दीक्षाभूमी स्मारक विकासकामांचा मंत्री संजय शिरसाट यांच्याकडून आढावा

नागपूर दि. १३: दीक्षाभूमी जागतिक पातळीवरील श्रद्धास्थान असल्याने येथे होणाऱ्या सर्व कामांचे नियोजन अत्यंत संवेदनशीलतेने, शास्त्रीय पद्धतीने आणि स्तूपाला कोणत्याही प्रकारचा धक्का न लागता पूर्ण दक्षता घेऊन आणि मुख्यमंत्र्यांच्या पूर्वपरवानगीने करावीत, अशा सूचना सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री संजय शिरसाट यांनी आज दिल्या.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक दीक्षाभूमी येथे सुरू असलेल्या आणि प्रस्तावित विकासकामांचा सविस्तर आढावा त्यांनी आज नियोजन भवन येथे घेतला. यावेळी सामाजिक न्याय विभागाचे प्रधान सचिव डॉ. हर्षदीप कांबळे, सुधार प्रन्यासचे सभापती संजय मिणा, जिल्हाधिकारी डॉ. विपीन इटनकर, समाजकल्याण आयुक्त दीपा मुधोळ-मुंडे, सहसचिव सो.ना.बागुल तसेच सामाजिक न्याय विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

मंत्री शिरसाट यांनी सांगितले की, कोणतेही काम हाती घेण्यापूर्वी संबंधित तज्ज्ञ आणि हितधारकांशी सखोल चर्चा करून नियोजन करावे. दीक्षाभूमीतील सुशोभीकरण, सुविधा आणि पायाभूत विकासकामे ही जागतिक दर्जाची असावीत, जेणेकरून देश-विदेशातून येणाऱ्या अनुयायांना अधिक चांगल्या सुविधा उपलब्ध होतील. दीक्षाभूमीच्या ऐतिहासिक, सामाजिक आणि सांस्कृतिक महत्त्वाला अनुसरून विकासकामे करताना परंपरा, श्रद्धा आणि संवेदनशीलतेचा आदर राखणे अत्यावश्यक असल्याचे त्यांनी सांगितले.

यावेळी दीक्षाभूमी परिसरातील विविध विकास कामांवर  चर्चा करण्यात आली. यात प्रवेशद्वार क्रमांक 1 व 2, सार्वजनिक सुविधा, वाहनतळ व्यवस्था, संग्रहालय, अॅम्फी थिएटर, विस्तीर्ण परिक्रमा मार्ग, बोधीवृक्ष परिसर, वॉच टॉवर, तसेच आवश्यक सेवा-सुविधांचा समावेश होता.

बैठकीस प्रादेशिक उपायुक्त प्रसाद कुलकर्णी, सहआयुक्त सचिन ढोले, सहायक पोलीस आयुक्त रोशन पंडित, कार्यकारी अभियंता नरेश लभाने, संशोधन अधिकारी गणेश मरकड व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

०००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *