लातूर, दि. १५ (जिमाका): जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासोबतच जिल्ह्याला जलसुरक्षित आणि अधिक सक्षम बनविण्याचा संकल्प पालकमंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी व्यक्त केला. भारताच्या ८० व्या स्वातंत्र्य दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित मुख्य शासकीय समारंभात त्यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी त्यांनी जिल्ह्यातील नागरिकांना स्वातंत्र्य दिनाच्या शुभेच्छा दिल्या, तसेच स्वातंत्र्यसैनिकांच्या त्यागाला अभिवादन केले.
या समारंभास जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा उषा पाटील, लातूर शहर महानगरपालिकेच्या महापौर जयश्री सोनकांबळे, जिल्हाधिकारी डॉ. भारत बास्टेवाड, पोलीस अधीक्षक अमोल तांबे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी राहुल कुमार मीना, महानगरपालिका आयुक्त राहुल कुलकर्णी यांच्यासह लोकप्रतिनिधी, वरिष्ठ अधिकारी, स्वातंत्र्यसैनिक, माजी सैनिक, शहीद जवानांचे कुटुंबीय, पत्रकार आणि नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
स्वातंत्र्यसैनिकांच्या स्वप्नातील सक्षम, समृद्ध आणि आत्मनिर्भर भारत घडविणे ही आपली जबाबदारी आहे. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या ‘विकसित भारत’ संकल्पनेत महाराष्ट्राची भूमिका महत्त्वाची आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखाली राज्य विकासाच्या दिशेने वेगाने वाटचाल करीत असल्याचे पालकमंत्री भोसले यांनी सांगितले.
५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची कर्जमुक्तीची पहिली यादी
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर शेतकरी कर्जमुक्ती योजनेच्या पहिल्या टप्प्यात लातूर जिल्ह्यातील ५४ हजार ३८८ शेतकऱ्यांची यादी जाहीर झाली आहे. त्यापैकी २२ हजार ९६३ शेतकऱ्यांसाठी १५९ कोटी रुपयांचा निधी वितरित करण्यात आला आहे. उर्वरित पात्र लाभार्थ्यांनाही लवकरच निधी वर्ग करण्यात येणार आहे. कृषी यांत्रिकीकरण आणि सूक्ष्म सिंचनाला प्रोत्साहन दिले जात आहे. प्रधानमंत्री सूक्ष्म सिंचन योजनेतून गतवर्षी जिल्ह्यातील ४ हजार २०० शेतकऱ्यांना १० कोटी १५ लाख रुपयांचे अनुदान वितरित करण्यात आल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
जलसंधारण सप्ताहात सहभागाचे आवाहन
पाण्याचे संवर्धन आणि काटकसरीने वापर ही काळाची गरज आहे. माजी मुख्यमंत्री स्वर्गीय सुधाकरराव नाईक यांच्या जयंतीनिमित्त यावर्षीपासून २१ ऑगस्ट रोजी जलसंधारण दिन पाळला जात आहे. त्यानिमित्त १५ ते २१ ऑगस्टदरम्यान जलसंधारण सप्ताह आयोजित करण्यात आला आहे. २१ ऑगस्ट रोजी ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’ ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. पाण्यासाठी समाजाने एकत्र येण्याचा हा संकल्प आहे. युवा, विद्यार्थी, महिला बचत गट, शेतकरी आणि सामाजिक संस्थांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग घ्यावा, असे आवाहन पालकमंत्र्यांनी केले. यावेळी ‘महा वॉकेथॉन—वॉक फॉर वॉटर’ लोगोचे अनावरण करण्यात आले. उपस्थितांना मृद व जलसंधारणाची शपथ देण्यात आली.
रस्ते आणि पायाभूत सुविधांना गती
लातूर जिल्ह्यात शिक्षण, आरोग्य, उद्योग, रस्ते आणि पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यात येत आहे. आशियाई विकास बँकेच्या सहकार्याने जिल्ह्यातील १२९ किलोमीटर लांबीच्या पाच प्रमुख रस्त्यांसाठी १ हजार ३०० कोटी रुपये मंजूर झाले आहेत. सहकार विभागाची कार्यालये एकाच छताखाली आणण्यासाठी लातूर येथे सहकार भवनाची उभारणी करण्यात येत आहे.
१२ हजारांहून अधिक विद्यार्थ्यांना शिष्यवृत्तीचा लाभ
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेतून लातूर जिल्ह्यातील १२ हजार ६४८ मागासवर्गीय विद्यार्थ्यांना १८ कोटी २९ लाख रुपये देण्यात आले आहेत. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेतून ४ हजार ३५७ विद्यार्थ्यांना १२ कोटी २९ लाख रुपयांचा थेट लाभ मिळाला आहे. महिलांच्या आर्थिक स्वावलंबनासाठी बचत गट आणि स्वयंरोजगाराच्या संधी वाढविण्यावर शासनाचा भर असल्याचे पालकमंत्र्यांनी सांगितले.
३७ हजार ७५८ लाभार्थ्यांना शासकीय सेवांचा लाभ
लोकाभिमुख प्रशासनाच्या माध्यमातून शासनाच्या योजना शेवटच्या घटकापर्यंत पोहोचविण्यासाठी जिल्हा प्रशासन प्रयत्नशील आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त आणि माजी उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त जिल्ह्यातील सर्व सहा विधानसभा मतदारसंघात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिरे घेण्यात आली. या शिबिरांत ३७ हजार ७५८ लाभार्थ्यांना विविध शासकीय लाभ, दाखले आणि सेवांचे वितरण करण्यात आले.
युवकांनी तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात पुढे यावे
कृत्रिम बुद्धिमत्ता, रोबोटिक्स आणि ऑटोमेशनमुळे जगातील कामकाजाची पद्धत वेगाने बदलत आहे. त्यामुळे युवकांनी तंत्रज्ञान, डेटा, सायबर, आधुनिक शेती आणि स्टार्टअपच्या क्षेत्रात पुढे यावे. लातूरच्या तरुणाईने कौशल्य आणि तंत्रज्ञानाची सांगड घालून देशाच्या विकासकथेत योगदान द्यावे, असे आवाहन पालकमंत्री भोसले यांनी केले.
प्रारंभी वंदे मातरम् गीताने कार्यक्रमाची सुरुवात झाली. पोलीस निरीक्षक मोहन ठोंबरे यांच्या पथकाने राष्ट्रध्वजाला मानवंदना दिली. उत्कृष्ट सेवा पदक प्राप्त पोलीस अधिकारी तसेच पुरस्कारप्राप्त शेतकऱ्यांचा पालकमंत्र्यांच्या हस्ते सन्मान करण्यात आला. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उद्धव फड यांनी केले.
०००