वाढत्या लोकसंख्येचा विचार करून शहराचा नियोजनबद्ध विकास करा – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, दि. ९: पिंपरी चिंचवड शहरात उद्योग, मॅन्युफॅक्चरींग, तंत्रज्ञान, फळ प्रक्रीया क्षेत्रात मोठी गुंतवणूक येऊन रोजगाराच्या संधी येत आहेत. रोजगाराच्या निमित्ताने मोठ्या संख्येने नागरिक शहराकडे येत असतांना शहर सुंदर व स्वच्छ असण्याची गरज आहे. महानगरपालिकेने शहरीकरणाचा वेग आणि वाढती लोकसंख्या लक्षात घेऊन शहराचा नियोजनबद्ध विकास करावा, असे आवाहन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्यावतीने चिखली येथील जगद्गुरू संत तुकाराम महाराज सभागृहात आयोजित विविध विकासकामांच्या लोकार्पण, उद्घाटन आणि भूमिपूजन कार्यक्रमात ते बोलत होते.  कार्यक्रमाला खासदार श्रीरंग बारणे, आमदार उमा खापरे, अण्णा बनसोडे, महेश लांडगे, अश्विनी जगताप, महानगरपालिकेचे आयुक्त शेखर सिंह, पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्त विनय कुमार चौबे, मनपा अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, विजयकुमार खोराटे, उल्हास जगताप आदी उपस्थित होते.

उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस म्हणाले की, पुणे आणि पिंपरी चिंचवड शहरे राज्याच्या अर्थव्यवस्थेचे इंजिन म्हणून पुढे येत आहेत. शहरात रोजगाराच्या मोठ्या संधी निर्माण होत आहेत. असे होत असतांना शहर बकाल होऊ नये याची दक्षता घेणे गरजेचे आहे. त्यादृष्टीने शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनाही राबविण्यात येत आहे. शहरातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजांनुसार सुविधा निर्माण कराव्या लागतील. पिंपरी चिंचवड शहराच्या भविष्यातील विस्ताराचा विचार करून पायाभूत सुविधा उभारणे गरजेचे असून राज्य शासनही शहराच्या विकासासाठी सर्व सहकार्य करेल, अशी ग्वाही त्यांनी दिली.

श्री. फडणवीस म्हणाले की, एखाद्या शहराला परिपूर्ण करणाऱ्या गोष्टींची सुरूवात आजच्या कार्यक्रमाद्वारे व्यवस्था होत आहे. आरोग्य, पर्यावरण, शिक्षण उपक्रमांची सुरूवात होत आहे. वेस्ट टू बायोगॅस आणि सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्पामुळे पर्यावरण संवर्धनासोबत शहर स्वच्छ राखण्यास आणि इंद्रायणीचे पावित्र्य राखण्यास मदत होणार आहे. शहरातील हवेतील गुणवत्ता वाढण्यासही या प्रकल्पांमुळे मदत होईल.  सांडपाणी नदीनाल्यात थेट सोडता येणार नाही असा निर्णय घेण्यात आला आहे, सांडपाणी प्रकल्पातून स्वच्छ केलेले पाणी सिंचनासाठी देण्याचा प्रयत्न आहे. असेही त्यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड महानगरपालिका प्रशासनाने लोकप्रतिनिधी आणि नागरिकांच्या अपेक्षाला मुर्तरूप देण्याचे काम या प्रकल्पांच्या माध्यमातून केले आहे.  शिक्षण, आरोग्यासोबत रोजगार महत्त्वाचा असल्याने बचत गटांना बाजारपेठ उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्न होत आहे. या माध्यमातून महिलांना अर्थचक्राचा भाग बनविता येईल. त्यासोबत महानगरपालिकेने कौशल्यावर आधारीत कार्यक्रमाची स्तुत्य सुरूवात केली आहे. मनोरंजन आणि प्रबोधनासाठी टाऊन हॉल महत्वाचा ठरेल. आज शुभारंभ होत असलेल्या पायाभूत सुविधांचादेखील शहराला लाभ होऊन पुण्यासारखाच विकास झालेले शहर म्हणून पिंपरी चिंचवडची ओळख निर्माण होईल, शहरासाठी आधुनिक पोलीस आयुक्तालय उभारण्यात येईल, असेही श्री. फडणवीस यांनी सांगितले.

आमदार श्री.लांडगे म्हणाले की, पिंपरी चिंचवड शहरात पुढील २० वर्षांचा विचार करून विकासकामे करण्यात आली आहेत. भविष्यातले शहर म्हणून विविध सुविधा येथे निर्माण करण्यात येत आहेत. खेळाडुंसाठी महानगरपालिकेच्या माध्यमातून चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात येत आहे, असे त्यांनी सांगितले.

प्रास्ताविकात महानगरपालिका आयुक्त श्री.सिंह यांनी महानगरपालिकेतर्फे करण्यात आलेल्या विविध विकासकामांची माहिती दिली. पिंपरी चिंचवड शहरात अनेक चांगले बदल होत असून स्वच्छता, दर्जेदार पायाभुत सुविधा याबाबत महापालिकेने चांगली कामगिरी केली आहे. मोशी येथे 700 खाटांचे रुगणालय उभारण्यात येणार असून त्यामुळे वाढत्या लोकसंख्येला चांगले उपचार देता येतील असे त्यांनी सांगितले. लोकार्पण करण्यात आलेले विविध कामांमुळे नागरिकांना चांगल्या सुविधा उपलब्ध होतील आणि त्यांचे जीवनमान उंचावण्यास मदत होईल असे त्यांनी सांगितले.

 

श्री. फडणवीस यांच्या हस्ते दूरदृश्य प्रणालीद्वारे महानगरपालिका क्षेत्रातील विविध ठिकाणच्या विकास कामांचे उद्घाटन, लोकार्पण आणि भूमिपूजन करण्यात आले.

चिखली येथील टाऊन हॉल, भोसरी आणि बोऱ्हाडेवाडी येथील युवक व युवतींना रोजगार व प्रशिक्षण देणारा  ‘कौशल्यम’ प्रकल्प, नवी दिशा प्रकल्पाअंतर्गत भोसरी येथील स्टीचिंग युनिट, मोशी येथील हॉटेल वेस्ट टू बायोगॅस प्रकल्प आणि प्रभाग क्र.७ भोसरी गावठाणातील स.नं. १ मध्ये कबड्डी प्रशिक्षण केंद्र  तसेच अनुषंगिक कामाचे उद्घाटन करण्यात आले. महिला बचत गट सक्षमीकरण अंतर्गत ‘सक्षमा’ प्रकल्पाचा व मोशी कचरा डेपोतील जुन्या डंपिंग केलेल्या कचऱ्याचे बायोमायनिंग टप्पा २ कामाचा यावेळी शुभारंभ करण्यात आला.

१७.९ टन प्रतिदिन क्षमतेच्या जैव वैद्यकीय घनकचरा विल्हेवाट प्रकल्प, भोसरी स.नं.२१७- पंपिंग स्टेशनच्या अतिरिक्त वीज वापरण्याच्या ठिकाणी एनर्जी सेव्हिंगसाठी आवश्यक क्षमतेच्या एसटीपीचे, कुदळवाडी- जाधववाडी भागातून इंद्रायणी नदीस मिळणाऱ्या नाल्यातील पाण्यावर प्रक्रिया करून त्याचा पुनर्वापर करण्यासाठी प्रक्रिया प्रकल्प, राष्ट्रीय स्वच्छ हवा कार्यक्रम एनसीएपी अंतर्गत हवा शुद्धीकरण प्रणाली ॲड्री मिस्ट आधारित कारंजे प्रणाली, स्थिर धुके तोफ युनिटचे, चऱ्होली येथील प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत निवासी सदनिकांचे आणि निगडी येथील जय ट्रेडर्स येथील पादचारी भुयारी मार्गाचे लोकार्पण करण्यात आले.

मोशी येथील गट क्र. ६४६ मधील गायरान जागेमध्ये उभारण्यात येणारे रुग्णालय, पिंपरी चिंचवड मनपा हद्दीमधील एकूण १२.४ किमी लांबीच्या नवीन डीपी रस्त्याचे, भोसरी मधील प्रभाग क्र.७ येथील मनपा शाळेसाठी बांधण्यात येणारी इमारत, निगडी, दापोडी रस्त्याचे अर्बन स्ट्रीट डिझाईन नुसार विकसन करणे, मुकाई चौक ते चिखली स्पाईन रस्ता विकसित करणे, त्रिवेणी नगर चौकातील स्पाईन रस्त्याची मिसिंग लिंक रस्ता विकसित करणे व भक्ती शक्ती ते मुकाई चौक बीआरटी कॉरीडॉर विकसित करणे या कामांचे भूमिपूजनदेखील उपमुख्यमंत्री श्री. फडणवीस यांच्या हस्ते करण्यात आले.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *