येत्या नवरात्रौत्सवात तुळजापूर विकास प्रकल्पाचे भूमिपूजन-मंत्री प्रताप सरनाईक

मुंबई, दि. १७ : श्री क्षेत्र तुळजापूर येथील कुलस्वामिनी तुळजाभवानी मंदिर परिसराच्या विकास प्रकल्पाचे भूमिपूजन येत्या नवरात्रौत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांच्या उपस्थितीमध्ये करण्याचा मानस असून हा प्रकल्प पुढील तीन – साडेतीन वर्षात पूर्ण करण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन परिवहन मंत्री व धाराशिव जिल्ह्याचे पालकमंत्री प्रताप सरनाईक यांनी केले.

मंत्रालयात आयोजित बैठकीमध्ये ते बोलत होते. यावेळी आमदार कैलास पाटील, आमदार प्रवीण स्वामी यांच्यासह छत्रपती संभाजीनगर विभागाचे विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर, धाराशिव जिल्ह्याचे जिल्हाधिकारी कीर्ति किरण पुजार, जिल्हा परिषदेचे मुख्याधिकारी डॉ. मैनाक घोष, अतिरिक्त पोलीस अधीक्षक शफाकत आमना व संबंधित अधिकारी उपस्थित होते.

मंत्री सरनाईक म्हणाले, महाराष्ट्रातील साडेतीन शक्तीपीठांपैकी श्री तुळजाभवानी देवी, तुळजापूर हे पूर्ण शक्तिपीठ आहे. तसेच आई तुळजाभवानी क्षात्रतेजाची स्फूर्ती देवता, प्रेरणाशक्ती व हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांची कुलस्वामिनी आहे. देशभरातून दरवर्षी सुमारे १ ते १.५ कोटी भाविक श्री क्षेत्र तुळजापूरला भेट देत असतात. त्यांना भविष्यात चांगल्या सुख- सुविधा मिळाव्यात तसेच तुळजापूर शहराचा सर्वांगीण विकास व्हावा या उद्देशाने महाराष्ट्र शासनाने १,८६५ कोटी रुपये खर्चाचा तुळजापूर विकास आराखडा बनवला. या प्रकल्पामध्ये तुळजाभवानी मंदिर परिसर आणि संपूर्ण शहराचा सर्वांगीण विकास करण्याच्या सर्व बाबी अंतर्भूत करण्यात आलेले आहेत.

हा प्रकल्प गतीने मार्गी लागण्यासाठी भूसंपादन, तांत्रिक मान्यता आणि विविध निविदा प्रक्रिया या तिन्ही बाबी समांतर पातळीवर करण्यात याव्यात.  तसेच प्रत्यक्ष काम सुरू होण्यापूर्वी भक्तगण व पुजारी मंडळ यांच्याकडून तेथील धार्मिक प्रथा -परंपरांचा आदर राखत त्यांच्या सूचना अंमलात आणाव्यात अशा सूचना मंत्री सरनाईक यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

अष्टभुजा प्रतिमेला भक्तगणांचा विरोध

श्री क्षेत्र तुळजापूर विकास आराखड्यांतर्गत १०८ फुटाचे शिल्प उभारले जाणार आहे. या शिल्पामध्ये श्री तुळजाभवानी माता छत्रपती शिवाजी महाराज यांनी भवानी तलवार देत असल्याचे दाखवण्यात आले आहे. परंतु, हे दाखवत असताना श्री तुळजाभवानी मातेची प्रतिमा ही अष्टभुजाकृती दाखवण्यात आलेली आहे. याला अनेक भक्तगण व पुजारी मंडळांनी आक्षेप नोंदवलेला आहे. त्यांच्या भावनांचा आदर राखत संकेतस्थळावरील विकास आराखड्याच्या संकल्प चित्रातून ही प्रतिमा काढून टाकण्यात यावी, तसेच शिल्प तयार करताना पुरातत्व विभाग, इतिहास तज्ज्ञ व अनुषंगिक घटकांशी चर्चा करून देवीची प्रतिमा कशी असावी याबाबत निर्णय घ्यावा, असे निर्देश पालकमंत्री व तुळजापूर विकास प्रकल्पाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी संबंधितांना दिले. याबरोबरच यापुढे विकास आराखडा संदर्भात प्रसिद्धीसाठी द्यावयाची पत्रे, परिपत्रके ही परस्पर न देता अध्यक्षांच्या अनुमतीनेच देण्यात यावीत, असे निर्देश त्यांनी यावेळी जिल्हाधिकारी धाराशिव यांना दिले.

०००

नीलेश तायडे/विसंअ/

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *