‘दिलखुलास’,‘जय महाराष्ट्र’मध्ये आयुक्त माधवी सरदेशमुख यांची विशेष मुलाखत

मुंबई, दि. १६ : माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ या कार्यक्रमांमध्ये महिला व बालविकास विभागाअंतर्गत येणाऱ्या एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजनेच्या आयुक्त माधवी सरदेशमुख यांची विशेष मुलाखत प्रसारित होणार आहे. या मुलाखतीत राज्यातील महिला व बालकांच्या आरोग्य, पोषण आणि सर्वांगीण विकासासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध योजनांची सविस्तर माहिती देण्यात आली आहे.

‘दिलखुलास’ कार्यक्रमातून ही मुलाखत शनिवार, 18, सोमवार, 20, मंगळवार, 21 आणि बुधवार, 22 एप्रिल 2026 रोजी सकाळी 7.25 ते 7.40 या वेळेत आकाशवाणीच्या सर्व केंद्रांवर प्रसारित होईल. तसेच ही मुलाखत ‘News On AIR’ या मोबाईल ॲपवरही उपलब्ध राहणार आहे. ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमात ही मुलाखत मंगळवार, 21 एप्रिल 2026 रोजी रात्री 8.00 वाजता दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर प्रेक्षकांना पाहता येणार आहे. या मुलाखतीचे सूत्रसंचालन निवेदिका सुषमा जाधव यांनी केले आहे. महासंचालनालयाच्या अधिकृत समाजमाध्यमांवरही ही मुलाखत उपलब्ध होणार आहे.

X (Twitter) : https://twitter.com/MahaDGIPR⁠

Facebook : https://www.facebook.com/MahaDGIPR⁠

YouTube : https://www.youtube.com/MAHARASHTRADGIPR⁠

एकात्मिक बाल विकास सेवा (आयसीडीएस) योजना ही देशातील सर्वात महत्त्वाची सामाजिक कल्याण योजना असून, बालकांचे पोषण व आरोग्य सुधारणा, पूर्व-प्राथमिक शिक्षण तसेच गर्भवती व स्तनदा मातांची काळजी घेणे ही तिची प्रमुख उद्दिष्टे आहेत. राज्यातील गरजू महिला व बालकांसाठी टेक होम रेशन (टीएचआर), गरम ताजा आहार, डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम अमृत आहार योजना, प्रधानमंत्री मातृवंदना योजना आणि पाळणाघर (क्रेच) योजना यासारख्या विविध उपक्रमांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात येत आहे.

‘कुपोषणमुक्त महाराष्ट्र’ राष्ट्रीय पोषण सप्ताह आणि ‘सुवर्णमयी 1000 दिवस’ उपक्रम, अतीतीव्र (एसएएम) व मध्यम (एमएएम) कुपोषण तसेच महिलांमधील ॲनिमिया कमी करण्यासाठी विभागाने निश्चित उद्दिष्टे ठरवून त्यानुसार प्रभावी उपाययोजना याशिवाय ‘पोषण भी पढाई भी’, ‘आनंदी बालशिक्षण’, ‘जादुई पिटारा’ आणि खेळणी-आधारित अध्यापनशास्त्र या प्रशिक्षण उपक्रमांमुळे बालकांच्या सर्वांगीण विकासाला कशा प्रकारे चालना देण्यात येत आहे आणि या उपक्रमांची अंमलबजावणी कशा प्रकारे करण्यात येत आहे, याबाबत आयुक्त सरदेशमुख यांनी ‘दिलखुलास’ आणि ‘जय महाराष्ट्र’ कार्यक्रमातून माहिती दिली आहे.

०००

जयश्री कोल्हे/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *