महिला कलाकारांच्या ‘रंग मल्हार’ प्रदर्शनाचे सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते उद्या उद्घाटन

मुंबई, दि. २६ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमीकडून आयोजित महिला कलाकारांच्या ‘रंग मल्हार’ या विशेष पावसाळी कला प्रदर्शनाचे उद्घाटन सांस्कृतिक कार्य मंत्री ॲड.आशिष शेलार यांच्या हस्ते 27 जून रोजी सायंकाळी 5 वाजता अकादमीच्या कलादालनात होणार आहे. हे प्रदर्शन १० जुलैपर्यंत दररोज सकाळी 11 ते सायंकाळी 7 वाजेपर्यंत रसिक प्रेक्षकांसाठी विनामूल्य खुले राहणार आहे.

महाराष्ट्र, गुजरात, मध्यप्रदेश, तेलंगणा, राजस्थान या राज्यांसह जर्मनी, लंडन आणि दुबई येथील महिला कलाकारांच्या कलाकृतींचा या प्रदर्शनात सहभाग आहे. चित्रकला, शिल्पकला, छायाचित्रण, वस्त्रकला, टेपेस्ट्री आणि कॅलिग्राफी अशा विविध माध्यमांतील कलाकृतींचे दर्शन यातून घडणार आहे.

ज्येष्ठ कलाकार मंगल पाडेकर, नीलिमा कढे आणि शुभा वैद्य यांच्यासह सुप्रिया अंबर (जबलपूर), दिपाली मेहेर, भावना सोनवणे, अलोका बॅनर्जी, हिरल भगत, जयालक्ष्मी, दीपा कुलकर्णी, कंचन टोडी, करिष्मा वाधवा, समीक्षा जावळे, स्मिता राणे, तेजस्विनी चाफेकर, सुषमा अदाते, स्नेहा वऱ्हाडे, यशश्री शीरधनकर यांसारख्या विविध माध्यमांतील मान्यवर कलाकार प्रदर्शनात सहभागी झाले आहेत. ‘माउंटन इन मॉन्सून’ ही अलोका बॅनर्जी यांची टेपेस्ट्री, हिरल भगत यांचे कॅलिग्राफीतील काम आणि विविध ऍबस्ट्रॅक्ट पेंटिंग्ज विशेष आकर्षण ठरणार आहेत. स्वरंग या संस्थेने प्रदर्शनास सह- प्रायोजकत्व दिले आहे.

रसिकांनी या अनोख्या कला अनुभूतीला अवश्य भेट द्यावी, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

प्रदर्शन : रंग मल्हार, स्थळ : पु. ल. देशपांडे महाराष्ट्र कला अकादमी, प्रभादेवी, मुंबई, कालावधी : २७ जून ते १० जुलै २०२५, वेळ : सकाळी ११ ते संध्याकाळी ७, प्रवेश : सर्वांसाठी विनामूल्य.

000

संजय ओरके/विसंअ/

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *