मुंबई उपनगर जिल्ह्यात ‘महासंस्कृती महोत्सव २०२४’चे २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत आयोजन – जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर

            मुंबई दि. २० : सांस्कृतिक कार्य विभाग व मुंबई उपनगर जिल्हा प्रशासनच्यावतीने महासंस्कृती महोत्सव २०२४ चे आयोजन जिल्ह्यात गोरेगाव चेंबूर विलेपार्ले या ठिकाणी २१ ते २८ फेब्रुवारी कालावधीत करण्यात आले असल्याची माहिती जिल्हाधिकारी राजेंद्र क्षीरसागर यांनी दिली.

            मुंबई उपनगर जिल्हा कार्यालयात जिल्हाधिकारी श्री. क्षीरसागर यांनी महोत्सवाची माहिती देण्यासाठी माध्यम प्रतिनिधींशी संवाद साधला.

            जिल्हाधिकारी क्षीरसागर म्हणाले की, राज्यातील विविध संस्कृती आणि परंपरांचा जागर करण्यासाठी तसेच पुढील पिढीला इतिहासाची, संस्कृतीची माहिती व्हावी या उद्देशाने या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. सोहळ्याचे उद्घाटन २१ फेब्रुवारी रोजी पालकमंत्री मंगलप्रभात लोढा, क्रीडा व युवक कल्याण मंत्री संजय बनसोडे यांच्या हस्ते होणार आहे.

            महोत्सवाचे उद्घाटन शिव सोहळ्याने होणार आहे. या अंतर्गत मी मराठी या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित कार्यक्रमाचे सायंकाळी  ६.३० वाजता मालाड पश्चिम येथील मालवणी, अंबोजवाडी मैदान येथे आयोजन करण्यात आले आहे.

            २३ ते २४ फेब्रुवारी या कालावधीत संत संमेलन कार्यक्रमांतर्गत व्याख्यान, सन्मान सोहळा, शोभा यात्रा तसेच विविध स्पर्धांचे आयोजन सकाळी १० वाजेपासून विलेपार्ले पश्चिम येथील सन्यास आश्रम येथे करण्यात आले आहे.

            २४ व २५ फेब्रुवारी रोजी बुद्ध महोत्सवात पुस्तक प्रदर्शन, व्याख्यान, शोभा यात्रा, महिला मेळावा, शाहिरी जलसा, भीमगीत स्पर्धा, धम्म परिसंवाद, संविधान रॅली टिळक नगर येथे लोकमान्य टिळक टर्मिनल जवळ सर्वोदय बुद्धविहारात सकाळी १० वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे.

            २७ ते २८ फेब्रुवारी रोजी शबरी महोत्सव अंतर्गत लोकनृत्य, वस्तू प्रदर्शन, आदिवासी भागातील जनजाती पूजा पद्धती, वैदू संमेलन ७५ जनजाती क्रांतिकारकांची प्रदर्शनी, आदिवासी महिलांच्या संमेलनाचे सकाळी १० वाजेपासून आयोजन करण्यात आले आहे. तर, आदीशक्ती आदीमाया या महोत्सव अंतर्गत संध्याकाळी ६.३० वाजता महाराष्ट्रातील आदिशक्तीची साडेतीन शक्तिपीठे व नारीशक्ती यांना समर्पित नृत्य, गीत यांचा कलाविष्कार गोरेगाव येथे मध्यवर्ती आरे डेअरीचे पटांगण येथे आयोजित करण्यात आले आहे.

            २८ फेब्रुवारी रोजी महासंस्कृती महोत्सवाच्या सांगता समारंभात संगीत शिवस्वराज्य गाथाचे आयोजन करण्यात आले आहे. ४२ नवं गीतांमधून साकारलेलं संगीतमय शिवचरित्र संध्याकाळी ६.३० वाजता आरे कॉलनीच्या मध्यवर्ती पटांगणात आयोजित करण्यात आले आहे.

            जास्तीत जास्त नागरिकांनी या महोत्सवाचा आनंद लुटावा, असे आवाहन जिल्हाधिकारी क्षीरसागर यांनी नागरिकांना केले आहे.

000

श्रद्धा मेश्राम/ससं/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *