प्रशासनाकडे टँकर मागणीचा प्रस्ताव आल्यास 48 तासात मंजुरी प्रदान करावी – पालकमंत्री जयकुमार गोरे

सोलापूर, दिनांक ११ : जिल्ह्यातील कोणत्याही गावातून संबंधित पंचायत समितीचे गट विकास अधिकारी यांच्याकडे टँकर मागणी चा प्रस्ताव आल्यानंतर त्यांनी 24 तासात प्रांत अधिकारी यांच्याकडे प्रस्ताव पाठवा व त्यानंतरच्या 24 तासात प्रशासनाने या प्रस्तावाला मान्यता प्रदान करावी. म्हणजे 48 तासात टँकर मागणी प्रस्तावावर प्रशासनाने निर्णय घेऊन मंजुरी प्रदान करावी, असे निर्देश पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी दिले.

नियोजन भवन येथील सभागृहात आयोजित पाणीटंचाई कृती आराखडा आढावा बैठकीत पालकमंत्री गोरे मार्गदर्शन करत होते. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष दीपक वैद्य, राज्यसभा खासदार ज्योती वाघमारे, आमदार सुभाष देशमुख, आमदार समाधान आवताडे, आमदार उत्तम जानकर, आमदार नारायण पाटील, आमदार बाबासाहेब देशमुख, आमदार अभिजीत पाटील, जिल्हाधिकारी कार्तिकियेन एस., मुख्य कार्यकारी अधिकारी कुशल जैन, अप्पर जिल्हाधिकारी गणेश निराळी, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी संदीप कोहिनकर, निवासी उपजिल्हाधिकारी अभिजीत पाटील, उजनी धरणाचे अधीक्षक अभियंता सकृत खांडेकर, वीज वितरण कंपनीचे अध्यक्ष अभियंता सुनील माने यांच्या सर्व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

सद्यस्थितीत जिल्ह्यात अक्कलकोट तालुक्यातील एक व माळशिरस तालुक्यातील चार गावांना टॅंकरने पाणीपुरवठा सुरू आहे व पुढच्या काही कालावधीत तो 40 टँकर पर्यंत जाईल. तरी टंचाई कृती आराखड्यातील 24 तात्पुरत्या पाणीपुरवठा योजनाना मान्यता देण्यात येत असून कामे त्वरित सुरुवात करावी व जिल्ह्यात टंचाईची परिस्थिती उद्भवणार नाही यासाठी काटेकोरपणे नियोजन ठेवावे असे निर्देश श्री. गोरे यांनी यावेळी दिले. त्याप्रमाणेच उजनी धरणातून ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाणी चे नियोजन करण्यात आलेले आहे. उजनी धरणातील पाणीसाठा मायनस मध्ये गेला असल्याने नवीन आवर्तने यातून देता येणार नाहीत. हे सर्व पाणी पिण्यासाठी आरक्षित असून सद्यस्थितीत पाणी वाटप मंत्रिमंडळाच्या निर्णयानुसार होणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

मंगळवेढा येथील भोसे प्रादेशिक पाणीपुरवठा योजना व अन्य पाणीपुरवठा योजनांसाठी तसेच एमजीपीच्या योजनांसाठी स्वतंत्र बैठक प्रशासनाने आयोजित करण्याबाबत पालकमंत्री श्री. गोरे यांनी सुचित केले. त्याप्रमाणेच पाणीपुरवठा योजनांना वीज वितरण कंपनीने वीज पुरवठा सुरळीत ठेवावा थकबाकी अभावी वीज पुरवठा खंडित होता कामा नये याची दक्षता घ्यावी, असे निर्देशही यावेळी त्यांनी दिले.

यावेळी अधीक्षक अभियंता श्री खांडेकर यांनी उजनी धरणातील पाणीसाठ्याची माहिती दिली. धरणातील पाणीसाठा वृत्त असून सद्यस्थितीत 59 टीएमसी पाणीसाठा असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी उपस्थित सर्व लोकप्रतिनिधी यांनी त्यांच्या मतदारसंघातील प्रादेशिक पाणीपुरवठा योजना तसेच अन्य पाणीपुरवठा योजना वीज पुरवठा सुरळीत सुरू ठेवण्याची मागणी करण्यात आली तसेच गावातून टँकरची मागणी झाल्यास पाहणी करून प्रशासकीय यंत्रणेने त्वरित टँकर सुरू करावा, अशीही मागणी करण्यात आली.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *