात. यासाठी सुसज्ज व सर्व सुविधायुक्त 100 खांटाचे जिल्हा रुग्णालय तसेच 100 खाटांचे महिला व नवजात शिशु रुग्णालयाच्या नूतन इमारती उभारण्यात आल्या आहेत. रुग्णालयात येणाऱ्या प्रत्येक रुग्णाला आरोग्य सेवा मिळाली पाहिजे यासाठी आवश्यक आरोग्य अधिकारी व कर्मचारी तात्काळ उपलब्ध करून देण्यात येतील. आरोग्य विभागाने गेल्या दीड वर्षात विविध प्रकारचे  आरोग्यअभियान राबविले आहे. राज्यातील प्रत्येक दुर्गम भागात चांगल्या पध्दतीने व 24 तास  आरोग्य सुविधा  उपलब्ध करु देण्यात आली. साडेबारा कोटी जनतेचे आरोग्य सुदृढ व वैचारिक दृष्ट्या चांगले हवे यासाठी मोफत उपचार सुरु केले असल्याचे आरोग्यमंत्री सावंत यांनी सांगितले.

           जिल्हा परिषदेच्या 14व्या वित्त आयोगाअंतर्गत 16 रुग्णवाहिका सोलापूरच्या जनतेला आरोग्य सेवा देण्यासाठी उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. जिल्हा रुग्णालयाचे बांधकाम क्षेत्र एकूण 9760 चौ. मीटर असून यावर 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. तसेच महिला व नवजात शिशु रुग्णालयाचे बांधकाम क्षेत्र 7459 चौरस मीटर याचाही खर्च जवळपास 35 कोटी रुपये खर्च करण्यात आले असल्याचे आरोग्य मंत्री डॉ तानाजी सावंत यांनी यावेळी सांगितले.

           जिल्हा परिषदेकडे 14 वा वित्त आयोग अंतर्गत ग्रामीण स्थानिक स्वराज्य संस्थचे बळकटीकरणासाठी ग्राम विकासाच्या आराखड्यानुसार पायाभूत सुविधा, आरोग्य शिक्षण व उपजिविका या शिर्षकाखाली रुग्णवाहिकाबाबत जि.प. सर्वसाधारण सभेत मान्यता देण्यात आली होती. जिल्हयामध्ये 16 प्राथमिक आरोग्य केंद्रास प्रत्येकी 1 प्रमाणे एकूण 16 रूग्णवाहीका ग्रामपंचायत विभागाकडून खरेदी करून आरोग्य विभागास हस्तांतरीत करण्यात आल्या असल्याची  माहिती मुख्य कार्यकारी अधिकारी मनिषा आव्हाळे यांनी यावेळी दिली.

                                                                           0000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *