अमळनेर येथे मुलींचे शासकीय वसतिगृह इमारतीचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते उद्या होणार उद्घाटन 

जळगाव,दि.२ – समाजकल्याण विभागाच्या वतीने अमळनेर येथे उभारण्यात आलेल्या १०० विद्यार्थी क्षमतेच्या मागासवर्गीय मुलींच्या शासकीय वसतिगृह इमारतीचे उद्घाटन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्या रविवार ४ फेब्रुवारी २०२४ रोजी  होत आहे. दुपारी अडीच वाजता होणाऱ्या या कार्यक्रमास उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, ग्रामविकास मंत्री  गिरीश महाजन, जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री गुलाबराव पाटील, आपत्ती व्यवस्थापन व मदत पुनर्वसन मंत्री अनिल पाटील यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे.  सामाजिक न्याय विभागाचे सचिव सुमंत भांगे, विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, समाजकल्याण आयुक्त ओमप्रकाश बकोरिया, जिल्हाधिकारी आयुष प्रसाद, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी श्री. अंकित, मुख्य अभियंता सार्वजनिक बांधकाम प्रशांत औटी, समाजकल्याण नाशिक विभागाचे प्रादेशिक उपायुक्त माधव वाघ, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता प्रशांत सोनवणे आदी उपस्थित राहणार असल्याची माहिती योगेश पाटील, सहायक आयुक्त, समाज कल्याण व  प्रांजल पाटील, कार्यकारी अभियंता, सार्वजनिक बांधकाम विभाग यांनी दिली आहे.

या १०० विद्यार्थी क्षमतेच्या वसतिगृहासाठी सन २०१४ मध्ये अमळनेर येथील गट क्रमांक ३९३  मध्ये ०. ८० आर जागा उपलब्ध झाल्याने येथे शासन निर्णयानुसार रुपये ८ कोटी ५५ लाख इतक्या रकमेच्या प्रशासकीय खर्चास मान्यता मिळाली होती. त्यानुसार इमारत पूर्ण झालेली असून मुलींकरिता 27 स्वतंत्र खोल्या तयार करण्यात आल्या आहेत. तसेच प्रत्येक खोलीत सौर ऊर्जा संचलित गरम पाण्याची सोय करण्यात आली आहे. स्वतंत्र अभ्यासिका खोली असून सौर ऊर्जा संचलित विद्युतीकरण करण्यात आले आहे. तसेच ६ हजार चौरस फुटाचे कोर्ट यार्ड तयार करण्यात आले असून दिव्यांग विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र खोल्या तयार केल्या आहेत. त्याचबरोबर स्वतंत्र भोजन कक्ष व स्टोअर रूम असून गृहपालांना निवासाची व्यवस्था स्वतंत्रपणे करण्यात आली आहे.

000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *