पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देणार – पर्यटन मंत्री गिरीश महाजन

मुंबई, दि. 28 : ग्रामीण पर्यटनाचा विकास करून शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची शपथ पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी ‘मुंबई फेस्टिव्हल 2024’ समारोप प्रसंगी सर्वांना दिली. पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देण्यासाठी आपण सर्वांनी मिळून प्रयत्न करु. असे आवाहन पर्यटन मंत्री श्री. महाजन यांनी केले.

राज्य शासनाचा पर्यटन विभाग आणि मुंबई फेस्टिव्हल समिती मार्फत’ मुंबई फेस्टिव्हल 2024 मुंबई येथे दि. 20 ते 28 जानेवारी दरम्यान सुरू होता. या फेस्टिव्हलचा समारोप एमएमआरडीए मैदान क्र. 5 व 6 वांद्रे येथील महा मुंबई एक्सापो प्रदर्शनामध्ये ‘कॉन्सर्ट फॉर चेंज’ या कार्यक्रमाने झाला. त्यावेळी मंत्री श्री. महाजन बोलत होते.

या कार्यक्रमाला  मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्रा, अपर मुख्य सचिव भूषण गगराणी, संयुक्त राष्ट्र संघाचे स्थानिक सचिव शोभा शहा, पर्यटन सचिव जयश्री भोज, पर्यटन संचालक डॉ.बी.एन.पाटील, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालक श्रद्धा जोशी-शर्मा, संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा, पर्यटन सदिच्छा दूत नवेली देशमुख यावेळी उपस्थित होते.

मंत्री श्री. महाजन म्हणाले की, पर्यावरण पूरक पर्यटनाला चालना देण्याबरोबरच रोजगार निर्मितीही उपलब्ध होणार आहे. अनेक देशांची अर्थव्यवस्था पर्यटनावर आधारित आहे. जास्तीत जास्त रोजगार निर्माण करण्यासाठी पर्यटनाला चालना देणार असून राज्याला 720 किलोमीटर लांबीचा विस्तीर्ण आणि निसर्गरम्य लाभलेला समुद्र किनारा लाभला असून, ऐतिहासिक गड – किल्ले, अजिंठा, वेरूळ येथील जगप्रसिद्ध लेणी, जैवविविधतेने समृद्ध वने, तेथील वन्य प्राणी, धार्मिक स्थळे लाभली आहेत. त्यामुळे महाराष्ट्रात पर्यटन विकासाला मोठी संधी आहे. पर्यटन क्षेत्राला चालना देण्यासाठी विविध उपक्रम राबविले जात असून त्याचाच एक भाग म्हणून मुंबई फेस्टिव्हल 2024 हा आनंद महिंद्रा यांच्या अध्यक्षतेखाली  उत्कृष्टपणे राबवला गेला पुढील वर्षीही यापेक्षा अधिक चांगले कार्यक्रम फेस्टिवल मध्ये आयोजित करण्यात येतील असेही ते म्हणाले.

पर्यटन मंत्री श्री. महाजन म्हणाले की, धकाधकीच्या जीवनात आनंदाचे क्षण मिळावेत हीच या महोत्सवाच्या आयोजनामागील भूमिका आहे. या उत्सवाचा प्रत्येकाने आनंद घेतला पाहिजे. त्यासाठी या महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. यामुळे मुंबईतील पर्यटन क्षेत्राला चालना मिळणार आहे.

पुढील वर्षी अधिक लोकप्रिय उपक्रम राबविणार : आनंद महिंद्रा

मुंबई फेस्टिव्हल सल्लागार समितीचे अध्यक्ष आनंद मंहिद्रा म्हणाले की, गेले आठ दिवस सुरू असलेला मुंबई फेस्टिव्हल 2024 चा आज समारोप होत आहे. एक मॅरेथॉन स्पर्धेत सहभाग घेतला आणि ती रेस आज संपली आहे असे वाटत आहे. गेले आठ दिवस विविध मनोरंजनपर आणि लोकांना आवडणारे विविध कार्यक्रम ठेवले आणि याला मुंबईकरांचा चांगला प्रतिसाद मिळाला. मंत्री मंगल प्रभात लोढा यांच्या संकल्पनेतून मुंबई फेस्टिव्हल ची सुरुवात करण्यात आली. या उपक्रमाला  पर्यटन मंत्री गिरीश महाजन यांनी आणि त्यांच्या सहकारी टीमने आयोजन केले. विझ क्राफ्ट संस्थेने केलेले उत्कृष्ट काम मुंबई फेस्टिव्हलचे संकल्प गीत, ‘सपनो का गेटवे’ या  गीताने सर्वांना मोहिनी घातली. सर्व मुंबईकरांचा मिळालेला प्रतिसाद पाहता पुढच्या वर्षी 2025 मध्ये  यापेक्षा अधिक लोकप्रीय उपक्रम राबविणार असेही ते म्हणाले.

यावेळी  शाश्वत विकासाकडे वाटचाल करण्याची पर्यावरण पूरक जीवनशैली अंगिकारून गरजेचे आहे असा संदेश संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा यांनी दिला.

‘कॉन्सर्ट फॉर चेंज’ या कार्यक्रमात संयुक्त राष्ट्रसंघाच्या सदिच्छा दूत अभिनेत्री दिया मिर्झा, सुप्रसिद्ध संगीतकार अजय-अतुल, अभिनेत्री परिणीती चोप्रा, सोनाली कुलकर्णी  हे कलाकार सहभागी झाले होते.

मुंबई फेस्टिव्हल 2024′ मध्ये गेले 20 ते 27 जानेवारी रोजी झालेल्या उपक्रमांचे यावेळी व्हिडिओ दाखवण्यात आला.

 000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *