सागरी वाहतूक क्षेत्रात गुंतवणुकीसाठी लिथुआनियाला सर्वतोपरी सहकार्य – मंत्री संजय बनसोडे

मुंबई, दि. ३० : महाराष्ट्राला ७२० किलोमीटर लांबीचा सागरी किनारा लाभला आहे. राज्यात सागरी वाहतूक आणि त्या अनुषंगाने विकासाच्या अनेक संधी उपलब्ध आहेत. या क्षेत्रातील गुंतवणूक कऱण्यासाठी लिथुआनियातील उद्योजकांना सर्वतोपरी सहकार्य केले जाईल, असे राज्याचे बंदरे विकास मंत्री संजय बनसोडे यांनी सांगितले.

लिथुआनियाच्या शिष्टमंडळाने आज मंत्रालयात मंत्री श्री. बनसोडे यांची भेट घेऊन येथील सागरी क्षेत्र वाहतुकीतील विविध संधींबाबत चर्चा केली.

लिथुआनियाचे भारतातील राजदूत डायना मिक्व्हीसीन, डायरेक्टर जनरल कापेडा सी पोर्ट ॲथॅारिटीचे अल्गीस लटाकस यांच्यासह तेथील बंदरे विभागाचे महासंचालक, महाराष्ट्र सागरी महामंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी माणिक गुरसळ, बंदरे विभागाचे सहसचिव सिद्धार्थ खरात, प्रशासन अधिकारी प्रदीप बढिये, राजशिष्टाचार विभागाचे अवर सचिव  मिलिंद हरदास आदी उपस्थित होते.

मंत्री श्री. बनसोडे म्हणाले, लिथुआनिया हा बाल्टीया प्रदेशापैकी एक सागरी विकास क्षेत्रात अग्रणी भाग आहे. राज्यात सागरी विकास धोरण २०२३ मधील विविध नवीन वैशिष्ट्य सागरी पर्यटन, नवीन बंदरे, मालवाहतुकीसाठी रस्ते व रेल्वे कडून देण्यात येणाऱ्या सोयी सुविधासह अद्यावत तंत्रज्ञानाच्या वापराबाबत शिष्टमंडळाने समाधान व्यक्त केले असल्याचे सांगितले.

यावेळी महाराष्ट्र आणि लिथुआनियातील सागरी क्षेत्रातील विविध संधींसंदर्भात मंत्री श्री. बनसोडे यांनी या शिष्टमंडळाशी चर्चा केली. राज्यातील सागरी वाहतूक आणि इतर संधीच्या अनुषंगाने सादरीकरणही करण्यात आले. यावेळी बंदरे विकास मंत्री आणि सागरी विकास मंडळाचे अधिकारी यांना लिथुआनियाच्या सागरी विकास, उद्योगास भेट देण्याचे निमंत्रण शिष्टमंडळाने दिले.

महाराष्ट्रात काम करणे निश्चितपणे आवडेल, अशी भावना यावेळी शिष्टमंडळातील सदस्यांनी व्यक्त केली. एकत्रितपणे बंदरे विकासाच्या अनुषंगाने यापुढील काळात काम करण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली. मंत्री श्री. बनसोडे यांनी, या क्षेत्रातील गुंतवणुकीच्या अनुषंगाने राज्यात निश्चितपणे स्वागत आणि सहकार्य केले जाईल, असे सांगितले.

000

दीपक चव्हाण/राजू धोत्रे/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *