गरिबांच्या हडप केलेल्या जागा त्यांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ११ : गरिबांच्या जागा धाकदपट करून, जबरदस्तीने किंवा आमिष दाखवून हडप केल्या जात असल्याच्या तक्रारी आहेत. संपूर्ण राज्यात अशा जागांची तपासणी करून गरिबांच्या हडप केलेल्या जमिनी त्यांना परत मिळवून देण्यासाठी विशेष मोहीम राबविण्यात येईल, अशी घोषणा विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी केली.
या संदर्भात सदस्य असलम शेख यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री योगेश सागर, अबू आझमी यांनीही सहभाग घेतला.
प्रश्नाच्या उत्तरात अधिक माहिती देताना महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, कल्याण तालुक्यातील मौजे गोळवली येथील महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे वारसदार यशवंत भीमराव आंबेडकर यांच्या जागेवर अनधिकृत बांधकाम करण्यात आल्याची तक्रार प्राप्त झाली. या जागेवर ७२ सदनिका, ८ व्यावसायिक गाळ्यांचे बांधकाम करण्यात आले. हे सर्व अनधिकृत बांधकामे तोडण्यात आली असून ही जागा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या वारसांना देण्यात आली आहे. याबाबत तत्कालीन संबंधित अधिकाऱ्यांची चौकशी करून त्यांच्यावर कारवाई करण्यात येईल. या इमारतीमध्ये सदनिका व गाळे घेणाऱ्या नागरिकांचा कुठलाही दोष नाही. त्यांना मोबदला देण्याबाबतची कार्यवाही करण्यात येईल.
मुंबई महानगर प्रदेश क्षेत्रामध्ये झोपड्या विकल्या जात असल्याप्रकरणी महसूल विभाग संबंधित यंत्रणेच्या सहकार्याने नियंत्रण ठेवील. अशा भूमाफीयांवर कारवाई करण्यासाठी शासन गंभीर आहे. त्यांच्यावर कठोर कारवाई करण्यात येईल. शासनाच्या जमिनीवर कुठेही अतिक्रमण न होण्यासाठी संबंधित यंत्रणेने त्या जागांचे संरक्षण करावे. शासकीय जमिनींवर अतिक्रमण न होण्यासाठी कायदा करण्याबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा करण्यात येईल. नागपूर शहरातील शासकीय जमिनींवरील अतिक्रमणाबाबत नागपूर, जिल्हाधिकारी यांना सूचना देऊन कारवाई करण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
0000
कुशीवली धरणासाठी भूसंपादन केलेल्या शेतकऱ्यांना अधिकचा मोबदला – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि ११ : कुशीवली (ता. उल्हासनगर जि. ठाणे) धरणासाठी ८५.४० हेक्टर क्षेत्र संपादित करण्यात आले आहे. या भूसंपादनापोटी एकूण ७२ सर्वे क्रमांकामध्ये १९. ८४ कोटींचा निवाडा घोषित करण्यात आला, तर त्यापैकी एकूण २५ सर्वे नंबर करिता ११.४४ कोटी एवढ्या मोबदल्याचे वाटपही करण्यात आले. उर्वरित एकूण 23 सर्वे नंबर करिता जलसंपदा विभागाकडे 10 कोटी 10 लाख 77 हजार 120 रुपयांची मागणी करण्यात येणार आहे. शेतकऱ्यांना सद्यस्थितीतील दरानुसार अधिकचा मोबदला देण्यासाठी शासन सकारात्मक आहे, असे महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात सांगितले.
कुशीवली धरणातील भूसंपादित शेतकऱ्यांना मोबदला देण्याबाबत सदस्य किसन कथोरे यांनी प्रश्न उपस्थित केला होता. या प्रश्नाच्या चर्चेमध्ये सदस्य सर्वश्री प्रशांत बंब, नाना पटोले, सुलभा गायकवाड यांनीही सहभाग घेतला.
महसूल मंत्री श्री. बावनकुळे म्हणाले, या धरणाच्या भूसंपादनात एकूण २३ सर्वे नंबरमध्ये तत्कालीन सेवानिवृत्त नायब तहसीलदार यांनी बनावट कागदपत्रांच्या आधारे अपहार केला. या प्रकरणी त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली होती. तसेच अपहार रक्कम वसुलीसाठी त्यांच्या खासगी मालमत्तेवर बोजा चढवून वसुलीची कार्यवाही सुरू आहे. तत्कालीन उपविभागीय अधिकारी यांनी कागदपत्रांची तपासणी करून मोबदला द्यावयास पाहिजे होता, मात्र त्यांनी तलाठी, मंडळ अधिकारी यांच्याकडून कुठलीही पडताळणी न करता हा मोबदला दिलेला आहे. याप्रकरणी ५१ आरोपींना अटक करण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना वाढीव मोबदला देण्यासाठी संबंधित अधिकारी व विभागासमवेत बैठकीचे आयोजन करण्यात येईल. प्रकल्पांसाठी शेतजमिनी भूसंपादित करताना संपादनाच्या वेळी असलेला दर लावण्याबाबत भूसंपादन कायद्यात बदल करावा लागणार आहे, त्याबाबत पडताळणी करून कार्यवाही करण्यात येईल, असेही महसूल मंत्री श्री. बावनकुळे यांनी यावेळी सांगितले.
0000
कल्याण तालुक्यातील कांबागाव येथील जमीन हस्तांतरण नियमानुसार – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे
मुंबई, दि. ११ : कल्याण तालुक्यातील कांबागाव येथील जमिनींचे हस्तांतरण नियमानुसार झाले असल्याची माहिती महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिली.
सदस्य अबू आझमी यांनी याबाबत प्रश्न उपस्थित केला होता.
महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, कांबागाव (ता. कल्याण जि. ठाणे) येथील संबंधित जमीन आदिवासी बांधवांची नसून ही जमीन मुंबई जमीन महसूल संहिता १८७९ नुसार २१ जानेवारी १९६० रोजी शासकीय जमिनी म्हणून घोषित केल्या होत्या. या जमिनीचे प्रकरण बऱ्याच कालावधीसाठी न्यायप्रविष्ट होते. तसेच या प्रकरणात उपविभागीय अधिकारी, जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्त यांच्या स्तरावर सुनावणी होऊन निकालही झालेले आहेत. सध्या स्थितीत सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाने ही जमीन सबंधित खरेदीदार आणि तीन कुळांच्या नावाने झालेली आहे.
००००
निलेश तायडे/विसंअ/