शेतीतील उत्पादन वाढविण्यासाठी प्रभावी नियोजन करा- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे

जिल्हास्तरीय खरीप हंगाम आढावा बैठक संपन्न

अमरावती, दि. २७ : राज्य शासन कृषी क्षेत्रातील विकासासंदर्भात विविध योजना राबवत आहे. या योजनांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पादन वाढण्यासाठी प्रभावी नियोजन करावे. तसेच कृषी विषयक बाबींचे मार्गदर्शन करण्यासाठी गावपातळीवर शेतकऱ्यांसाठी ‘संवाद बैठक’ म्हणून उपक्रम राबविण्यात यावा, असे निर्देश राज्याचे महसूल मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी कृषी विभागाला आज दिले.

येथील जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पालकमंत्र्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय खरिप आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी मार्गदर्शन करताना ते बोलत होते. आमदार सर्वश्री रवी राणा, प्रताप अडसळ, प्रवीण तायडे, राजेश वानखेडे, माजी आमदार प्रवीण पोटे-पाटील, कृषी सहसंचालक प्रमोद लव्हाळे, जिल्हा अधिक्षक कृषी अधिकारी राहुल सातपुते, संचालिका अर्चना निस्ताने, उपसंचालक वरुण देशमुख यांच्यासह जिल्ह्यातील सर्व तालुका कृषी अधिकारी आदी यावेळी उपस्थित होते.

यावेळी खरिप हंगामाच्या पार्श्वभूमीवर कृषी विभागाचे नियोजन व कामकाजासंदर्भात आढावा घेऊन पालकमंत्री श्री. बावनकुळे म्हणाले की, कृषी क्षेत्राचा व शेतकऱ्यांच्या सर्वांगिण विकासाच्या दृष्टीने राज्य शासन विविध योजना राबवित आहे. शेती पिकांचे संरक्षण आणि त्यांची जोपासना करण्यासाठी, पिकांवर आलेली कीड नियंत्रणासाठीचे कार्यक्रम, राष्ट्रीय अन्न सुरक्षा अभियानांतर्गत व्यापारी पिकांसाठीच्या योजना आदी उपक्रमही राबविले जात आहे. राज्य अन्नधान्याच्या उत्पादनात स्वयंपूर्ण होणे हा योजनेचा प्रमुख उद्देश आहे. शेतकऱ्यांना आर्थिक स्थैर प्राप्त होण्यासाठी अन्नधान्य पीक योजना, पौष्टिक तृणधान्य योजनेंतर्गत पीक प्रात्याक्षिके राबविली जातात. अन्नधान्य पीक क्षेत्र विस्तार व उत्पादकतेमध्ये वाढ करून शेतकऱ्यांच्या उत्पादनात शाश्वत वाढ करणे, जमिनीची सुपीकता व उत्पादन क्षमता वाढविणे आदी योजनांची प्रभावी अंमलबजावणी करण्यात यावी. खरिप हंगामासाठी बी-बियाणे व रासायनिक खतांचा पुरेसा साठा उपलब्ध ठेवून मागणीप्रमाणे त्याचे वितरण करावे. गरजू शेतकऱ्यांना बीयाणे व खतांचा पुरवठा उपलब्ध करुन द्यावा. बोगस बीयाणे, खते विक्रेत्यांवर कठोर कारवाई करण्यात यावी. बोगस बियाण्यांमुळे दुबार पेरणीची वेळ आली असा अनुभव सांगणारा एकही शेतकरी भेटू नये, असे पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील आदिवासी बहुल मेळघाट क्षेत्रातील शेतकऱ्यांना पौष्टिक तृणधान्याचे महत्व पटवून देऊन त्याक्षेत्रात कोदो, कुटूक, साका, नाचणी सारख्या तृणधान्याचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होण्यासाठी कृषी विभागाने शेतकऱ्यांना मार्गदर्शन करावे. शेती पिकांच्या उत्पादनात वाढ होण्यासाठी बी बियाणे व खतांचा पुरवठा करण्यात यावा. नैसर्गिक आपत्तीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळवून देण्यात द्यावी. सर्व तालुका कृषी अधिकाऱ्यांनी आपल्या अधिनस्त असलेल्या कृषी सहाय्यकांना प्रोत्साहन देऊन तालुक्याच्या शेती पिकांचे उत्पादन वाढीचे लक्षांक शंभर टक्के पूर्ण करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न करावे. शेतीसाठी सिंचन सुविधा व अखंडीत वीज पुरवठा उपलब्ध होण्यासाठी सोलर पंप योजनेच्या लाभ शेतकऱ्यांना मिळवून द्यावा. कृषी यांत्रिकीकरण योजनेतून शेतीला लागणारे औजारे व उपकरणे पुरविण्यात यावेत. पिकांच्या उत्पादन घेण्यात यशस्वी ठरलेल्या शेतकऱ्यांच्या शेताला तालुक्यातील शेतकऱ्यांची प्रत्यक्ष भेट करुन प्रात्यक्षिक दाखविण्यात यावे. शेतकऱ्यांचे शेतीतील उत्पादन वाढीसाठी कृषी योजनांचा त्यांना लाभ मिळवून द्यावा, असेही पालकमंत्र्यांनी यावेळी सांगितले.

जिल्ह्यातील तालुकानिहाय सरासरी पर्जन्यमान, पडलेला पर्जन्यमान अहवाल, खरीप पिक पेरणी क्षेत्र, झालेली पेरणी, पेरणीची टक्केवारी, बियाणे पुरवठा व विक्री, रासायनिक खत मागणी, पुरवठा व विक्री, कृषि निविष्ठांचे नमूने काढण्याचे लक्षांक, अनधिकृत एचटीबीटी कापूस बियाणे विक्री प्रकरणी केलेली कारवाई, ॲग्रीस्टॅक प्रकल्पांतर्गत झालेल्या कामाचा अहवाल, पीएम किसान योजनेंतर्गत अहवाल, प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना व नमो शेतकरी महासन्मान निधी योजना, गोपीनाथ मुंडे शेतकरी अपघात सुरक्षा सानुग्रह अनुदान योजना आदी संदर्भात जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी श्री. सातपुते यांनी सादरीकरणाच्या माध्यमातून जिल्ह्याच्या प्रगतीबाबतची माहिती दिली.

यावेळी बैठकीत पिकाची अन्नद्रव्यांची गरज पूर्ण करण्यासाठी जमिनीत टाकावयाची खते याबाबत मार्गदर्शनपर भित्तीपत्रकांचा मान्यवरांच्या हस्ते विमोचन करण्यात आले.

00000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *