माजलगाव मतदारसंघातील विविध कामांचा सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी घेतला आढावा

मुंबई, दि. ३० : माजलगाव तालुक्यात राज्य रस्ते विकास महामंडळ, महाराष्ट्र जीवन प्राधिकरण व नगरविकासाची विविध कामे संबंधित यंत्रणेने मिशन मोडवर पूर्ण करण्याचे निर्देश सार्वजनिक बांधकाम मंत्री दादाजी भुसे यांनी दिले.

माजलगाव मतदारसंघातील विविध विकासकामांचा आढावा निर्मल भवन येथील राज्य रस्ते विकास महामंडळाच्या कार्यालयात घेण्यात आला, त्यावेळी  श्री. भुसे बोलत होते. यावेळी आमदार प्रकाश सोळंके, राज्य रस्ते  विकास महामंडळाचे उपाध्यक्ष तथा व्यवस्थापकीय संचालक अनिल गायकवाड, अधीक्षक अभियंता श्री. सुरवसे यांच्यासह बीड जिल्ह्यातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माजलगाव ते केज आणि माजलगाव ते परतूर या रस्त्यांची कामे २०१८ ला पूर्ण झाली, मात्र अनेक ठिकाणी रस्त्याला भेगा पडल्याच्या तसेच रस्त्याचे पाणी वाहून न जाता साचत असल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या असल्याचे  आमदार श्री. सोळंके यांनी सांगितले. यावर  श्री. भुसे यांनी  १०० मीटर नालीचे बांधकाम  प्रक्रिया पूर्ण करण्याचे, पावसाचे पाणी गटारीतून वाहून जाण्याची व्यवस्था करण्याचे तसेच रस्त्यांची ठिकठिकाणी दुरूस्ती करून  भेगा भरून घेवून ही कामे त्वरित पूर्ण  करण्याचे निर्देश दिले.

माजलगाव शहर पाणीपुरवठ्याच्या पाईपलाईनचे काम पूर्ण करून सद्यस्थितीत झालेल्या कामाचे हस्तांतरण करावे. जीवन प्राधिकरण, सार्वजनिक बांधकाम विभागाच्या शाखा अभियंता यांनी दोन दिवसात पाहणी करून हस्तांतरण  अहवाल सादर करावा, असे निर्देशही श्री. भुसे यांनी दिले.

माजलगाव-केज मार्गावर थेटेगव्हाण ते धारूर घाट अरूंद, वळणाचा असल्याने तसेच वाहतुकीची वर्दळ असल्याने अपघाताचे प्रमाण वाढले आहे हा भाग अपघात प्रवण क्षेत्र म्हणून घोषित करून ब्लॅक स्पॉटच्या यादीत टाकावा. शिवाय रस्त्याच्या रूंदीकरणासह, अपघात टाळण्यासाठी प्रयत्न करावेत. तांत्रिक सल्लागारामार्फत सर्वेक्षण करून वळण रस्ता बाबत कार्यवाही करावी, परतूर माजलगाव रस्त्याचे काम मेपर्यंत पूर्ण करण्याचे निर्देशही सार्वजनिक बांधकाम मंत्री श्री. भुसे यांनी दिले.

००००

धोंडीराम अर्जुन/स.सं

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *