‘गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबविणार- पालकमंत्री चंद्रकांत पाटील

अमरावती, दि. ९ (जिमाका): माणसामध्ये प्रगल्भता विकसित होण्यासाठी तसेच अनुभव, शब्दसंग्रह वाढून अनुभवविश्व समृद्ध करण्यासाठी वाचनाला पर्याय नाही. यासाठी येत्या काळात ‘गाव तिथे ग्रंथालय’ ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. या माध्यमातून काही हजारांवर लोकसंख्या असलेल्या गावातही ग्रंथालय सुरू करण्यात येईल. आदिवासी दुर्गम पाड्यांवरही विद्यार्थ्यांना आवश्यक ती सर्व पुस्तके उपलब्ध करून दिली जाईल, असे प्रतिपादन उच्च व तंत्र शिक्षण वस्त्रोद्योग संसदीय कार्य तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आज येथे केले.

उच्च व तंत्र शिक्षण विभाग, ग्रंथालय संचालनालय आणि अमरावती जिल्हा ग्रंथालय अधिकारी कार्यालयाच्या संयुक्त विद्यमाने अमरावती ग्रंथोत्सव -2023 चे आयोजन संत ज्ञानेश्वर सांस्कृतिक भवन जवळील शासकीय विभागीय ग्रंथालय येथे करण्यात आले आहे. या दोन दिवसीय ग्रंथोत्सवाचे उद्घाटन पालकमंत्री श्री. पाटील यांच्या हस्ते करण्यात आले, त्यावेळी ते बोलत होते.  यावेळी खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार प्रवीण पोटे -पाटील, आमदार सुलभा खोडके, आमदार प्रताप अडसड, ग्रंथालय संचालक अशोक गाडेकर, जिल्हा ग्रंथालय अधिकारी डॉ. सुरज मडावी, सहायक ग्रंथालय संचालक राजेश पाटील आदी उपस्थित होते.

पालकमंत्री श्री. पाटील म्हणाले की, ग्रंथालयाच्या अनुदानामध्ये 60 टक्क्यांनी वाढ करण्यात आली आहे. यामुळे ग्रंथालयातील कर्मचाऱ्यांचे वेतन, पुस्तकांची खरेदी यासाठी सहाय्य होत आहे. पूर्वी ग्रंथालयांना अनुदान मिळायला विलंब व्हायचा. आता यासाठी संगणक प्रणाली विकसित करण्यात आली असून केवळ एका क्लिकवर राज्यातील 12 हजार ग्रंथालयांना तात्काळ अनुदान मिळत आहे. सुरु ग्रंथालय तसेच नवीन ग्रंथालयांच्या विकासासाठी या निधीची तरतूद करण्यात आली आहे. आजच्या स्मार्ट युगात ई-लायब्ररी हा प्रयोग राबवावा लागणार आहे. येत्या जूनमध्ये 4 हजार नवीन ग्रंथालयांना परवानगी देण्यात येणार आहे. ग्रंथालयांची अ, ब, क आणि ड ही वर्गवारी आणि तपासणी सोपी होण्यासाठी ऑनलाईन पद्धत वापरण्यात येणार आहे. जून महिन्यामध्ये ग्रंथालयांच्या वर्गवारीतही वाढ करण्यात येणार असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले.

प्रयत्न केल्यास वाचन संस्कृतीत निश्चितच वाढ होते, असे सांगून पालकमंत्री पुढे म्हणाले की,  यापुढे जिल्ह्याच्या नियोजनातही ग्रंथालयाला अनुदान दिले जाईल. हा निधी ग्रंथालयाच्या आधुनिकीकरणासाठी वापरला जाईल. वाचन संस्कृती वाढविण्यासाठी करण्यात येणाऱ्या विविध उपायोजनांना विद्यार्थीवर्ग तसेच नागरिकांचा चांगला प्रतिसाद मिळत आहे. ‘नॅशनल बुक ट्रस्ट’ ही देश पातळीवरील रास्त व वाजवी दरात पुस्तके प्रकाशित करणारी संस्था आहे. या संस्थेमार्फत ‘बुक फेस्ट’ नावाने राष्ट्रीय प्रदर्शन नुकतेच पुण्यात घेण्यात आले होते. या बुक फेस्टच्या माध्यमातून 11 कोटी रुपयांची पुस्तके विकली गेली. पुस्तक खरेदी करणाऱ्यांमध्ये 90 टक्के खरेदीदार हे शाळकरी आणि महाविद्यालयीन विद्यार्थी होते, हे विशेष. वाचकसंख्या वाढविण्यासाठी अशा विविध उपक्रमांचा फायदा होतो. वाचकांपर्यंत त्यांना आवश्यक असणारी पुस्तके पोहोचावी, यासाठी कोल्हापूर येथे ‘फिरते वाचनालय’ ही संकल्पना राबविण्यात येत आहे. फिरते वाचनालयाला कोल्हापूरकरांनी उत्तम प्रतिसाद दिला. या प्रतिसादानंतर आता येथील शाळेतही फिरते वाचनालय ही संकल्पना राबविण्यात येत आहे. एका विशिष्ट वेळेला शाळेच्या प्रांगणात फिरते वाचनालय येते. फिरते वाचनालयाच्या माध्यमातून विद्यार्थी आपल्या रुचीची पुस्तके घेवून आवडीने वाचतात.  वाचन संस्कृती वृद्धींगत करण्यासाठी ग्रंथालयांनी पुढाकार घेवून विविध उपक्रम राबवावेत. ग्रंथोत्सवाच्या निमित्ताने प्रकाशक, लेखक यांच्या पुस्तकांचे परिक्षण, परिसंवाद अशा कार्यक्रमांचे आयोजन व्हावे. आवश्यकतेनुसार ग्रंथालया विकासासाठी शासन सर्व सोयी-सुविधा उपलब्ध करुन देईल, अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

दोन दिवसीय ग्रंथोत्सवाला सकाळी ग्रंथदिंडीने सुरवात झाली. ग्रंथोत्सवात ग्रंथ प्रदर्शन व विक्रीसह, परिसंवाद, व्याखान, नाटक आदी भरगच्च कार्यक्रमांमुळे रसिक व ग्रंथप्रेमींना खास  बौद्धिक मेजवानी मिळत आहे. ग्रंथोत्सवामध्येमध्ये पालकमंत्री श्री. पाटील यांनी विविध स्टॉल्सला भेटी दिल्या. त्यांनी प्रकाशक, आणि वाचक यांच्याशी संवाद साधला. ग्रंथोत्सवात व्यक्तिपरत्वे आवड-निवड लक्षात घेऊन पुस्तकांची उपलब्धता करून देण्यात आली आहे. यामध्ये आरोग्य, कला कौशल्य, प्रशासकीय रचना, स्पर्धा परीक्षांसाठी आवश्यक पुस्तके, मानसशास्त्र, प्रभावी व्यक्तिमत्व विकास आदी विषयांवरील पुस्तके उपलब्ध आहेत.

कार्यक्रमाच्या प्रास्ताविकेमध्ये डॉ. सुरज मडावी यांनी ग्रंथोत्सवाच्या आयोजनाची संकल्पना स्पष्ट केली. ग्रंथोत्सवाच्या माध्यमातून प्रत्येक वाचकाला त्यांच्या आवडीनुरुप ग्रंथ मिळावा,  प्रकाशक व विक्रेत्यांना योग्य व्यासपीठ मिळावे, शहरी आणि ग्रामीण क्षेत्रात वाचन संस्कृती अधिक वृद्धिंगत व्हावी, नवलेखकांना प्रोत्साहन मिळावे यासाठी ग्रंथोत्सवाचे महत्त्व विशेष असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले. वाचन संस्कृतीला प्रोत्साहन देण्यासाठी ग्रंथेत्सवात नियमित वाचकांचाही सत्कार करण्यात येतो. शासकीय ग्रंथालयाची नवीन इमारत पूर्णत्वास येत असून येथे वाचकांना वाचनविषयक सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यात येईल,असेही त्यांनी यावेळी सांगितले. प्र. जिल्हा ग्रंथालय अधिकारी गजानन कुरवाडे, दीपक गेडाम यांच्यासह ग्रंथालयाचे अधिकारी, कर्मचारी, प्रकाशक, लेखक, वाचक आदी यावेळी उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन आणि आभार प्रिती बनारस यांनी मानले.

ग्रंथोत्सवात विविध कार्यक्रम

ग्रंथोत्सवात रविवार दि. 10 मार्च रोजी सकाळी 10.30 ते 12.30 या कालावधीत ‘सोशल मीडियाचा वाचन संस्कृतीवरील परिणाम’ या विषयावर व्याख्यान होईल. या व्याख्यानाच्या अध्यक्षस्थानी विभागीय उपायुक्त संजय पवार तर अमरावती विद्यापीठाचे प्रा. डॉ. हेमंत खडके, प्रा. प्रणव कोलते व प्रा. ऋषभ डाहाके सहभागी होतील. दुपारी 1 ते 3 वाजेपर्यंत कविसंमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. सुत्रसंचालन नितीन भट तर कविसंमेलनमध्ये अनंत नांदूरकर, प्रणाली देशमुख, सारिका उबाळे, विष्णु सोळंके, संघमित्रा खंडारे, ऋषिकेश पाडर, शिल्पा पवार, विशाल मोहोड, नंदा भोयर सहभागी होतील. दुपारी 4 वाजता समारोपीय कार्यक्रमात ग्रंथवाचक गौरव प्रमाणपत्र वितरण सोहळा होईल. समारोप सत्राचे अध्यक्ष निवासी उपजिल्हाधिकारी अनिल भटकर हे राहणार आहेत. या सर्व कार्यक्रमांना जिल्ह्यातील ग्रंथप्रेमी नागरिकांनी उपस्थित राहून ग्रंथप्रदर्शनास भेट द्यावी, असे आवाहन जिल्हा ग्रंथोत्सव आयोजन समितीने केले आहे.

०००

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *