‘मनरेगा’शी संबंधित मागण्यांबाबत सकारात्मक – मंत्री भरत गोगावले

मुंबई, दि. १७ : शेतकरी, शेतमजूर, दिव्यांग, विधवा महिला, बेरोजगार युवक, मेंढपाळ आणि मच्छीमार बांधव यांच्याशी संबंधित विविध मागण्यांवर चर्चा करण्यासाठी रोजगार हमी योजना, फलोत्पादन व खारभूमी विकास मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू यांच्या निवेदनाच्या अनुषंगाने मंत्रालयात उच्चस्तरीय संयुक्त बैठक झाली.

माजी राज्यमंत्री ओमप्रकाश उर्फ बच्चू कडू दूरदृश्यप्रणालीद्वारे सहभागी झाले होते. तर मनरेगा आयुक्त डॉ. भरत बास्टेवाड, रोहयो विभागाचे सहसचिव अतुल कोदे, उपसचिव अरविंद पगार, पशुसंवर्धन विभागाचे उपसचिव श्री. मराळे, दिव्यांग कल्याण विभागाच्या उपसचिव सुनंदा घड्याळे तसेच संबंधित विभागांचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

माजी राज्यमंत्री कडू म्हणाले की, पेरणीपासून ते कापणीपर्यंतच्या सर्व मजुरीची कामे मनरेगात समाविष्ट करावीत, फळपिके व दुग्धव्यवसायालाही ‘मनरेगा’शी जोडावे, ‘मनरेगा’मधील मजुरी ३१२ रुपये वरून ५०० रुपये करण्यात यावी, दिव्यांग व विधवांना दरमहा ६ हजार रुपये मानधन द्यावे या मागण्या बैठकीत करण्यात आल्या.

या मागण्यांवर सकारात्मक प्रतिसाद देताना मंत्री गोगावले म्हणाले, या सर्व मागण्यांबाबत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री अजित पवार तसेच संबंधित विभागाचे मंत्री यांच्याशी चर्चा करून, योग्य तो अभिप्राय घेऊन धोरणात्मक निर्णय घेण्यात येईल. राज्य शासन या मागण्यांकडे सकारात्मक दृष्टीने पाहत असल्याची ग्वाही मंत्री गोगावले यांनी दिली.

०००

काशीबाई थोरात/विसंअ

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *