शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते व पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या उपस्थितीत लोकार्पण

कोल्हापूर, दि. 18 (जिमाका):  थोर, प्रतिभावंत साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या स्मृती जतन करण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून आवश्यक ते सर्व सहकार्य करण्यात येईल, अशी ग्वाही पालकमंत्री हसन मुश्रीफ यांनी दिली.

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा येथे जिल्हा वार्षिक योजनेतून 50 लाख रुपये व जिल्हा परिषदेच्या 30 लाख रुपयांच्या निधीतून साकारण्यात आलेल्या ‘मृत्युंजय’ कार शिवाजीराव सावंत स्मृती दालनाचे लोकार्पण पालकमंत्री हसन मुश्रीफ यांच्या अध्यक्षतेखाली व उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या हस्ते पार पडले, यावेळी ते बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश आबीटकर, आमदार राजेश पाटील, जिल्हा परिषदेचे प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी अजयकुमार माने, स्वर्गीय शिवाजीराव सावंत यांच्या पत्नी मृणालिनी शिवाजीराव सावंत, मुलगा अमिताभ सावंत, पत्रकार तथा निर्धार संस्थेचे समीर देशपांडे व मृत्यंजय प्रतिष्ठान चे सागर देशपांडे तसेच सावंत कुटुंबीय व तालुक्यातील मान्यवर उपस्थित होते. हे दालन उभारण्यासाठी सहकार्य करणाऱ्या विविध मान्यवरांचा व कुटुंबीयांचा सन्मान यावेळी मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

      पालकमंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, अत्यंत प्रतिकूल शेतकरी कुटुंबात शिवाजीराव सावंत जन्मले होते. लहानपणी एका निबंधामध्ये त्यांनी ‘आपण लेखक होणार’ असे लिहिले होते आणि याच दिशेने प्रवास करत जिद्दीने ते थोर प्रतिभावंत साहित्यिक बनले. शिवाजीराव सावंत हे हयात असते तर साहित्य क्षेत्राला आणखी झळाळी मिळाली असती अशा शब्दात त्यांनी त्यांच्या कार्याचा गौरव करुन शिवाजीराव सावंत स्मृती दालन जतन होण्यासाठी आणि त्यांच्या स्मृती अधिकाधिक नागरिकांपर्यंत पोहोचवण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न करू असे त्यांनी सांगितले. पारगड येथे छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा उभारण्यासाठी प्रयत्न करण्यात येतील अशी ग्वाही त्यांनी यावेळी दिली.

शिवाजीराव सावंत स्मृती दालनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळेल  उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील

            उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील म्हणाले, प्रख्यात साहित्यिक शिवाजीराव सावंत यांच्या कुटुंबीयांनी त्यांच्या केवळ आठवणी न जपता समाजात चांगले काम करणाऱ्या व्यक्तींचा सन्मान करण्याचा महत्त्वपूर्ण उपक्रम पुण्यात सुरु केला आहे, हे प्रेरणादायी आहे. जिल्हा परिषदेच्या माध्यमातून हे उत्कृष्ट स्मृती दालन उभारण्यात आले असून त्याची देखभाल दुरुस्तीही वेळोवेळी व्हायला हवी. शिवाजीराव सावंत स्मृती दालनाच्या माध्यमातून नवोदित साहित्यिकांना प्रेरणा मिळेल, असा विश्वास व्यक्त करुन या दालनामध्ये राज्यातील नामांकित साहित्यिकांच्या उपस्थितीत वर्षातून एक तरी साहित्यिक सोहळा आयोजित करावा अशी अपेक्षा त्यांनी यावेळी व्यक्त केली.

   आमदार प्रकाश आबीटकर म्हणाले, सध्या केवळ सोशल मीडियातील मजकुराच्या वाचनावर आपला भर असल्यामुळे वाचन संस्कृती लोप पावत चालली आहे. आजऱ्यात उभारण्यात आलेले हे स्मृतती दालन सध्याच्या तरुण पिढीला प्रेरणादायी ठरेल. या दालनाचा उपयोग तरुण पिढीला जास्तीत जास्त पद्धतीने कशा प्रकारे होईल यासाठी प्रयत्न व्हावेत. शासकीय इमारती दालने यांचा उपयोग जास्तीत जास्त लोकांना करून देण्यासाठी जिल्हा परिषदेच्या माध्यमातून नियोजनबद्ध प्रयत्न व्हावेत. स्वर्गीय सु.रा. देशपांडे यांच्याप्रमाणे त्यांची दोन्ही मुले पत्रकार सागर व पत्रकार समीर देशपांडे हे सामाजिक कार्यासाठी झटत असून हे दालन उभारण्यासाठी त्यांनी पाठपुरावा केल्याबद्दल त्यांचे कौतुक आहे.

           शिवाजीराव सावंत स्मृतीदालन हे जिल्ह्यासह राज्यभरातील युवकांना माहितीपूर्ण व मार्गदर्शनपर ठरेल, असा विश्वास आमदार राजेश पाटील यांनी व्यक्त केला.

           साहित्यिकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे प्रख्यात साहित्यिक शिवाजीराव सावंत यांचे स्मृतीदालन युवकांना प्रेरणादायी ठरेल, असा विश्वास व्यक्त करुन विविध क्षेत्रात नाव उंचावणाऱ्या आजरा तालुक्यातील प्रतिभावंतांच्या माहितीवर आधारित कलादालन उभारण्यासाठी जिल्हा वार्षिक योजनेतून निधी मिळावा, अशी अपेक्षा प्रास्ताविकातून निर्धार संस्थेचे समीर देशपांडे यांनी व्यक्त केली.

  मृत्युंजय प्रतिष्ठानचे सागर देशपांडे यांनी साहित्यिक शिवाजीराव सावंत यांचे जीवनचरित्र उलगडले. शिवाजीराव सावंत यांचे साहित्य वाचून प्रेरणा घेवून अनेक व्यक्तींनी आत्महत्येचा विचार बाजूला सारला, तर अनेकांना सीमेवर लढण्याचे बळ मिळाल्याचे दाखले त्यांनी मनोगतातून दिले. साहित्यकृती जगण्याचे बळ देतात, जवानांना देशासाठी लढण्याचे बळ देतात. वाचन संस्कृती जपण्यासाठी, साहित्यिकांच्या स्मृती जपण्यासाठी शासन सहकार्य करत असून समाजानेही यासाठी योगदान द्यावे, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.

शिवाजीराव सावंत स्मृतीदालनाविषयी

कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा तालुक्यात जिल्हा वार्षिक योजना व जिल्हा परिषदेच्या माध्यमातून उभारण्यात आलेल्या शिवाजीराव सावंत स्मृती दालनामध्ये साहित्यिक शिवाजीराव सावंत यांची सचित्र माहिती देण्यात आली आहे. त्यांनी लिहिलेल्या मृत्युंजय कादंबरी विषयीची माहिती, छावा कादंबरी चे पूजन केल्याच्या प्रसंगाचे छायाचित्र बालपण शिक्षण व विवाह मृत्युंजय कादंबरी ला मिळालेला भारतीय ज्ञानपीठ संस्थेचा 1995 चा मूर्ती देवी पुरस्कार जाहीर झाल्याचे व तत्कालीन उपराष्ट्रपती के.आर. नारायणन यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान केल्याचे व विविध क्षेत्रातील नामवंत व्यक्तींसोबतची छायाचित्रे, भावमुद्रा, पत्रव्यवहार शासनाच्या वतीने व विविध संस्थांच्या वतीने मिळालेले पुरस्कार, विविध ग्रंथसंपदा त्याचबरोबर त्यांच्या निधनाची वृत्तपत्रीय कात्रणे व शोकसंदेश देण्यात आला आहे. तसेच प्रतिभावंतांचे आजरे या दालनामध्ये कलामहर्षी बाबुराव पेंटर, प्रतिभावंत शिक्षणतज्ञ जे. पी. नाईक, वनस्पतीशास्त्रज्ञ श्रीपाद लक्ष्मण आजरेकर, केसरीचे युरोप प्रतिनिधी द. वि. ताम्हणकर, ,’ झुंजार’ चे संपादक बाबुराव ठाकूर, संयुक्त महाराष्ट्राचा लढा गाजवणारे शाहीर गव्हाणकर, ‘सोबत’ कार ग.वा. बेहेरे, संस्कृत पंडित के. ना. वाटवे यांचीही सचित्र माहिती याठिकाणी देण्यात आली आहे.

*******

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *